दलितांच्या मतांसाठी विविध राजकीय पक्षांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीच एकमेकांविरोधात तलवारी परजल्या आहेत. तळागाळातील जनतेला सक्षम करण्यासाठी घटनाकारांनी जे कार्य केले त्याचे श्रेय लाटून नेहरू-गांधी घराण्यांनी त्यांचा अपमान केल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
दलितांना सक्षम करण्यासाठी घटनाकारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मोदी यांनी नेहरू-गांधी घराण्याला लखीमपूर खेरी येथील सभेत लक्ष्य केले. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी दलितांना जे अधिकार दिले त्याची अंमलबजावणी काँग्रेसने थांबविल्याचा आरोपही मोदी यांनी केला.
अहमदाबाद येथे डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहिल्यानंतर मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेसने हे अथवा ते अधिकार दिले असे सांगून राहुल गांधी सातत्याने घटनाकारांचा का अपमान करीत आहेत, तेच कळत नाही, असे मोदी म्हणाले. सर्व कायदे आणि हक्क आपल्याला घटनाकारांनी दिले आहेत, असेही मोदी म्हणाले.
आपण देशाला कोणताही हक्क अथवा कायदा दिल्याचा दावा कोणी करीत असेल तर तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. ज्यांना घटनेचीच माहिती नाही तेच राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. घटनाकारांनी जे अधिकार दिले त्यांची अंमलबजावणी गांधी घराण्याने थांबविली हे दुर्दैवी आहे, असेही मोदी म्हणाले.
काँग्रेसने आपल्या राजवटीत घटनाकारांचा जास्तीत जास्त अपमान केला, मात्र एनडीएच्या राजवटीत डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देण्यात आला, असेही ते म्हणाले. घटनाकारांनी आपल्याला हक्क दिले नसते तर आपल्यासारखी एक मागासवर्गातील व्यक्ती तुमच्यासमोर आज उभी राहू शकली नसती, असेही मोदी म्हणाले.

‘भारतरत्न’च्या श्रेयावरून मायावतींची मोदींवर टीका
मायावती यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्या की भाजपच्या नेत्यांना दलित हे हिंदू असल्याचा साक्षात्कार होतो, मात्र त्यानंतर भाजपचे नेते दलितांजवळ बसतही नाहीत, असे मायावती म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न किताब देण्यात आला त्याचे श्रेय भाजप लाटत असल्याचा आरोप बसपाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. त्याचप्रमाणे मोदी हे खोटारडेपणाचे राजकारण करीत असल्याचेही मायावती यांनी म्हटले आहे.