‘येऊ दे त्याला, मी तयार आहे’ असा एकेरी उल्लेख करत डॉ. पद्मसिंह पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मंगळवारी जाहीर आव्हान दिले. 

उस्मानाबाद मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करीत डॉ. पाटील यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात हजारे यांनी डॉ. पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या विरोधात प्रचाराला जाणार, असेही ते म्हणाले होते. या पाश्र्वभूमीवर डॉ. पाटील यांनी वरील आव्हान दिले. आपल्या विरोधात उस्मानाबादेत सभा घेणार असल्याचे हजारे यांनी जाहीर केले. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणानंतर पारसमल जैन याने हजारे यांचा खून करण्यासाठी सुपारी दिली असल्याचा कबुलीजबाब सीबीआयकडे दिला होता. तत्पूर्वी डॉ. पाटील यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे हजारे यांनी बाहेर काढली. त्यावर न्या. सावंत यांची चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालात डॉ. पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. तेव्हापासून हजारे व डॉ. पाटील एकमेकांविरोधात निवडणुकांपूर्वीच नेहमीच वक्तव्य देत असतात.
पूर्वी डॉ. पाटील हे हजारेंचा एकेरी उल्लेख खासगी कार्यक्रमात करीत. आज मात्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी जाहीरपणे एकेरी उल्लेख केला. एवढेच नाही, तर हजारेंच्या प्रामाणिकपणावरही प्रश्नचिन्ह उभे केले. हजारे याच्याकडे उत्पन्नाचे कसलेही स्रोत नाहीत, तरीदेखील तो सर्वत्र कसा फिरतो, असा सवाल करीत डॉ. पाटील यांनी, ‘येऊ दे त्याला. मी तयार आहे,’ असे म्हटले. सलग उपोषण करूनही हजारे याचे गाल गुबगुबीत कसे राहू शकतात? अशी खिल्लीही त्यांनी उडविली.
सकाळी १० वाजता तुळजापूर नाका येथील अण्णा भाऊ साठे येथील चौकातून डॉ. पाटील यांच्या रॅलीस प्रारंभ झाला. पालकमंत्री मधुकर चव्हाण, पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, माजी मंत्री आमदार बसवराज पाटील, आमदार विक्रम काळे, राणाजगजितसिंह पाटील, दिलीप देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.