scorecardresearch

Premium

पृथ्वीराज यांनी माहिती फोडली की पक्षकार्य केले?

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे संजय बारू (पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम-सल्लागार) यांचे शुक्रवारीच बाजारात आलेले पुस्तक प्रकाशनाआधीच वादग्रस्त ठरले खरे; पण सोनिया गांधी वगळता अन्य कुणा नेत्याबद्दल बारू यांनी नापसंती व्यक्त केलेली नाही, असे या पुस्तकाच्या प्रतीतून दिसते.

पृथ्वीराज यांनी माहिती फोडली की पक्षकार्य केले?

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे संजय बारू (पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम-सल्लागार) यांचे शुक्रवारीच बाजारात आलेले पुस्तक प्रकाशनाआधीच वादग्रस्त ठरले खरे; पण सोनिया गांधी वगळता अन्य कुणा नेत्याबद्दल बारू यांनी नापसंती व्यक्त केलेली नाही, असे या पुस्तकाच्या प्रतीतून दिसते. ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयातील (गोपनीय) माहिती फोडल्याचा आरोप बारूंनी केला,’ असे त्यांचे टीकाकार म्हणत असले तरी, वस्तुस्थिती निराळी आहे.
पुस्तकात पृथ्वीराज यांच्यावर हा आरोप बारू यांनी केलेला नाही. उलट, पृथ्वीराज यांनी प्रसारमाध्यमांना काही माहिती दिली असल्यास त्यामागे ‘पक्षनेतृत्व’च असावे, असा तर्क करून पुन्हा सोनियांनाच बारू यांनी लक्ष्य बनविले आहे. (पुस्तकाच्या पान क्र. ८५-८६ वरील या भागाचे भाषांतर सोबत आहे) बारू यांच्या या ३०० पानी आत्मनिवेदनपर पुस्तकात ‘डॉ. सिंग’ यांच्याखेरीज कुणा एका व्यक्तीचा सर्वाधिक वेळा उल्लेख असेल तर तो सोनियांचाच. शिवाय, पंतप्रधानांनी अमेरिकेशी अणुकरार करण्याचा निर्णय एकटय़ानेच कसा रेटला, याचेही चित्र या पुस्तकातून तुकडय़ातुकडय़ाने स्पष्ट होत जाते. त्या निर्धारपूर्वक वाटचालीतील स्वतचे श्रेय सांगण्याचा बारू यांचा प्रयत्नही पुस्तकातून दिसतो आणि त्यासंदर्भात पुस्तकाची अर्पणपत्रिकाही बोलकीच ठरते.. इंदिरा गांधींच्या ‘पोखरण अणुचाचणी’ची पाठराखण करणारे माध्यम-सल्लागार एच. वाय. शारदाप्रसाद (हेच पुढे मोरारजी व राजीव गांधींचेही माध्यम-सल्लागार होते) आणि अमेरिकेशी अणुकराराची कल्पना पुढे रेटणारे ज्येष्ठ लोक-प्रशासक के. सुब्रमण्यम यांनी आपल्याला घडवल्याचा उल्लेख बारूंनी अर्पणपत्रिकेत केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना पंतप्रधान कार्यालयात रुजू होण्यापूर्वी दहा वर्षे आपण ओळखत होतो, शरद पवार यांच्याबद्दल सिंग यांना ममत्वच होते कारण अर्जुन सिंग, ए. के. अँटनी आणि वायलर रवी यांसारखे लोक जेव्हा जेव्हा सिंग यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत तेव्हा पवार पाठीशी उभे राहात, असे बारू सांगतात. तरीदेखील, पृथ्वीराज स्वतला पवारांचे स्पर्धक समजत की काय असे बारूंना वाटले, तो घटनाक्रम त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहेच.
मनमोहन सिंग यांची सोनियांसमोर शरणागती
संजय बारू म्हणतात..
*२००९ मध्ये यूपीए २ चे सरकार स्थापन झाले. मी तेव्हा सिंगापूरमध्ये प्राध्यापकी करीत होतो. माझ्यासोबत काम करण्यासाठी मायदेशी या, असा निरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाठविला. मी आलोही पण अखेरच्या क्षणी पंतप्रधानांनी वचन पाळले नाही. यावरूनच केंद्र सरकारच्या कारभारात काँग्रेस पक्ष हस्तक्षेप करीत असल्याचे मला आढळून आले. माझ्या पुस्तकाचा तोच मूळ गाभा आहे. अणुऊर्जा करारासारखे काही मोजके अपवाद वगळता मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान म्हणून प्रभाव दिसत नाही. यामुळे गोंधळाचे वातावरण तयार होत आहे. केंद्रात केवळ एकच सत्ताकेंद्र आहे, ते म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी. पंतप्रधानांच्या बोलण्यातूनही पंतप्रधानपद सोनिया गांधींच्या मतानुसार चालते, असेच जाणवले.
*नरेगा योजनेच्या यशामागे पंतप्रधान असतानाही सारे श्रेय राहुल यांनाच मिळावे, अशी पक्षाची इच्छा होती. मात्र तरीही पंतप्रधानांनी ब्र काढला नाही. प्रसारमाध्यमांनी सिंग यांना त्याचे श्रेय दिल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. या यशाचे खरे श्रेय तुम्हाला आणि ग्रामविकासमंत्री रघुवंश प्रसाद यांनाच जाते, असे मी म्हणालो. त्यावर, मला कोणतेही श्रेय नको आणि माझी प्रतिमा सांभाळण्याचा तुम्हीही प्रयत्न करू नका, असे पंतप्रधान मला म्हणाले.  
*पंतप्रधानांची असहायता सांगणारी काही उदाहरणेही बारू यांनी या पुस्तकात दिली आहेत. त्यातील पहिले उदाहरण २००७ मध्ये ए. राजा यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतचे आहे. दिल्लीत आपल्या पक्षाचा म्होरक्या ए. राजा आहे असे द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी चेन्नई येथे घोषित केले. त्यानंतर दोन दिवसांत राजा यांना दूरसंचार मंत्रालयाचा कारभार देण्याच्या करुणानिधींच्या विनंतीवर निर्णय घ्यावा लागला. दुसरे एक प्रकरण असेच आहे. मंत्र्यांची नावे कळविणारे पंतप्रधानांचे पत्र राष्ट्रपतींना पाठविले जात होते. मात्र अखेरच्या क्षणी सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी आंध्रच्या सुब्बीरामी रेड्डी यांना मंत्रिमंडळात घेण्याची विनंती केली. ती मानावी लागली. पंतप्रधान म्हणून त्यांचे अधिकार सीमित झाले होते.
*विविध समित्या तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या संचालक मंडळांवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी पटेल हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव पुलोक चटर्जी यांच्याशी थेट चर्चा करीत. विशेष म्हणजे सोनिया गांधींच्या आदेशावरूनच पुलोक चॅटर्जी यांची पंतप्रधान कार्यालयात वर्णी लागली होती. महत्त्वाच्या फायलींबाबत पुलोक नेहमी सोनिया गांधींशी चर्चा करीत.
*केंद्रीय मंत्री पंतप्रधानांशी नव्हे तर सोनिया गांधी यांच्याशीच एकनिष्ठ होते. मुक्त व्यापार कराराबाबतच्या मुद्दय़ावर सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना लिहिलेले गोपनीय पत्र उघड क रून जयराम रमेश यांनी पंतप्रधानांची चांगलीच कोंडी केली होती. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील समिती धोरणांवर लक्ष ठेवून असल्यामुळे पंतप्रधान समाधानी नव्हते.
*बारू यांच्या पुस्तकात टू जी घोटाळ्याबाबत पंतप्रधान कार्यालय आणि ए. राजा यांच्याकडील दूरसंचार मंत्रालयातील बेबनावाबाबत अधिक भाष्य नाही. मात्र उद्योगपती रतन टाटा यांनी या धोरणाबाबत आक्षेपार्ह वाटणाऱ्या बाबी पंतप्रधानांच्या कानावर घातल्या होत्या हे नमूद आहे.
*माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांचे बंधू कलानिधी यांच्या सन टीव्हीला लाभकारक निर्णय होत असल्याचा टाटांचा आक्षेप होता. तरीही करुणानिधींच्या सांगण्यानुसार राजाला दूरसंचार मंत्रालयाचा कारभार देण्याचा निर्णय पंतप्रधानांना घ्यावा लागला होता.
*पंतप्रधान स्वत: स्वच्छ चारित्र्याचे आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणीही चुकीचे वर्तन क रू नये असा त्यांचा कटाक्ष आहे. मात्र आपल्या सहकाऱ्यांच्या चुकीच्या वर्तनाबाबत ते उत्तर देऊ शकत नाहीत. कारण या मंत्र्यांच्या नियुक्तीचा निर्णय त्यांचा नाही. त्यामुळे एकूणच सहकारी मंत्र्यांच्या गैरकारभारामुळे पंतप्रधान व्यथित झाल्याचे बारू यांनी नमूद केले आहे.
*नरसिंह राव यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव हैदराबादला न्यावे यासाठी बारू यांनी राव कुटुंबाची समजूत घालावी, अशी अहमद पटेलांची इच्छा होती. यावरून सोनिया गांधींना राव यांचे दिल्लीत स्मारक होऊ नये असेच वाटत असल्याचे स्पष्ट होते.
*पंतप्रधानांचे महत्त्व कमी करण्यासाठी अर्जुन सिंह हे प्रणब मुखर्जीपेक्षा अधिक सक्रिय होते, ही बाब पंतप्रधानांना सतावत होती. शिवाय अर्थमंत्री असताना प्रणब मुखर्जी यांच्या अंदाजपत्रकाचा संपूर्ण मसुदा होईपर्यंत त्याची कल्पना पंतप्रधानांना नसायची. त्यामुळेच २०१२ चा अर्थसंकल्प सादर व्हायच्या आदल्या दिवसापर्यंत पंतप्रधानांना त्याची माहितीच नव्हती. तसेच ए. के. अँटोनी आणि अर्जुन सिंग यांच्याविरोधात ते शरद पवार यांना जवळचे समजायचे, असाही उल्लेख पुस्तकात आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माजी प्रसारमाध्यम सल्लागार संजया बारू यांचे- द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर- हे वादग्रस्त पुस्तक शुक्रवारी बाजारात दाखल झाले आणि एकच राजकीय भूकंप झाला. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यातील सत्ता-समीकरण आणि त्याचा राज्य कारभारावर होणारा परिणाम यावर बारू यांनी या पुस्तकातून खळबळजनक माहिती दिली आहे. त्यातील काही भाग..  
शरद पवार एकदा ‘सात रेसकोर्स रोड’ येथे (पंतप्रधानांच्या निवासस्थानी) एक तक्रार घेऊन आले. राष्ट्रीय (इंग्रजी/ हिंदी) आणि मराठी माध्यमांतून छापल्या जाणाऱ्या काही बातम्या पवारांविरुद्ध होत्या आणि त्या सर्व बातम्या ‘पंतप्रधानांच्या कार्यालयातील माहीतगारां’चा हवाला देऊन छापण्यात आल्या होत्या; त्यामुळे हा माहीतगार कोण, यात लक्ष घातले जावे अशी पवारांची विनंती होती. डॉ. सिंग यांनी हे काम माझ्यावर सोपवल्याने मी माझ्या ओळखीच्या हिंदी व मराठी पत्रकारांकडे चौकशी केली आणि त्या सर्वानी एकच वृत्त दिले : पृथ्वीराज चव्हाण यांनी या बातम्या पेरल्या होत्या. डॉ. सिंग यांच्यासाठी हा नाजुक मामला होता. कारवाई करताच येणार नव्हती कारण पृथ्वी पक्षनेतृत्वाच्या आदेशांनुसार हे काम करीत असणार, अशीही शक्यता होती. अखेर, सोनिया आणि पवार यांच्यात मैत्रीच होती असे नव्हे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

