वाहनांचा मोठा ताफा, भाजप कार्यकर्त्यांचा महासागर व त्यांची घोषणाबाजी आणि बघ्यांची भरमसाट गर्दी यांच्यामधून आपल्या रोड शोची वाट काढत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वडोदरा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरून प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
विशेष म्हणजे, मोदींनी यावेळी पहिल्यांदा जाहीररित्या विवाहीत असल्याची कबुली दिली. निवडणूक अधिकाऱयांसमोर उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी विवाहीत असल्याचा उल्लेख केला असून पत्नीचे नाव जशोदाबेन असल्याचे म्हटले आहे.
आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये मोदी ‘विवाहित/अविवाहित’ हा रकाना मोदी रिकामा ठेवत असत. २०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीच्या अर्जामध्येही मोदी यांनी हा रकाना भरला नव्हता. यावेळी मात्र, मोदींनी पत्नीचे नाव नमूद केले असून ‘पत्नीची मालमत्ता’ या रकान्यात माहित नसल्याचे लिहीले आहे.
भाजप आणि एनडीएला केंद्रात सत्तेवर आणण्याचे सुकाणू त्यांच्या हाती देण्यात आले आहे. उत्तम प्रशासन देण्याचा दावा करणाऱ्या मोदी यांची या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आणि राहुल गांधी यांचे विश्वासू मधुसूदन मिस्त्री आणि आपचे उमेदवार व यांत्रिक अभियंते सुनील कुलकर्णी यांच्याशी लढत होणार आहे.
वडोदऱ्यातील मुस्लीम भागातून हा ताफा जात असताना अनेकांनी मोदी यांना भरभरून शुभेच्छा दिल्याचे चित्र होते. चहाविक्रेता किरण महिदा व राजघराण्यातील शुभांगिनीदेवी गायकवाड यांनी मोदी यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या.
अर्ज सादर केल्यानंतर मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला, तेव्हा गायकवाड घराण्याच्या उत्तम प्रशासनाचा उल्लेख केला.