राज्यातील पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहा मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानात तसेच देशाच्या अन्य भागांतही मुस्लिम मतदानाची टक्केवारी वाढल्याने सत्ताधारी काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. म्हणूनच राज्यातील उर्वरित दोन टप्प्यांतील मतदानाच्या वेळी अल्पसंख्याक बहुल परिसरात मतदानाची टक्केवारी आणखी वाढेल या दृष्टीने काँग्रेसकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणल्याने अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण होईल, असा अंदाज काँग्रेस नेत्यांना आधीपासूनच होता. देशात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत मुस्लिम मतदानाची टक्केवारी वाढली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भात झालेल्या मतदानात मुस्लिम मतदानाची टक्केवारी वाढली. राज्यात एकूण मुस्लिम मतांपैकी सरासरी ३० ते ३५ टक्के मतदान होते, असा अनुभव आहे. यंदा नागपूर, अकोला, अमरावती आदी मुस्लिमबहुल भागांत ५० ते ६० टक्क्यांपर्यंत मुस्लिमांचे मतदान झाले आहे. मुस्लिमांचे वाढीव मतदान हे काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदेशीरच ठरेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मोदी घटकामुळेच अल्पसंख्याक मतांचे मोठय़ा प्रमाणावर ध्रुवीकरण झाल्याची शक्यता वर्तविली जात
आहे.
उर्वरित दोन टप्प्यांमध्ये भिवंडी, धुळे, परभणी, औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, जालना, सोलापूर, मुंबई, रायगड आदी मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. या मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यांकाचे मतदान वाढल्यास त्याचा काँग्रेस आघाडीला फायदाच होईल, असे काँग्रेस नेत्यांचे गणित आहे. या पाश्र्वभूमीवर मुस्लिम मतदानाची टक्केवारी कशी वाढविता येईल याकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन करणाऱ्या नेत्यांनी याबद्दल खल केल्याचे समजते.
मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात सच्चर समितीच्या अहवालाची शिफारस करण्याकरिता शरद पवार यांनीच पुढाकार घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
वाढीव मुस्लिम मतदानामुळे एक-दोन टक्के मते फिरल्यास त्याचा काँग्रेस आघाडीलाच लाभ होऊ शकतो. म्हणजेच काठावर असलेल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होऊ शकते. मोदी यांच्यामुळे मुस्लिम मतांचे होणारे ध्रुवीकरण लक्षात घेऊनच राष्ट्रवादीनेही अल्पसंख्यांकाना खुश करण्यावर भर दिला.