शाई पुसून दोनदा मतदान करण्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सल्ला म्हणजे राष्ट्रवादीचे निवडणूक जिंकण्याचे रहस्यच उघड करण्यासारखे आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लगावला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सर्व विजयी निकालांची चौकशी करावी, अशी मागणी करतानाच लोकसभा निवडणुकीत कोणी दोनवेळा मतदान करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना शिवसैनिकांनी धडा शिकवावा, असे आवाहन केले. भाजपच्या भूमिकेविषयीची शिवसेनेची धास्ती अद्याप शमली नसून नाशिक महापालिकेप्रमाणे लोकसभा निवडणुकीत मनसेशी आपली युती नाही ना, असा थेट प्रश्न उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या शिष्ट मंडळाला केला.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सोमवारी शिवसेनेच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला. शाई पुसून दोनवेळा मतदान करण्याचा शरद पवार यांचा सल्ला लोकशाहीची थट्टाच नव्हे, तर लोकशाहीचा गुन्हा आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी कशा पध्दतीने विजय मिळविते ते पवार यांनी नकळतपणे सांगून टाकले. पवार यांच्या या विधानाबद्दल सर्वपक्षीयांनी तक्रार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून उत्तर प्रदेशमध्ये काही जागांवर उमेदवार दिले जाणार असल्याच्या प्रश्नावर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अडचणीत येईल असे शिवसेनेमार्फत काही घडणार नसल्याचे स्पष्ट केले. वाराणसी व लखनौ मतदारसंघातून शिवसेना उमेदवार देणार नाही. परंतु, त्या राज्यात अनेक वर्षांपासून कार्यकर्ते शिवसेनेचे काम करत आहेत. त्यांची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. या संदर्भात अंतीम निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही ठाकरे यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार उभे केल्यामुळे मत विभागणी होणार नाही. मनसेला मतदान केल्यास काय होते, हे जनतेला माहीत झाले आहे असे त्यांनी नमूद केले. बैठकी दरम्यान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ठाकरे यांची भेट घेऊन निवडणुकीतील नियोजनाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला. महापालिकेत भाजपची मनसेशी युती आहे, त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत काही युती नाही ना, अशी विचारणा उध्दव ठाकरे यांनी केली. या प्रश्नाने चपापलेल्या शिष्टमंडळाने लोकसभा निवडणुकीत भाजपची शिवसेनेशी युती असल्याचा दावा केला.