भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा मुखवटय़ाआड दडवून आणि देशाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर उपाय असलेले जादूगार आहेत असे भासवून मोदी यांचा उदो उदो केला जात असल्याची टीका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळून सोनिया गांधी यांनी गुजरात विकासाच्या प्रारूपावरही टीका केली. काही जणांना छोटय़ा गोष्टींचा गाजावाजा करण्याची सवयच असते, अन्य कोणत्याही राज्यांमध्ये चांगले कामच झाले नाही, असा आवही आणला जातो, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.सध्या देशभर मोठय़ा आणि खर्चीक जाहिराती लावल्या असून त्याद्वारे सत्य दडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर मुखवटा चढवून त्याचा जादूगार म्हणून उदो उदो केला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.
अमित शहांवरही टीका
जातीयवाद पसरविणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली. नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांचे ‘सूड’ घेण्याचे वक्तव्यही याच कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी आहे, असेही त्या म्हणाल्या.