स्वतला महाराष्ट्रातील राजकारणी आणि पवारांचे स्पर्धक मानत असल्यामुळे पृथ्वी यांनी, राज्यावरील पवारांची पकड कमी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे एक उपकरण (इन्स्ट्रमेंट) म्हणून स्वतचा वापर होऊ दिला असणार. मात्र दुसरीकडे, पवार हे पंतप्रधान कार्यालयाचे लाडके होते कारण पंतप्रधान म्हणून प्रणब मुखर्जी अथवा अन्य काँग्रेस नेत्याच्या नावापेक्षा डॉ. सिंग यांनाच पवारांचा पाठिंबा असे.

“पंतप्रधानांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारू यांचे पुस्तक काल्पनिक आहे. बारू हे लोकसभा निवडणुकीत भाजपचा कार्यक्रम राबवीत आहेत. आपल्या पुस्तकाची विक्री व्हावी आणि सवंग लोकप्रियता मिळावी यासाठीच त्यांचा खटाटोप आहे. “
रणदीप सूरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते      
संजय बारू यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेली मुलाखत
मी तर केवळ ५० टक्केच माहिती दिली आहे!
ल्लआपल्या पदाचा गैरवापर करून आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने पुस्तक लिहिल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
– याबाबत मी काय बोलणार. हे वक्तव्य हास्यास्पद आणि निर्बुद्ध आहे. मी पंतप्रधानांबाबत सकारात्मक लिखाण केलेले आहे. मला या वादात पडायचे नाही. मी पाच वर्षांपूर्वीच पीएमओ कार्यालयातून बाहेर पडलो. त्यामुळे जे काही लिखाण केले आहे ते यूपीए-१ च्या काळातील आठवणींना उजाळा देणारे आहे.
ल्लअशा प्रकारचे पुस्तक लिहिताना तुम्ही गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
– मुळात आपले अनुभव लिखित स्वरूपात मांडण्याची पद्धत जगभर प्रचलित आहे. भारतात  नटवर सिंह आणि पी. सी. अलेक्झांडर यांनी असे लिखाण केलेले आहेच. प्रशासकीय अधिकारी अथवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती अशा प्रकारे आपले अनुभव लिहीत नाहीत. कारण त्यांना आणखी कुठे तरी सरकारी नोकरी वा काम मिळवायचे असते. पण म्हणून अशा प्रकारे लिखाण करणे हे अनैतिक मानू नये.
ल्लअनेक गोपनीय माहिती प्रसारमाध्यमांना उघडी करण्यामागे जयराम रमेश आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा हात होता. आणि तुम्ही त्याबाबत पंतप्रधानांशी बोलल्याचेही म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि पंतप्रधानांच्या सहकाऱ्यांशी झालेल्या चर्चेचा तपशीलही मांडला आहे.
– मला ज्यांनी माहिती दिली वा चर्चा केली, त्यांची नावे मी उघड केलेली नाहीत. पुस्तक लिहिण्याआधी मी अनेकांशी चर्चा केली. त्यानंतरही जर कोणी अशा प्रकारचे वक्तव्य करीत असेल तरीही मी त्यांची नावे उघड करणार नाही. मी जे लिहिले आहे, त्यात मला ज्ञात असलेल्या एकूण माहितीपैकी केवळ पन्नास टक्केच माहिती मांडली आहे. तसेच पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान जी गोपनीय माहिती सांगितली, तिचा उल्लेख केलेला नाही. गोपनीयता राखण्याबाबत केलेल्या वचनाचा मी कोणताही भंग केलेला नाही. मात्र पंतप्रधान कार्यालयात असताना इतर व्यक्तींशी केलेल्या चर्चेचा तपशील मांडण्याबाबत मला पूर्ण स्वातंत्र्य आहे.
ल्लतुमच्या पुस्तकाबाबत पंतप्रधानांना माहिती आहे का?
– नाही, त्यांना याबाबतची कल्पना नव्हती; परंतु गेल्या आठवडय़ात मी त्यांना पुस्तक पाठवून दिले आहे. या पुस्तकासंबंधी त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
ल्लयूपीए २ चा पंतप्रधानांचा काळ खडतर आहे. ते दुसऱ्या टप्प्यात का अपयशी ठरले?
– अणुकरार असो वा इतर मुद्दे, पंतप्रधान म्हणून त्यांना काम करण्यात अडथळे आले. मात्र असा प्रकार यूपीए १ च्या काळात नव्हता. त्यामुळे लोकांसमोर खरी बाब मांडणे हे माझे कर्तव्य समजतो. काँग्रेसला कळले पाहिजे त्यांची भूमिका काय होती. देशालाही कळले पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी हे पुस्तक वाचले असते तर त्यांना डॉ. सिंग यांची परिस्थिती समजली असती. पंतप्रधानांनी केलेल्या कामांचे त्यांना श्रेय मिळाले नाही, म्हणूनच मी हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक मी लिहिलेही नसते. मात्र २०१२ मध्ये जेव्हा मनमोहन सिंगांवर टीका होऊ लागली, तेव्हा मी पुस्तकातून या गोष्टी लोकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला.
ल्लपुस्तकात पंतप्रधानांचे वर्णन एकाकी, असहाय आणि संकटांनी घेरलेले केले आहे.
– या पुस्तकाद्वारे पंतप्रधानांचे मानवी रूप जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज-कालची तरुण पिढी सिंग हे पुतळा अथवा रोबोट असल्यासारखी भावना व्यक्त करते. त्यांची सिंग इज किंगची इमेज संपल्याचे बोलले जाते. मात्र तरुण पिढीपर्यंत वस्तुस्थिती जावी म्हणूनच पुस्तकातून पंतप्रधानांचे खरे रूप मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यूपीए १ च्या काळात ते अधिक सक्षमपणे काम करीत होते, मात्र यूपीए २ च्या काळात त्यांच्या कामाला लगाम पडला, हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे.
ल्लयूपीए २ च्या काळात तुम्हाला पीएमओपासून दूर ठेवण्यात काँग्रेस यशस्वी ठरली, यामागे नेमके कोण आहे?
– मला माहीत नाही. आणि त्याचा शोध घेण्यासाठी मी तेथे नव्हतोच.
ल्लयूपीए २ च्या काळात नियोजन आयोगापासून स्वत:ला दूर ठेवण्याच्या निर्णयाबाबत आपण समाधान व्यक्त केले आहे.
मी घेतलेल्या निर्णयाबाबत समाधानी आहे. विशेष म्हणजे यूपीए २ च्या काळात स्वत: पंतप्रधान आपले पद राहील की नाही, याबाबत साशंक होते. यामागे अनेक कारणे होती. त्यांपैकी एक म्हणजे राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले जात होते. मात्र जी चांगली कामे पंतप्रधानांनी केली होती, त्या कामांमुळेच त्या पदावर त्यांना राहाता आले. मीदेखील पंतप्रधानांच्या यशस्वी कारकिर्दीचाच आढावा पुस्तकात घेतला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-04-2014 at 01:04 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×