स्वतंत्र तेलंगणचा मार्ग मोकळा झाल्याने विभागात जल्लोष करण्यात आला. हैदराबाद आणि वारंगल शहरांमध्ये जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करून मिठाई वाटण्यात आली. ठिकठिकाणी विजयी मिरवणुका काढण्यात आल्या.
तेलंगणच्या सर्व दहाही जिल्ह्य़ांमध्ये जल्लोष केला जात आहे.  दरम्यान विभाजनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणाऱ्या वायएसआर काँग्रेसने बुधवारी आंध्र बंदची हाक दिली आहे. देशाच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याचे पक्षाचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले. दरम्यान राज्याचे गुंतवणूक आणि पायाभूत सोयीसुविधा मंत्री जी. श्रीनिवास यांनी मंत्रिपद आणि काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
ओस्मानिया विद्यापीठात मोठय़ा संख्येने विद्यार्थी जमा झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. आनंद व्यक्त करण्यास शब्द नाहीत, अशी प्रतिक्रिया तेलंगण कृती समितीचे अध्यक्ष एम. कोंडडरम यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री आज राजीनामा देणार
तेलंगणला मान्यता मिळाल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.किरणकुमार रेड्डी बुधवारी राजीनामा देणार आहेत. त्यांच्या निकटवर्तीयाने याबाबतची माहिती दिली.आपले समर्थक मंत्री आणि आमदारांना मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठकीसाठी बोलावले असल्याचे समाजकल्याण मंत्री पी. सत्यनारायणा यांनी सांगितले. पावणे अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री राजभवनात जाऊन राजीनामा सुपूर्द करतील, असे दुसऱ्या एका मंत्र्याने स्पष्ट केले. किरण रेड्डी नवा पक्ष काढणार काय, यावर मात्र ते त्याबाबत कधी बोलले आहेत काय, असा प्रश्न केला. मात्र राजीनाम्याच्या मुद्दय़ावर त्यांच्या बाजूने फारसे मंत्री किंवा आमदार नाहीत असे बोलले जाते. तेलंगण अस्तित्वात येणार हे उघड झाल्यावर आता संघर्ष करण्यात अर्थ नाही, हे जाणून किरण रेड्डी पद सोडणार आहेत. दरम्यान आंध्रच्या विभाजनावरून पूर्व गोदावरीचे काँग्रेस आमदार त्रिमूथुलू यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.