देशाला हुकूमशहा नको सेवक हवा आहे. आता देशात ६० वर्षे शासन सांभाळणारे सरकार नको विकासात्मक भूमिका मांडणारे नेतृत्व हवे असल्याचे म्हणत भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी बिहारमधील जाहीर सभेत काँग्रेसवर निशाणा साधला तसेच नितीश कुमारांनाही चिमटा काढण्याचा प्रयत्न केला.
मोदी म्हणाले की, “देशाच्या विकासाचा नकाशा मनात असल्याचे काँग्रेसच्या युवराजांनी म्हटले होते. मग, मनात नकाशा तयार करण्यासाठी त्यांना ६० वर्षे लागली असतील, तर सत्यात साकारण्यासाठी आणखी शंभर वर्षे लागतील.” अशी खोचक टीका मोदींनी काँग्रेसवर केली.
बिहार सरकार असो वा केंद्र सरकार येथील पाण्याची समस्या सोडविण्यात राज्यकर्ते निष्क्रीय ठरले आहेत. आता देशाला राज्यकर्ता नको सेवक हवा आहे आणि मला तुमचा सेवक म्हणून कार्यकरण्याची संधी द्या असे आवाहन मोदींनी बिहारमधील जनतेला केले. तसेच “देशात आपण हरितक्रांती ऐकली आहे, धवलक्रांती ऐकली आहे, पण आता त्यांना गुलाबी क्रांती हवी आहे आणि ही गुलाबी क्रांती म्हणजे, प्राण्यांची कत्तल करणे. चारा घोटाळा, पाण्याच्या समस्या यांमुळे वन्यजीवांना येथे जगणे कठीण झाले आहे. यातून प्राण्यांची कत्तल होऊ पाहणारी गुलाबी क्रांती यांना हवी आहे.” अशीही टीका मोदींनी केली.