महायुतीत आता पाच पांडव आहेत. सहाव्याची गरज नाही, असे सांगत महायुतीसाठी आता दारे बंद झाली हे विधान करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच ‘शिवसंग्राम’च्या विनायक मेटेच्या रुपात सहाव्या पांडवाला महायुतीत प्रवेश दिल्यामुळे शिवसेनेतच प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
राज्यात युतीची सत्ता असताना विनायक मेटे काहीकाळ सेना-भाजपबरोबर होते. तथापि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला. जातीपातीच्या राजकारणाला-आरक्षणाला शिवसेनाप्रमुखांनी कायमच विरोध केला होता. त्याचाच आसरा घेत छगन भुजबळ यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली तर मेटेंनीही मराठी आरक्षणाच्या नावाखाली शिवसेनेवर वेळोवेळी टीका केली. त्यामुळे मेटे यांच्या प्रवेशाला ‘मातोश्री’वरील बैठकीतच शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्यापासून खासदार संजय राऊत यांच्यापर्यत सर्वच नेत्यांनी मेटे यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध केल्यामुळे मेटे यांचा रंगशारदातील महायुतीप्रवेश एक दिवस लांबला होता. तथपि भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहामुळे बाळासाहेबांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर पाणी सोडत मेटे यांना महायुतीत सामावून घेण्यात आले एवढेच नव्हे तर ‘शिवसंग्राम’ला अपेक्षित असलेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनीच दिल्यामुळे शिवसेना नेत्यांची मोठीच अडचण झाली आहे.
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक आणि मराठा आरक्षणाची भूमिका घेऊन उद्धव ठाकरे चालणार का, असा सवाल सेनेतूनच उपस्थित करण्यात येत आहे. विनायक मेटे यांना महायुतीत घेतल्यामुळे शिवसेनेत जातीपातीच्या राजकारणाचा शिरकाव होईल, अशी भीती सेनेच्या एका नेत्याने व्यक्त केली. मेटे हे राष्ट्रवादीतही टाकाऊ झाले होते अशा मेटेंना मोठे करण्याने शिवबंधनाचे धागे मजबूत कसे होणार असा ‘रोखठोक’ सवालही एका नेत्याने केला. ज्या मेटे यांनी शिवसेनाप्रमुखांवर टीका केली होती त्याच मेटेंना महायुतीच्या व्यासपीठावर बसविण्याच्या उद्धव यांच्या निर्णयामुळे शिवसेनेतच तीव्र नाराजी निर्माण झालेली दिसते.