निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांचा तोल जाऊन उचलली जीभ लावली टाळ्याला याचा प्रत्यय येत आहे. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशातील मंत्री आझम खान यांनी रामपूर या आपल्या गावातील सभेत मोदींचा उल्लेख कुत्र्याच्या पिल्लाचा मोठा भाऊ असा केला. तर काँग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी मोदींचा संघाचे गुंड म्हणून संबोधले तर राजनाथ सिंहांना मोदींचा गुलाम म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.
नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात वाकयुद्ध रंगलेले असताना आता आझम यांच्या वक्तव्याने वाद आणखी वाढला आहे.
काँग्रेस नेते बेनीप्रसाद वर्मा यांनी सदुल्लानगर येथील जाहीर सभेत मोदींचा उल्लेख संघाचा मोठा गुंड असा केला. संघानेच गांधीजींचा खून केला असा आरोपही त्यांनी केला. संघ आणि भाजपचा देशाला धोका असल्याचे भाकीतही वर्मा यांनी वर्तवले. राजनाथ सिंह यांच्या संमतीशिवाय मोदी पंतप्रधापदाचे उमेदवार होणे शक्य नाही. त्यामुळे राजनाथ सिंह हे भाजपचे अध्यक्ष नसून संघाचे गुलाम आहेत अशी टीका वर्मा यांनी केली. भाजपने या टीकेला उत्तर दिले आहे. काँग्रेस नेत्यांची अशी वक्तव्ये पाहता ते किती वैफल्यग्रस्त आहेत हेच दिसत असल्याची टीका भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली. दरम्यान रात्री उशीरा भाजपच्या वतीने निवडणूक आयोगाकडे बेणीप्रसाद व आझमखान यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली.