भाजपप्रणीत रालोआ सरकारने सादर केलेल्या आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पावर शुक्रवारी लोकसभेत जोरदार टीका करण्यात आली. रेल्वे अर्थसंकल्प अविचाराने तयार करण्यात आला असून त्यामध्ये दिवास्वप्ने दाखविण्यात आली असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी परकीय थेट गुंतवणूक आणण्याच्या आणि त्यामध्ये सार्वजनिक-खासगी क्षेत्रातील सहभागाला मान्यता दिल्याबद्दल काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी जोरदार टीका केली. सरकारने प्रस्तावित केलेले प्रारूप जगभरात कोठेही यशस्वी नाही, असेही ते म्हणाले. हीरक चतुष्कोण प्रकल्पासाठी नऊ लाख कोटी रुपये सरकार कोठून उभे करणार आहे, असा सवाल करून चौधरी यांनी देशात बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या प्रस्तावावर टीका केली. हा अत्यंत महागडा प्रकल्प असून त्यासाठी वाटप केलेली १०० कोटी रक्कम अगदीच नगण्य आहे, असेही ते म्हणाले. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात वस्तुस्थितीचाच विपर्यास करण्यात आला आहे. सरकार चीन प्रारूपाची भाषा करते, मात्र तेथे रेल्वेचे जाळे सुधारण्यासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी सार्वजनिक निधीचा वापर केला जातो याचे भान सरकारने ठेवले पाहिजे, अशी खोचक टीप्पणी त्यांनी यावेळी बोलताना केली.