निवडणूक काळातील कामकाजासाठी शासकीय अधिकाऱ्यांना एक महिन्याचे वेतन मिळत असले तरी या शासकीय अधिकाऱ्यांबरोबर सुरुवातीपासून बंदोबस्ताच्या कामी असणाऱ्या पोलिसांना मात्र मतदानाच्या काळातील एक दिवसांचा किरकोळ भत्ता दिला जातो. त्यानुसार शिपायांना जेमतेम दीडशे ते दोनशे रुपये तर अधिकाऱ्यांच्या पदरी फक्त तीनशे ते चारशे रुपये पदरी पडतात. त्यातही फक्त मतदान केंद्रावर असणाऱ्या पोलिसांचाच विचार केला जातो. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या पदरी काहीही पडत नाही. इतर अधिकाऱ्यांप्रमाणे पोलीसही महिन्याभरापासून निवडणुकीच्या काळात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांनाही महिन्याभराचे वेतन मिळावे, असा प्रस्ताव महासंचालकखात्याने पाठविल्याचे कळते.
निवडणुकीच्या कामाला जुंपलेल्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन भत्ता म्हणून मिळते. ही रक्कम हजारोंच्या घरात जाते. मात्र त्याचवेळी निवडणुकीच्या काळात बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना फक्त मतदानाच्या दिवशी होणाऱ्या बंदोबस्ताचाच भत्ता दिला जातो. पूर्वी तो खूपच किरकोळ होता. शिपायांना ८० रुपये तर अधिकाऱ्यांना ३०० रुपये मिळत होते. त्यात आता वाढ झाली असली तरी ती खूपच कमी आहे. रोजच्या कामकाजाव्यतिरिक्त पोलिसांना बंदोबस्ताची डय़ुटी करावी लागते. उमेदवारांचा प्रचार, पदयात्रा, प्रचार फेरी तसेच मतदान केंद्राची सुरक्षा आदी विविध कामासाठी पोलिसांचाही साधारणत: महिन्याभरापासून वापर केला जातो. अशावेळी पोलिसांना महिन्याचे वेतन मिळावे, यासाठी आता महासंचालक कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.

३२ हजार पोलीस बुधवारपासून बंदोबस्ताला
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईत तब्बल ३२ हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असून गेल्या काही दिवसात १४ हजार लोकांची धरपकड करण्यात आली आहे.मुंबईत लोकसभेच्या सहा जागांसाठी १ हजार ५२८ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ३८ पोलीस उपायुक्त, ४६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४७७ पोलीस निरीक्षक, १९५१ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच ३० हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय राज्य राखीव पोलीस बलाच्या १९ तुकडय़ा आणि निमलष्करी दलाच्या ८ तुकडय़ांचा समावेश आहे. ५ हजार २७५ होम गार्ड्स मदतीला असून २५० साध्या वेषातील पोलीसही लक्ष ठेवून असणार आहेत.या बंदोबस्ताबाबत पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले की, आम्ही सर्व आव्हानांना तोंड देण्यास तयार आहोत. गेल्या महिनाभरात परवानाधारक १ हजार ५६४ शस्त्रे जमा केली असून ५० बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.