भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले. समानतेचे हे एक फार महत्त्वाचे सूत्र घटनेद्वारे भारतातील प्रत्येकाला मिळाले आहे, त्याचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान आल्याशिवाय जगातील सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही सुदृढ होणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. आपण प्रत्येक जण सरकारकडून जशा काही अपेक्षा करत असतो, त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपणही मतदान करणे हे कर्तव्य ठरते. लोकशाहीने दिलेला हा अधिकार बजावणे म्हणूनच अतिशय महत्त्वाचे आहे. आपण एकटय़ाने मत न दिल्याने असा काय मोठा फरक पडणार आहे, असा विचार करणारेही या देशात बरेच जण असतात. पण असा विचार आत्मघातकी असतो. आपल्या एका मतानेही फरक पडू शकतो, हे लक्षात घेतले, तर मतदानाचे खरे मूल्य लक्षात येऊ शकेल. आपल्याला जो पक्ष किंवा उमेदवार महत्त्वाचा वाटतो, त्या पक्षाला मत देणे म्हणजे आपण ज्या विचारांवर विश्वास ठेवतो, त्याला आधार देण्यासारखे असते. मत दिल्याशिवाय या देशात परिवर्तन अशक्य आहे, याची जाणीव ठेवली, तर हे सरकार नको होते, असे घडले त्याला हेच सरकार कारणीभूत आहे अशा चर्चाना पूर्णविराम मिळेल. सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करण्याची मतदान ही एक संधी असते. कोणत्या प्रकारचे सरकार आपल्याला हवे आहे, हे सांगण्याचे ते एक निमित्त असते. म्हणून मतदानाच्या दिवशी सहलीला जाणे किंवा मतदानालाच न जाणे अतिशय चुकीचे आहे. सशक्त लोकशाही हवी असेल, तर मतदानाशिवाय पर्याय नाही. नागरिक सजग असल्याचे ते एक द्योतक असते. मतदान हा एक मौल्यवान अधिकार आहे. त्याचे मूल्य करून कुणी आपल्याला विकत घेऊ पाहत असेल, तर त्याच्या प्रलोभनांना बळी पडणे म्हणजे या अधिकाराचा घोर अपमान आहे, असे मला वाटते. आश्वासने आणि प्रलोभनांपासून दूर राहून लोकशाही निकोप करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकाने सहभागी होणे त्यासाठी अतिशय आवश्यक आहे.

vote
यंदा ‘मतदान’ करणार की ‘मताधिकार’ बजावणार?
nitin gadkari
“बहुमत मिळो या न मिळो…”, संविधान बदलण्याच्या विधानावर नितीन गडकरी यांची मोठी प्रतिक्रिया
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क
मतदान हा महत्त्वाचा अधिकार