scorecardresearch

Premium

एकच वादा…(यंदाही) शिवाजीदादा?

पश्चिम महाराष्ट्रात जे काही लक्षवेधी मतदारसंघ आहेत, त्यापैकी एक म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ…

एकच वादा…(यंदाही) शिवाजीदादा?

सकाळी साडेनऊची वेळ… मंचरपासून अवघ्या ७-८ किलोमीटरवर असलेल्या लांडेवाडी गावातील मुख्य रस्ता… शिवसेनेचे खासदार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवनेरी बंगला… बंगल्याच्या भल्या मोठ्या हॉलमधील तीन भले मोठे सोफासेट्स वेगवेगळ्या गावांतून आलेल्या लोकांनी भरलेले… सगळेजण दादांची म्हणजेच शिवाजीराव आढळराव पाटील यांची वाट पाहात बसलेले… हॉलमधल्याच दुसऱया बाजूला दादांचे सहायक आलेल्या प्रत्येकाची भेट घेऊन त्याचे नक्की काम काय आहे, ते समजून घेत असतात… कोणाला दादांपर्यंत जाण्यास परवानगी द्यायची आणि कोणाचे काम स्वतःच्या स्तरावर मार्गी लावायचे याचे नियोजन त्यांच्याकडून सुरू असते… इतक्यात वरच्या मजल्यावरून थेट हॉलमध्ये उतरणाऱया जिन्यावरून शिवाजीराव खाली उतरतात… ते खाली येताहेत हे पाहताच काहीजण लगेचच त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्यासोबतच अभ्यागत कक्षात जातात… शिवाजीराव खाली आलेले असल्यामुळे प्रत्येकाचीच त्यांना भेटण्यासाठी लगबग सुरू होते… थोड्याच वेळात ते प्रचारासाठी निघणार असल्यामुळे प्रत्येकजण शक्य तितक्या लवकर त्यांना भेटून घेण्यासाठी प्रयत्नशील असतो… त्यातच काही बहुरुपीही त्यांना भेटण्याच्या प्रयत्नात असतात… खरंतर त्यांचं काम दादांचे सहायकही करू शकणार असतात… मात्र, त्यांना दादांचीच भेट घ्यायची असते… यामुळे सहायक आणि बहुरुपी यांच्यामध्ये हलकीशी वादावादी होते… एक मागून एक जण दादांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीमध्ये जात असतो आणि काही मिनिटांतच लगेचच बाहेर पडत असतो… प्रचारासाठी नियोजित गावाला निघायचे असल्यामुळे दादाही पटापट प्रत्येकाचे नेमके काम काय आहे… त्यावर तातडीने काही करता येईल का, याचा विचार करून कामांचा पटापट निपटारा करीत असतात… घड्याळाचा काटा सव्वादहा वाजायला आल्याचे सूचित करतो… सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यावर दादा त्यांच्या खोलीतून बाहेर पडतात… बंगल्याच्या बाहेर दादांच्या ताफ्यातील गाड्या तयारच असतात… गाडीत बसेपर्यंत दादा सहायकांना पुढच्या कामांचे नियोजन सांगत असतात… या सगळ्यामध्ये सारखा वाजणाऱा मोबाईल उचलून ते पलीकडच्या व्यक्तीला काही सूचना करीत असतात… दौऱयासाठी निघण्याची सर्व तयारी झाल्याचे लक्षात येताच दादांच्या ताफ्यातील गाड्या ‘शिवनेरी’तून एक मागून एक मार्गस्थ होतात…
पश्चिम महाराष्ट्रात जे काही लक्षवेधी मतदारसंघ आहेत, त्यापैकी एक म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ… म्हटलं तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला… कारण या मतदारसंघात येणाऱया सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार… म्हणजे आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, खेडमधून दिलीप मोहिते, शिरूरमधून अशोक पवार, जुन्नरमधून वल्लभ बेनके आणि भोसरीतून विलास लांडे (अपक्ष म्हणून निवडून आलेले असले तरी आहेत राष्ट्रवादीचेच, इथलं शेंबडं पोरसुद्धा हेच सांगेल) एकट्या हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे महादेव बाबर आमदार आहेत. पाच आमदार राष्ट्रवादीचे आणि एक शिवसेनेचा असतानाही शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरुद्ध लोकसभेसाठी मतदार देताना राष्ट्रवादीची दमछाक झाली. आमदारांनी दादांविरोधात लढण्यास काय काय कारणे देऊन नकार केला, याच्या सुरस बातम्या संपूर्ण जिल्ह्याने वाचलेल्या. कोणताच आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार नसल्यामुळे अखेर राष्ट्रवादीने फारसे चर्चेत नसलेले देवदत्त निकम यांना उमेदवारी जाहीर केली. शिवाजीराव यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचे पाचही आमदार एकत्र आले आहेत… ज्या विधानसभा मतदारसंघातून निकम यांना आघाडी मिळेल, तिथल्याच आमदाराला येत्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचा विचार केला जाईल… मताधिक्य न मिळवून देणाऱया राष्ट्रवादीच्या आमदारांचे तिकीट पक्ष कापणार… असा इशारा अजित पवार यांनी दिल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत चर्चेत आहेत… या सगळ्यामुळे हा मतदारसंघ लक्षवेधी बनला आहे.
दिवसभरात शिवाजीराव यांच्या जुन्नर, घोडेगाव, शिक्रापूर, कात्रज अशा चार ठिकाणी जाहीर सभा असतात… नारायणगाव, मंचर इथे पदयात्राही असते… विशेष म्हणजे त्यांच्या दौऱयात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे सहभागी होणार असतात. पहिली सभा जुन्नरमध्ये. जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात हजारो लोक जमलेले… काहींच्या हातात पक्षाचा झेंडा तर काहींच्या मनगटात पक्षाने बांधलेला शिवबंधन धागा… वरून सूर्यदेव आग ओतत असताना, शिवसैनिक शांतचित्ताने व्यासपीठावरून बोलणाऱया स्थानिक नेत्यांचे भाषण ऐकण्यात दंगलेले… इतक्यात सभेच्या ठिकाणी शिवाजीराव आणि कोल्हे यांचे आगमन होते… त्यांच्या विजयाच्या आणि पक्षाच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्यानंतर सभेतील वक्त्यांची