‘छातीवरचा मोठा चोर बाजूला करून छोटा चोर आणला,’ अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जाहीर टीका केली. मुख्यमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही. महाराष्ट्र सदनाचे आयुक्त  मलिक ऐकत नाहीत, राज्य सहकारी बँकेचे प्रशासकही ऐकत नाहीत. पट्टेवाला त्यांचे ऐकतो की नाही, अशी शंकाच असल्याचा टोला खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.
खासदार शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आयोजित जालना जिल्हा दुष्काळ मागणी परिषदेत खोत पुढे म्हणाले की, केंद्रातील नवीन सरकारने काही शेतीमालाचे आधारभूत भाव फक्त दीड ते दोन टक्क्यांनी वाढविले. एवढय़ा कमी वाढीस आम्ही विरोध केला. पूर्वीचे सरकार चर्चेला बोलावत नव्हते. हे सरकार खासदार शेट्टी यांना चर्चेला बोलावत तरी आहे. विकासाचे दरवाजे उघडायचे असतील तर संघर्ष अटळ आहे. आम्ही कोणाच्या मागे फरफटत निघालो आहोत, असे समजायचे कारण नाही. महायुतीत आम्ही माफक जागा मागितल्या असून या जागांवर योग्य उमेदवार देणार आहोत. आम्ही खासदार-आमदारकीसाठी भीकेचा कटोरा हाती घेणार नाही, असे सांगून काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष लुटारूंच्या टोळ्या आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.  राज्यातील ५८ सहकारी साखर कारखाने बुडीत काढणाऱ्यांनीच विकत घेतले आहेत. महायुतीची सत्ता आल्यावर गेल्या १० वर्षांत लिलाव झालेल्या सर्व सहकारी संस्थांची चौकशी करण्यात येईल. याबाबत शनिवारी (दि. ९) पुणे येथे ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत सहकार बचाव परिषद आयोजित केली आहे, असे सांगितले.
‘भाज्यांची भाववाढ म्हणजे महागाई नव्हे’
गहू, तांदूळ, भाजीपाल्याचे भाव वाढणे म्हणजे महागाई नव्हे. एक किलो कांदा ५ माणसांना ५ दिवस पुरतो. कांद्याचे भाव २० रुपये झाले म्हणून ओरडणारी मंडळी चित्रपटाच्या तिकिटासाठी २५० ते ५०० रुपये खर्च करतात. डिझेल, पेट्रोल, साबण, मोटारसायकल, मोटारी आदींच्या किमती वाढल्या तरी ओरडत नाहीत असा आरोप खोत यांनी केला