हॅलो, मला उमेदवार व्हायचंय. काहीही करून, कसंही करून मला लोकांकडे जायचंय, मतं मागायला! तसा मी लोकांच्या मताला फारशी किंमत देत नाही, पण निवडणुकीत जिंकायचं म्हणजे मतं मागावी लागतात. म्हणून मला मतांची भीक म्हणा, दान म्हणा मागण्यासाठी जायचंय. नवरात्रात कसं देवीच्या नावाने जोगवा मागतात, त्यामुळे कोणी भिकारी होतं का? मग लोकशाही देवीच्या नावाने मतं मागितल्याने मी काय भिकारी होतो का?
…तर त्यासाठी हवी उमेदवारी. कुठल्याही पक्षाची चालेल. काँग्रेस म्हणू नका, ‘राष्ट्रवादी’ म्हणू नका, सेना-भाजप, गेला बाजार मनसेसुद्धा…हे आपलं एक चाल म्हणून म्हणालो, नाही तर बाजारचा शब्दशः अर्थ घेईल कोणी. यांच्यापैकी कोणी नाही तर ‘आप’ देईल आणि ‘आप’नेही दिला दगा तर बाप देईल. अरे, स्वतःच्या ताकदीवर अपक्ष म्हणून उभा राहील मी. एका खिशात थैली आणि दुसऱ्या खिशात तरुणांचे तांडे घेऊन फिरतो मी…
….पैशांचा प्रश्न? काय संबंध? आतापर्यंत या लोकांना पैसा कोण पुरविला? बक्कळ पैसा मी खर्च करू शकतो. मी म्हणतो, यांना पैसे देण्यापेक्षा मीच का निवडणूक लढू नये? किती दिवस जयंत्या, मयंत्या, वाढदिवस आणि पुरस्कारांच्या वेळेस फ्लेक्स लावून शहर भरायचं. स्वतःच्याच नावाची मित्र मंडळे काढून रिकामटेकड्या तरुणांना पोसायचं? मी एकदा खासदार झालो, म्हणजे या बेकारांनाही काम मिळेल ना! आणि कसं आहे, आता दावा केला म्हणजे समजा लोकसभेला नाही जमले, तर विधानसभेसाठी तरी आपलं नाव रिंगणात राहतं…
…असं पाहा, आपली भूमिका म्हणजे क्लिअर आहे. जनतेचं भलं करण्याकरीता देशात म्हणा, राज्यात म्हणा स्थिर सरकार पाहिजे, असा माझा आग्रह आहे. विकास माझा श्वास आहे आणि सत्ता हा विकासाचा ऑक्सिजन आहे. म्हणून सत्तेवर असलेल्या सर्व पक्षांना माझा पाठिंबा असतो. धंद्याच्याही (माझ्या व त्यांच्याहीļ) निमित्ताने सर्व नेत्यांशी माझे घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे सर्व पक्षांशी माझी मैत्री आहे. उगाच नाही मला अजातशत्रू म्हणत. गेल्या दहा वर्षांत तर ज्याला म्हणून स्वतःचे गव्हर्नमेंट टिकवायचे होते, त्याने माझी मदत घेतली. मीही आपला खारीचा वाटा उचलला.
…शिवाय उमेदवारी मिळणार असेल तर जातीयवादालाही माझा कडाडून विरोध असणार आहे. जातीय शक्तींना आपल्यामुळे मदत होऊ नये, यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांशी जुळवून घेण्याचे माझे धोरण आहे. परंतु, अशा पक्षांमध्ये मी असलोच किंवा त्याला पाठिंबा देत असलो, तर त्यांचा जातीयवाद कमी करण्याचे कामही मी करतो. सामाजिक समता, सशक्तीकरण, पुरोगामी विचार वगैरे सगळे अवघड शब्द मला तोंडपाठ आहेत. ती बोलताना माझी जीभ जराही कचरत नाही.
…हो, आणि सामाजिक क्षेत्रात मी किती काम केलंय. किती पुरस्कार दिले, किती गल्ली भूषण निर्माण केले, किती गौरी गणपती आरास स्पर्धा घेतल्या आणि किती जणांना मोफत फिरविलं, म्हणजे यात्रांवर फिरवून आणलं, याची तर गणतीच नाही. मी सदैव कार्यरत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्री शुद्धीवर असेपर्यंत मी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तयारच असतो. पूर्वी एका पायावर असायचो. पण आता सहसा गाडीखाली (इम्पोर्टेड) उतरत नसल्याने गाडीतच तयार असतो. काही वेळेस, समस्या कमी पडू लागल्या तर केवळ सोडविण्यासाठी म्हणून मी नव्या समस्या निर्माण करतो.
हां…म्हणून मला उमेदवार व्हायचंय. गुडघ्याला बाशिंग बांधून मी तयार आहे. फक्त या पक्षांनी मला ‘आगे बढो’चा हुकूम द्यावा. बस, माझी गाडी निघालीच म्हणून समजा…आणि या पक्षांनी मला उमेदवादी नाही दिली, तर मी म्हणेल,
तू नही तो और सही
और नही तो और सही….
-देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)