भाषणे पुन्हा सुरू होतात… एका मागून एक नेता शिवाजीरावांचे वेगळेपण, त्यांनी केलेली कामे, जुन्नरचा विकास इत्यादी मुद्द्यांवर बोलतो… प्रत्येकजण आपल्या भाषणात सुपारीबहाद्दराचा उल्लेख आवर्जून करतोच… गेल्या आठवड्यात याच ठिकाणी राज ठाकरे यांचीही सभा झालेली… त्यांनाच उद्देशून प्रत्येकजण सुपारीबहाद्दर असा शब्द वापरत असतो… समोर जमलेला समुदायही सुपारीबहाद्दर या संज्ञेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतो… शिवाजीराव आपल्या भाषणात जुन्नरच्या विकासासाठी केलेल्या कामांचा पाढाच वाचतात… सभेला येताना ते पुरावेच घेऊन आलेले असतात… त्यामुळे कोणाला पुरावे बघायचे असतील, तर केव्हाही या, असे आव्हानच ते विरोधकांना देतात. शिवाय आपल्यावर आरोप करणाऱयांनी समोरासमोर चर्चेला यावे आणि मगच आरोप करावेत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी केव्हाही तयार असल्याचेही ते ठणकावून सांगतात… सुमारे ३५ मिनिटांच्या संयमी भाषणात ते विरोधकांच्या टीकेचा मुद्देसूद समाचार घेतात… यानंतर अमोल कोल्हे हेसुद्धा आपल्या भाषणात सत्ताधाऱयांवर तुटून पडतात… सत्ताधाऱय़ांनी केलेल्या कामांचा आणि आपल्या धोरणाचा प्रचार केला पाहिजे, अशी अपेक्षा असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले केवळ विरोधकांवर टीका करण्यातच धन्यता मानत असल्याबद्दल ते कडवट शब्दांत प्रहार करतात… त्यांच्या निशाण्यावर राज ठाकरेही असतात… पक्षात येण्यासाठी आपल्याला कशी लालूच दाखविण्यात आली आणि आपण त्याला कसा विरोध केला, याचीही माहिती ते देतात… सुपारी घेण्यातच ते कसे ‘ग्रेट’ आहेत, याचीही उजळणी केली जाते… लोक घरात कुत्री पाळतात, मांजरी पाळतात, गाई-म्हशीही पाळतात, काहीजण घोडेही पाळतात, अगदीच प्रेम असेल तर हत्तीही पाळतात… पण घरात कोणी वाघाला पाळत नाही, असे सांगत ते राज ठाकरेंवर हल्ला चढवतात… नऊ महिन्यात बाळंही जन्माला येते पण सात वर्षे झाली तरी अजून ब्लू-प्रिंट जन्माला आलेली नसल्याचे सांगत ते मनसेचे दुखऱया नसेवर नेमकेपणाने बोट ठेवतात… अधूनमधून ते शिवाजी महाराज आणि इतिहासाचे दाखलेही देतात… अमोल कोल्हे हे स्वतः जुन्नरचे सुपूत्र… त्यामुळेही त्यांना उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळतो…
जुन्नरपासून साधारणपणे २५ किलोमीटरवर असलेल्या घोडेगावमध्ये शिवाजीरावांची दुसरी सभा असते… घोडेगाव म्हणजे आंबेगाव तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण… तालुक्याची सर्व प्रशासकीय कार्यालये घोडेगावमध्ये… घोडेगावमधील सभेतही स्थानिक नेते शिवाजीरावांचे कौतुक करणारी भाषणे करतात… पण या सगळ्यांमध्ये लक्षात राहते ते प्रा. राजाराम बाणखेले यांचे भाषण… बाणखेले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाहुणचार घेऊन शिवसेनेत परतलेले नेते… राष्ट्रवादीचे राज्यातील नेते स्थानिक नेत्यांना कशी हीन वागणूक देतात… दिलीप वळसे-पाटलांनी तालुक्याचे कसे नुकसान केले… याचा पाढाच ते आपल्या भाषणात वाचतात… उपस्थितही त्यांच्या भाषणाचा मनापासून आनंद घेतात… भाषणे थोडक्यात आवरण्याचे आवाहन सूत्रसंचालक स्थानिक नेत्यांना सातत्याने करीत असताना, बाणखेले यांचे भाषण बराच वेळ चालते… राष्ट्रवादीवर ते एकामागून एक बाण सोडत असल्यामुळे त्यांना थांबविण्याचा कोणाचाच प्रयत्न नसतो… बाणखेलेंचे भाषण सभेच्या आकर्षणाचा बिंदू बनते… त्यानंतर पुन्हा एकदा शिवाजीराव आपल्या नेहमीच्या शैलीत राष्ट्रवादीवर हल्लाबोल करतात… दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांना या सभेत लक्ष्य केले जाते… अजित पवार यांच्यावरही अधूनमधून टीकेचे बाण सोडले जातातच… सभा संपण्यापूर्वी शिवाजीरावांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले जाते…
अहमदनगर रस्त्यावरील शिक्रापूरमध्ये संध्याकाळी पाच वाजता तिसऱया सभेची वेळ ठरलेली असते… मात्र, दुपारचे जेवण त्यानंतर पुन्हा काही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हे सगळं उरकून घोडेगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण अंतर कापून शिक्रापूरला येईपर्यंत सव्वासहा वाजलेले असतात… स्वागत वगैरे झाल्यानंतर लगेचच सभेला सुरुवात होते… जुन्नर किंवा घोडेगाव यापेक्षा इथल्या सभेतील मुद्दे थोडे बदललेले असतात… शिक्रापूर हे जरी गाव असले, तरी इथून जवळच रांजणगाव, सणसवाडी इथे एमआयडीसी असल्यामुळे शेतकऱयांबरोबरच कामगारांचे प्रश्नही इथे तितकेच महत्त्वाचे असतात… शिवाजीराव आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच कामगारांच्या मुद्द्यालाच हात घालतात… कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी सेवेत घेण्यासाठी राज्य सरकारने काहीच उपाय केले नाहीत, याकडे ते लक्ष वेधतात. कामगारांच्या कल्याणाचा विषय ऐरणीवर घेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर ते पुन्हा एकदा तोफ डागतात… निकम यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीची नेत्यांची फौज उतरली आहे. माझ्याकडे अशी फौज नसल्याचे सांगत, माझ्यामागे सामान्य माणसांची फौज असल्याचे भावनिक नाते जोडण्याचा ते प्रयत्न करतात… इथून पुढे कात्रजच्या सभेसाठी जायचे असल्यामुळे नेमके मुद्दे मांडून शिवाजीराव आपले भाषण आटोपते घेतात आणि पुढच्या सभेसाठी रवाना होतात…

