काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज(बुधवार) रायबरेली मतदार संघातून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण ९ कोटी २८ लाखांची संपत्ती असल्याचे यात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, त्यांनी राहुल गांधी यांना ९ लाखांचे कर्ज दिले असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. सोनिया गांधींची २ कोटी ८० लाखांची जंगम मालमत्ता आणि ६ कोटी ४७ लाखांची स्थावर मालमत्ता अशी एकूण मिळून ९ कोटी २८ लाखांची संपत्ती आहे. तसेच सोनियांकडे स्वत:ची कार नाही.
मागील लोकसभा निवडणूकीवेळी सोनियांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेच्या आकडेवारी पेक्षा यावेळीची आकडेवारी सहा पटींनी वाढली आहे. काँग्रेसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या वेळेस प्रतिज्ञापत्रात सोनियांच्या मालमत्तेची नोंद पुस्तकी मूल्याला अनुसरून दाखल केली होती मात्र, यावेळी नव्या नियमांच्या आधारे बाजारभावानुसार मालमत्तेची नोंद करण्यात आल्यामुळे याआधीच्या आणि सध्याच्या नोंदीत सहा पटींची तफावत दिसत आहे.