लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लाट निकालानंतरच कळते. या वेळी नरेंद्र मोदी यांची लाट होती, आणि त्यामध्ये भले भले वाहून गेले. लाट असते तेव्हा बाकी सारे गौण ठरते, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले! १९८४ नंतर पहिल्यांदाच देशात स्पष्ट बहुमत घेऊन येणारा नेता मोदी यांच्या रूपाने पंतप्रधान होतो आहे!
‘सबका साथ, सबका विकास’ असा नारा नरेंद्र मोदी यांनी दिलाय. गेल्या वर्षी गोव्यातील एका सभेत जनतेसमोर केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत ‘काँग्रेस मुक्त भारत निर्माण’ असा संकल्प मांडला होता!
काँग्रेसमुक्त भारत!
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने सन १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. ज्या काँग्रेसला १९८४ मध्ये अवाढव्य बहुमत मिळाले होते त्याच काँग्रेसला ३० वर्षांनी विरोधी पक्षाचा दर्जा देखिल उरला नाही!
‘काँग्रेसमुक्त भारत हा भाजपचा नारा नव्हे, हा तर जनतेचा सुद्धा संकल्प’ या थाटात लोकांनी स्पष्ट कौल दिला. मात्र, केरळ, ओरिसा, पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व कायम राहिले! ओरिसा, पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांतील प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यांवरील पकड कायम ठेवली!
तीन देवियाँ
मायावती, जयललिता आणि ममता बॅनर्जी या भारतीय राजकारणातील स्वयंभू नेत्या! या तिघींपैकी कोण किंगमेकर बनणार, याची जोरदार चर्चा अगदी हल्लीपर्यंत सुरु होती! जयललिता यांना किंगमेकर होण्यापेक्षा क्वीन होण्यात जास्त रस होता! मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाची मात्र पुरती दुर्दशा झाली. देशात एकही जागा निवडून न येण्याची घनघोर नामुष्की पक्षावर ओढवली! तसेच आजच्या राजकीय स्थितीत उत्तम यश मिळूनही ममता आणि जयललिता यांना राजधानीत काही काम उरले नाही!
अमेरिका आणि इंग्लंड यांच्यासह अनेक बड्या देशांचा घुमजाव
२००२ च्या दंगलीचा ठपका ठेवून अमेरिका आणि इंग्लंड यांनी मोदींना व्हिसा देणार नाही, असे सांगितले होते. भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होणार, हे स्पष्ट होताच अमेरिका आणि इंग्लंड यांच्यासह अनेक बड्या देशांचा सूर बदलला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही स्वागत करू, असे ओबामा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले! असाच सूर डेव्हिड कॅमरून यांच्या वक्तव्यात सुद्धा दिसून आला! अमेरिका आणि इंग्लंड यांच्यासह युरोपीय देशांनीही मोदींचे आपापल्या देशात स्वागत करण्याचे संकेत दिले!
पाकिस्तानातील उर्दू भाषिक आणि इंग्रजी भाषिक अशा दोन्ही प्रकारच्या दैनिकांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय लोकसभेच्या निकालांना पहिल्या पानावर स्थान दिले. तसेच मोदी यांच्या परराष्ट्रविषयक भूमिकांचे चीनकडून कौतुक करण्यात आले!
लोकसभेचे निकाल पाहिल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर येथे भाजप समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. ‘मोदी लाट’ आल्यामुळे अमेरिका, इंग्लंड, युरोप आणि इतर देशांमधील मधील अनिवासी भारतीयांच्या चेहऱ्यांवर एक आगळा-वेगळा आनंद ओसंडून वाहत आहे! तसेच त्यांच्या मनात ‘मोदी सरकार’ बद्दल कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.
‘मोदी लाट’ – अनिवासी भारतीयांचे विचार
अनिवासी भारतीयांचे म्हणणे आहे मोदी युगाच्या उदयानंतर निर्णय प्रक्रिया संसदीय मंडळाऐवजी मोदी, राजनाथसिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी आणि अमित शहा यांच्याकडेच राहू देत!
मोदी यांच्या ‘गुजरात मॉडेल’ची जशी देशभरात चर्चा आहे अगदी तशीच चर्चा विदेशात आणि खास करून अनिवासी भारतीयांमध्ये रंगत आहे! ‘गुजरात मॉडेल’ भारतासाठी लागू पडणार नाही असे अनेकांचे मत आहे! अनिवासी भारतीयांच्या मनात काही प्रश्न आहेत, जसे भ्रष्टाचार, महागाई, विकास यावर मोदी सरकार मात करू शकेल का? मोदी सरकार लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करू शकेल का? मोदी सरकार नवीन नोकऱ्याची निर्मिती करण्यात सफल होईल का? कडक शासन आणि भारताचे आंतरराष्ट्रीय/परराष्ट्रीय धोरण काय राहील?
सोशल मीडियावर अनिवासी भारतीयांमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि कमाल खान यांनी ‘नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास मी देश सोडेन’ बद्दल चर्चा सुद्धा रंगली! तसेच अनिवासी भारतीयांचे म्हणणे आहे की आज व्हॉट्सअॅप, फेसबुक व ट्विटरवरून सोनिया-राहुल यांची मस्करी करणाऱ्या व मोदी नामाचा जप करणाऱ्यांना नवनव्या उपमा सुचू लागतील!
काँग्रेसचा मनमोहन सिंग यांच्यावर अन्याय
पंडित नेहरू यांच्यानंतर पाच वर्षांचे दोन कालावधी पूर्ण करणारे पंतप्रधान म्हणजे डॉ. मनमोहन सिंग. अमेरिकेसोबतचा अणुकरार, माहितीचा अधिकार, आधार कार्ड, महामार्ग, ग्रामीण रोजगार आणि आरोग्य योजना, परदेशांशी उत्तम संबंध हे मनमोहन सिंग यांचे योगदान विसरून चालणार नाही!
पण याच मनमोहन सिंग यांचे दुर्दैव असे की, ज्या काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांनी यूपीएचे नेतृत्व केले त्याच पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. लोकसभेच्या प्रचारात काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख कुठेही केला नाही!
दिशाहीन काँग्रेस
कुठलाही राजकीय अनुभव नसलेल्या पक्षाबाहेरच्या लोकांना काँग्रेस पक्षात अनन्यसाधारण महत्त्व दिले गेल्यामुळे अनेक नेते दुखावले गेले. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची निवडणूक लढण्याची, लढवण्याची रणनितीही पूर्णपणे चुकीची आणि निष्प्रभ ठरली. परिणामी मोदींच्या प्रखर प्रचारापुढे अवसान गळालेल्या दिशाहीन काँग्रेसचा सर्वत्र धुव्वा उडाला!
… आणि कमळ उमलले!
मॅडम-जी, टू-जी, थ्री-जी, सीडब्ल्यूजी, राहुल के जीजाजी आणि समोर आलेले अनेक घोटाळे काँग्रेसला चांगलेच भोवले! काँग्रेस व त्यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारविरुद्ध जनमानसात असलेल्या नाराजीची तीव्रता या निकालात प्रतिबिंबित झाली. यूपीए सरकार असताना इतका चिखल निर्माण झाला होता की कमळ उमलण्यावाचून पर्यायच उरला नाही …!
– केदार लेले, लंडन
lele.kedar@gmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)