पहिल्यांदा खेडमधून आणि नंतर शिरूरमधून सलग दोन वेळा लोकसभेवर गेलेले शिवाजीराव यंदा पुन्हा निवडून आल्यास खासदारकीची हॅटट्रिक करतील. एकीकडे त्यांचे प्रमुख विरोधक केवळ शिवाजीरावांना विरोध करीत असताना, स्वतःच्या उमेदवाराबद्दल काहीच बोलत नसल्याचे वेगवेगळ्या ठिकाणी सभेला आलेल्या लोकांशी बोलल्यावर कळते. जुन्नरमधील कांदा उत्पादक शेतकरी मच्छिंद्र चव्हाण म्हणतात, निकम हे केवळ आंबेगावचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर पक्षाने उमेदवारी लादलेली आहे. त्यांच्यापेक्षा शिवाजीरावांनी मतदारसंघात कामे केलेली आहेत. सभांमध्येही स्थानिक नेते हाच मुद्दा मांडतात. शिवाजीरावांविरुद्ध लढायचे होते, तर राष्ट्रवादीने एखाद्या स्थानिक आमदाराला का तिकीट दिले नाही, असा प्रश्न भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते विचारतात. शिरूर लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण प्रचारच याच मुद्द्याभोवती फिरत असल्याचे दिसते. स्वतः शिवाजीरावही आपला प्रतिस्पर्धी तुल्यबळ नसल्याचे सांगतात. शिवाजीरावांना राष्ट्रवादीचे निकम यांनी खरंच टक्कर दिली की नाही, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल, तोपर्यंत नानाविध शक्यतांची चर्चा सुरूच राहिल, हे नक्की.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-04-2014 at 01:15 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×