स्वपक्षीयांबरोबरच मित्रपक्ष राष्ट्रवादीनेही राज्यातील आघाडीच्या पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर फोडले आहे. राष्ट्रवादीपेक्षाही काँग्रेसच्या कमी जागा निवडून आल्या असल्याने मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करावा, असे राष्ट्रवादीत बोलले जाऊ लागले आहे.
गेल्या साडेतीन वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात चव्हाण यांनी विरोधकांपेक्षा राष्ट्रवादीलाच लक्ष्य केले. सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या बदनामीला त्यांनी प्राधान्य दिले. पक्षाच्या मंत्र्यांच्या विरोधात प्रसार माध्यमांना माहिती कोण पुरवीत होते याची आम्हाला पुरेपूर कल्पना होती. मित्रपक्षाला बदनाम करण्याच्या नादात काँग्रेसच राज्यात गाळात गेल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून झाला होता. राष्ट्रवादीचे नुकसान झाले असले तरी काँग्रेसचेच अधिक नुकसान झाल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या निराशाजनक कामगिरीचा मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. पक्षाच्या नेत्यांनी निराशाजनक कामगिरीबद्दल मुख्यमंत्री चव्हाण यांनाही दोष दिला आहे. सरकारच्या हाताला लकवा लागला की काय, हे विधान पवार यांना करावे लागले होते. सिंचन घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पराचा कावळा केला. पण चौकशीत हाती काहीच लागले नाही, याकडेही लक्ष वेधण्यात येते.
लोकसभेतील पराभव लक्षात घेता राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस आढावा घेणार आहेत, असे पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. अजूनही वेळ गेलेली नाही. पुढील तीन महिन्यांत सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्यास जनता पुन्हा एकदा आघाडीवर विश्वास व्यक्त करेल, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.