लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांनी शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान बिहारमधील जागावाटपाबाबत उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवेल, अशी घोषणा पासवान यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्या पाश्र्वभूमीवर त्यांनी शनिवारी अडवाणी यांची भेट घेतली. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा असून त्यापैकी सात जागा भाजपकडून पासवान यांच्या पक्षासाठी सोडल्या जाणार असल्याचे संकेत आहेत. भाजप तेथे ३० जागा लढविणार असून उर्वरित तीन जागा उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पार्टीसाठी देण्यात येणार आहेत.
बिहारमधील रणनीती आखण्यासाठी पासवान येत्या काही दिवसांत अडवाणी तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा भेटणार आहेत, अशी माहिती भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिली. दरम्यान, बिहारमधील मुझफ्फरपूर येथे उद्या म्हणजे ३ मार्चला मोदी यांची सभा होत असून या वेळी पासवानही व्यासपीठावर असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.