स्वत:ला काही चांगले करता येत नाही आणि दुसऱ्याने केलेले पाहावत नाही, अशी शिवसेनेची स्थिती झाल्यानेच भांडुप येथील मनसेच्या थीम पार्कला विरोध सुरू केला आहे. गेली वीस वर्षे पालिकेत सत्ता असताना शिवसेनेला एखादे सुद्धा थीम पार्क का उभारता आले नाही, असा सवाल करत, मनसेचा शिवसेनेला धसका असल्यानेच आमच्या चांगल्या कामांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोध सुरू केल्याचा जोरदार टोला मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांनी लगावला आहे.
आमदार बाळा नांदगावकर यांनी शिवडी मतदारसंघात उद्यान उभारणीपासून केलेल्या विविध कामांना शिवसेनेने असाच विरोध केला होता. शिवाजी पार्क येथे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी वायफाय सेवा सुरू केल्यानंतरही ही सेवा बंद पाडण्याचा तसेच पोलिसांमध्ये तक्रारी दाखल करण्याचा रडीचा डाव शिवसेना खेळला होता. आताही राज्य शासनाची परवानगी असताना आणि त्यांनीच थीम पार्कसाठी निधी मंजूर केल्यानंतर शिवसेनेने मिठागाराच्या जमिनीवर थीम पार्क उभारल्याची तक्रार केली आहे. या मिठागराच्या जमिनीवर झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या तर शिवसेनेला काहीही वाटणार नाही, मात्र भांडुपवासीयांसाठी चांगले उद्यान मनसे उभे करते म्हणून यांच्या पोटात दुखत असल्याचा आरोप सांगळे यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वांद्रे येथे राहतात. तेथील वांद्रे रेल्वे स्थानकालगत रेल्वे पुलापेक्षा मोठय़ा तीन-चार मजली अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत त्या महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला का दिसत नाहीत, असा सवाल मनसेचे गटनेते व आमदार बाळा नांदगावकर यांनी केला. ते म्हणाले, यांना अनधिकृत झोपडय़ा व फेरीवाले दिसत नाहीत मात्र मनसे भांडुपमध्ये उभे करत असलेले काम खुपते ही दुर्दैवी गोष्ट आहे.
“राज्य शासनाने ही जागा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केली तसेच राज्य शासनानेच थीम पार्कला परवानगी देताना तीन कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला असून सिटी सव्‍‌र्हे क्रमांक ७३०वर राज्य शासनानेच नाव असल्यामुळे ही मिठागाराची जागा असल्याचा शिवसेनेचा दावा पोकळ आहे.”
– मनसे आमदार मंगेश सांगळे