मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अगदी निसटता विजय मिळाला. साहजिकच काँग्रेसला निसटत्या पराभवाची चुटपुट लागून राहिली आहे. लोकसभा निवडणुकीत त्याची भरपाई करायचीच या उद्देशाने काँग्रेस मदानात उतरली आहे, तर भाजपनेही छत्तीसगडचा हा बालेकिल्ला राखायचाच यासाठी व्यूहरचना केली आहे.

छत्तीसगड म्हटले की, नक्षलवादाशिवाय त्यासंदर्भातली चर्चा पूर्ण होऊच शकत नाही. बस्तर, कांकेर, जगदलपूर, जिरम घाटी, अबूजमाड.. नक्षलवाद्यांच्या या बालेकिल्ल्यांनी छत्तीसगडला वेढले आहे. त्यामुळेच साध्या ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत, येथील प्रत्येक निवडणुकीवर नक्षलवादाची काळी छाया असते. आणि प्रचारही याच मुद्दय़ाभोवती फिरत असतो. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद नसेल.
केंद्रातील सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारविरोधात असलेल्या लाटेचा फायदा (अँटी इनकम्बन्सी) घेण्यासाठी भाजप आतुर आहे. त्याचे प्रतिबिंब छत्तीसगडमध्ये पडले आहे, मात्र हे प्रतििबब उलटे आहे. म्हणजे छत्तीसगडमधील सत्ताधारी भाजपच्या बाबतीत जनमानसांत रोष आहे, त्याचेच रूपांतर मतांत करून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला अधिकाधिक खासदारांचे बळ देण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. कारण नोव्हेंबर, २०१३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अगदी निसटता विजय मिळवता आला. काँग्रेस आणि भाजप अगदी तुल्यबळ लढत झाली. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी पारडे भाजपकडे झुकल्याने काँग्रेसचा भ्रमनिरास झाला. म्हणूनच विधानसभा निवडणुकीतील भाजपविरोधी लाटेचा अधिक फायदा घेण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ल यांना पक्षात घेऊन त्यांना बिलासपूर येथून उमेदवारी देण्याचा काँग्रेसश्रेष्ठींचा निर्णय या पाश्र्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. शुक्ल यांनी अगदी अलीकडेच भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर किमान वर्षभर तरी राजकारणापासून दूर राहण्याचा विचार करणारे पक्षाचे प्रभावी नेते अजित जोगी यांनाही काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांना महासमुंद येथून पक्षाने उमेदवारी दिली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत छत्तीसगडमधून निवडून येणारे ते काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले होते. अपघातामुळे कायमस्वरूपी व्हीलचेअरवरच बसणारे जोगी छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा हुकमी एक्का आहेत, ही बाब सर्वमान्य आहे. त्यामुळेच काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांना वर्षभराचा राजकीय संन्यास मागे घ्यायला लावला आहे. एकूणच छत्तीसगडमधून या वेळी किमान सहा ते सात खासदार निवडून आणण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेले विद्याचरण शुक्ल यांच्या चिरंजीवांनाही उमेदवारी देण्याचा पक्षाचा विचार आहे. त्याचबरोबर पक्षाचे छत्तीसगडमधील एकमेव मंत्री चरणदास महंत यांनाही पुन्हा उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत.
भाजपनेही विधानसभा निवडणुकीत झालेला निसटता विजय मनावर घेत लोकसभा निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. नक्षलप्रभावित बस्तर, कांकेर, जगदालपूर या ठिकाणी भाजपला मागच्या निवडणुकीत म्हणावा तसा पािठबा मिळाला नाही. जिरम घाटीत नुकताच झालेला नक्षली हल्ला हे प्रस्थापितांविरोधात असलेल्या नाराजीचेच द्योतक आहे. सरोज पांडे यांना यंदा पक्षाने दुर्गमधून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या त्या अध्यक्ष तर आहेतच शिवाय पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या निकटवर्तीय असल्यानेही त्यांना पक्षात मानाचे स्थान आहे. एकूणच यंदाची निवडणूक काँग्रेससाठी पुनश्च हरि ओमची तर भाजपसाठी परिस्थिती जैसे थे ठेवण्याची असेल.