भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सध्या देशभरातील प्रचारसभांमध्ये व्यग्र असल्यामुळे गुजरातमधील वडोदरामध्ये त्यांचा प्रचार त्यांच्यासारखाच दिसणारा रिक्षाचालक जितेंद्र व्यास करीत आह़े  मोदी लोकसभेची वाराणसीसह वडोदऱ्याच्या जागा लढविणार आहेत़  त्यातच ते भाजपचे ‘स्टार’ प्रचारकही आहेत़  त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघात प्रचारासाठी अद्याप सवड मिळालेली नाही़  तेव्हा मोदींच्या प्रचारार्थ शुक्रवारपासून व्यास वडोदऱ्यात फिरत आहेत़
‘मी खूप प्रचार करेन आणि मोदींना पंतप्रधानपदी आणण्यासाठी वडोदऱ्यातील सर्व सात विधानसभा मतदारसंघ पिंजून काढेन’, असे तिशीतील व्यास अभिमानाने सांगत होता़  रावपुरा विधानसभा मतदारसंघातील ग्रामदेवता छिपवाडा देवतेची पूजा करून आशीर्वाद घेतल्यानंतर व्यास यांनी मोदींचा प्रचार सुरू केला आह़े  मोदींना देशभर प्रचार करायचा आह़े  त्यामुळे त्यांना शहरासाठी वेळ मिळणार नाही़  त्यामुळे मीच त्यांचा प्रचार करेन, असेही व्यास सांगतो़  व्यास याला लोकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आह़े  जिथे जिथे तो प्रचारासाठी जात आहे तेथे त्याचे लोकांकडून जल्लोषात स्वागत होत आह़े