निवडणुकीत दारुण पराभव का झाला, याची कारणे काँग्रेस पक्ष शोधत असतानाच पक्षातील धुसफूस येत्या सोमवारी होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीपूर्वीच बाहेर आली आहे.
पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सल्लागारांवर पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी खापर फोडले आहे, तर तिकीटवाटपात काही चुका झाल्या का, याची तपासणी जनतेत जाऊन करावी लागेल, असे मत पक्षातील काही नेत्यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह जयराम रमेश, मोहन गोपाळ, मधुसूदन मिस्त्री आणि अजय माकन यांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्याची तयारी दर्शवतील, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र उच्चपदस्थ सूत्रांनी ही शक्यता फेटाळली आहे.
सोनिया गांधी अथवा राहुल गांधी यांनी राजीनामा द्यावा हा तोडगा नाही, अशा प्रकारे पुढे जाता येणार नाही, असे नमूद करून ही शक्यता सूत्रांनी सपशेल फेटाळली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतानाही सोमवारी बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या एकूण रणनीतीबाबतही चर्चा होणार आहे.