गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्याचा शरद पवार यांचा प्रस्ताव होता, या शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या दाव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी स्पष्ट शब्दांमध्ये इन्कार केला. जोशी यांना त्यांचा शिवसेना पक्षच गांभीर्याने घेत नसल्याने आम्हीही त्यांच्या या दाव्याला महत्त्व देत नाही, अशी भूमिकाही राष्ट्रवादीने घेतली.
राज्यसभा किंवा लोकसभेची उमेदवारीची जोशींची इच्छा शिवसेना नेतृत्वाने पूर्ण केली नाही. वयोपरत्वे मनोहर जोशी यांची स्मरणशक्ती कमी झालेली दिसते, अशी टीकाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनेबरोबर यावे म्हणून युतीच्या नेत्यांनीच प्रयत्न केले होते. २००९ मध्ये नव्हे तर १९९९ मध्ये युतीकडून प्रस्ताव आला होता. जोशी यांना बहुधा ते माहित नसावे, कारण तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यात आले होते, असेही मलिक यांनी सांगितले. २००९ मध्ये राष्ट्रवादी यूपीएत होता. तेव्हा काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली होती. अशा वेळी शिवसेनेबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नव्हता, असेही मलिक यांनी सांगितले.