लोकसभेच्या रणधुमाळीत पहिल्यांदाच उतरत असलेल्या आम आदमी पक्षाला शंभर जागा मिळतील, असा दावा ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केला आह़े  तसेच केंद्रात ‘आप’च्या पाठिंब्याविना पुढील शासन सत्तास्थापनाच करू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आह़े  येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी रविवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरही नव्याने तोफ डागली़
उत्तर प्रदेशात ‘आप’ने तीन दिवसांचा ‘रोड शो’ आयोजित केला होता़  याचाच भाग म्हणून कानपुरात प्रचार सभाही घेण्यात आली़  या वेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी असलेल्या संबंधांवरून केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली़  राजस्थानमध्ये रॉबर्ट व्रढा यांच्या भूखंड गैरव्यवहारप्रकरणी ‘सेटिंग’ केल्याचा आरोप करीत केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडल़े  मोदींनी केलेला कथित विकास पाहण्यासाठी ५ ते ८ मार्चदरम्यान गुजरात दौरा करणार असल्याचेही या वेळी केजरीवाल यांनी सांगितल़े
..तर केजरीवाल  मोदींविरोधात लढतील
नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची निवडणूक वाराणसीमधून लढविण्याचे ठरविल्यास अरविंद केजरीवाल त्यांच्याविरुद्ध लढतील, असे संकेत ‘आप’च्या नेत्यांनी या वेळी दिल़े संजय सिंह यांनी केजरीवाल यांच्या आधी बोलताना त्यांना वाराणसीतून लढण्याचे आवाहन केल़े  परंतु, केजरीवाल यांनी मात्र भाषणात याबाबत मिठाची गुळणी घेतली़