अखेर भारतीय जनता पक्षाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आणि काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही नवसंस्थानिकांची निर्मिती करण्यावर शिक्कामोर्तब केले. जळगाव जिल्ह्यातील सत्तापदे एकनाथ खडसे यांच्या घरातच राहावीत, असा धोरणात्मक निर्णय जणू पक्षाने घेतला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार महाराष्ट्रात लोकशाही असली आणि वरपांगी तरी हे पुरोगामी राज्य असले, तरी घराणे हेच येथील जनतेच्या मानसिकतेचा भाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
असं म्हणतात, की महाराष्ट्राचे राजकारण मोजकी घराणी चालवतात. बहुतांशी नेत्यांचे एकमेकांशी असलेले नाते पाहिले तरी या विधानाची सत्यता पटते. खुद्द शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हेच एकमेकांशी जोडलेले आहेत, तेव्हा अन्य छोट्या मोठ्या सग्या-सोयऱ्यांबद्दल तर विचारायलाच नको. त्यामुळे सत्तेची देवी कशीही फिरली तरी तिने आपला उंबरठा ओलांडू नये, याची तजवीज या सर्व मंडळींनी केली आहे.
गंमत म्हणजे एरवी निवडणुकीच्या काळात जातवार गणिते मांडणाऱ्या या मंडळींना असे लागेबांधे तयार करण्यासाठी जात, पक्ष किंवा धर्म आड येत नाही. त्यामुळेच फारूख अब्दुल्लांची मुलगी सचिन पायलट यांच्याशी लग्न करते आणि मेव्हणे असलेल्या प्रमोद महाजनांच्या नंतर त्यांची कन्या पूनम यांची सोय लावण्यासाठी मुंडे आपली राजकीय कारकीर्द पणाला लावतात. एरवी काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून तयार असतात, मात्र, बांधकाम व्यावसायिक आणि राष्ट्रवादीचे खासमखास अविनाश भोसले यांचे जावई असलेल्या विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी खुद्द अजित पवार व सुप्रिया सुळेंपासून सर्व खाशी मंडळी हिरीरीने उतरली आहेत. इतकेच काय, रामराजे निंबाळकराचे जावई असलेल्या व कालपर्यंत इर्षेने शिवसेनेची बाजू वाहिन्यांवर मांडणाऱ्या राहुल नार्वेकरांना राष्ट्रवादीने एका फटक्यात स्वतःमध्ये सामील करून घेतले आणि उमेदवारीही दिली.
बिचारे डॉ. विजयकुमार गावित. आतापर्यंतच्या सत्ताधारी कुळांमध्ये सामील होण्याचा प्रयत्न या आदिवासी नेत्याने केला आणि त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. भाजपचे नेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेण्यास मात्र काही आडकाठी येत नाही.
नव्वदीच्या दशकात राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसमधून बाहेर पडून युती शासनाशी घरोबा केला आणि पुढच्याच बारीला परत स्वगृही आले. त्याचप्रमाणे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हेही १९९५ पासून प्रत्येक मंत्रिमंडळाचा भाग आहेत. लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक काँग्रेसचे मोठे नेते होते आणि विधान परिषदेचे कित्येक वर्षे सभापती होते. त्यांच्या सून मुक्ता टिळक आज भाजपच्या नगरसेविका आहेत. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर अजूनही काँग्रेसमध्ये असले, तरी त्यांची सून व मुलगा भाजपमध्ये आहेत. काँग्रेसचे बलाढ्य मानले जाणारे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यानंतर शालिनीताई पाटलांनी अनेक ठिकाणी चाचपणी केली. मात्र, त्यांच्या पदरी काही सत्तेचा लाभ आला नाही. नंतर मदन पाटील यांना मंत्रिमंडळात घेऊन सत्तेचा वनवास संपविण्यात आला. राष्ट्रवादीच्या दत्ता मेघे यांच्या मुलाने, सागर मेघेने, गेल्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे भाजपशी घरोबा केला, विधान परिषदेचे तिकिट मिळविले आणि नंतर वारा फिरल्यावर काँग्रेसचा रस्ता धरला.
स्वातंत्र्याच्या दोन दशकांनंतरच राष्ट्र उभारणी, नवमतवाद इत्यादी बाबी मागे पडल्या आणि इंदिरा गांधी यांच्या रुपाने पहिल्यांदा काँग्रेसमध्ये घराणेशाही शिरली. तो प्रवाह पुढे वाढतच गेला. देशात अजून नदीजोड प्रकल्प पूर्ण झालेला नसला, तरी तो गंगा जमनी ओघ महाराष्ट्रात केव्हा शिरला आणि त्याचा प्रवाह केव्हा झाला, हेही समजले नाही.
ही परंपरा आपण एवढ्या सहजपणे स्वीकारली आहे, की अशोक चव्हाण यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अर्ज भरणार किंवा सुरेश कलमाडींच्या जागी त्यांच्या पत्नी अपक्ष म्हणून अर्ज भरणार, अशा चर्चा आपण अगदी सहजपणे करतो व स्वीकारतो. तीन चार पिढ्या खासदारकी व आमदारकी उपभोगणारी मंडळी पाहिल्यानंतर लोकशाही म्हणजे नक्की काय असते, असा प्रश्न पडतो.
ब्रिटीशांच्या साम्राज्यावर ज्या प्रमाणे सूर्य मावळत नसे, त्या प्रमाणे या घरांनी सत्तेचा विरह कधी अनुभवलाच नाही. जनतेनेच सूज्ञपणाने यावर काही तरी मार्ग काढावा, असे म्हणायचीही सोय नाही कारण जनेतेनेच ही घराणेशाही पोसली आहे. अन्यथा विलासराव देशमुख असताना खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष अशी सगळी सत्तापदे एकाच घरात पाणी भरताना दिसली नसती. उत्तर प्रदेशात सध्या मुलायमसिंग पंतप्रधानपदासाठी बाशिंग बांधून बसलेले, त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री आणि बंधू राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असे चित्र दिसले नसते. करुणानिधी, फारुख अब्दुल्ला, शरद पवार, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे अशी सगळी ख्यातनाम मंडळी याच आजाराने पछाडलेली दिसतात ती केवळ त्यांना जनतेचा पाठिंबा असल्यामुळेच.
तेव्हा या निवडणुकीतही आपण मतदान करू ते एखाद्या घराण्यातील एका पक्षाच्या माणसाला काढून दुसऱ्या पक्षाच्या सदस्याला निवडून आणण्यासाठीच!
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)