देशभरात आलेल्या मोदी लाटेत प्रादेशिक पक्षांची धूळधाण उडाली आहे. ममता बॅनर्जी व  जयललिता यांनी अनुक्रमे पश्चिम बंगाल व तामिळनाडूत मोदी लाट रोखली. ओडिशातदेखील नवीन पटनायक यांच्यासमोर मोदी लाट लुप्त झाली. मावळत्या पंधराव्या लोकसभेत वीसपेक्षा जास्त खासदार पदरी बाळगणारे समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, द्रमुक या प्रादेशिक पक्षांची धूळधाण उडाली आहे. याशिवाय काँग्रेसशी युती केलेल्या राष्ट्रीय लोकदल, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल यांना मोदी लाटेचा जोरदार फटका बसला आहे. भारतीय जनता पक्षाने स्वबळावर जादूई आकडा पार केला असला तरी रालोआतील सहकारी पक्षांना सन्मानाने वागवले जाईल, अशी ग्वाही पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिली. याशिवाय रालोआत सहभागी होणाऱ्यांचे स्वागत केले जाईल, असेही ते म्हणाले.
    राज्यसभेत भाजपचे ४६ खासदार आहेत. कोणतेही महत्त्वाचे विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी हे संख्याबळ पुरेसे नाही. त्यासाठी भाजपला प्रादेशिक पक्षांशीच जुळवून घ्यावे लागेल. विशेष म्हणजे कलम ३७०, समान नागरी कायदय़ासारखी महत्त्वाची विधेयके  सर्वपक्षीय सहमतीशिवाय मंजूर होणे अवघड आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने सर्व पक्षांसाठी रालोआचे दरवाजे खुले केले आहेत. राज्यसभेत काँग्रेस-भाजप खालोखाल बहुजन समाज पक्षाचे १४, समाजवादी पक्ष व अण्णाद्रमुकचे दहा, तेलगू देसम पक्षाचे नऊ तर राष्ट्रवादी काँग्रेस व बीजेडीचे सहा सदस्य आहेत. याशिवाय डाव्यांकडे दहा खासदार आहेत. परंतु डावे पक्ष पाठिंबा देण्याची शक्यता नसल्याने भाजपला इतर पक्षांचीच मदत घ्यावी लागेल. त्यासाठी सर्वच प्रादेशिक पक्षांशी सकारात्मक संवाद साधण्यावर मोदींचा भर राहणार आहे. १९८४ नंतर पहिल्यांदाच काँग्रेसव्यतिरिक्त राष्ट्रीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी होणार नसल्याची चिन्हे आहेत.