लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस. या दिवसाचे महत्त्व फार मोठे आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाने या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. अनेक जण हे कर्तव्य पार पाडण्यात कुचराई करतात. प्रामुख्याने शहरी भागातील नागरिक मतदानाला जात नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. किमान या वेळी तरी शहरी भागातील नागरिकांनी मतदानात भाग घ्यावा, असे माझे आवाहन आहे.
मी भामरागडसारख्या मागास तालुक्यात गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहे. शहरी भागाच्या तुलनेत या परिसरात शिक्षणाचा प्रसार कमी आहे, तरीही या भागातील आदिवासी जनता मतदानाच्या दिवशी अगदी नटूनथटून मतदान केंद्रावर जाते. मतदानासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करणारे आदिवासी गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये मी बघत आलो आहे. या आदिवासींचे राजकीय ज्ञान मर्यादित असले तरी मतदानाचे महत्त्व त्यांना कळले आहे.
अनेकदा तर, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या आदिवासींना मतदान करावे लागते. अशा परिस्थितीवर मात करूनसुद्धा आमचा आदिवासी मतदानात भाग घेतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या सरकारविषयीच्या अपेक्षा काय, आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, याविषयी प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा असतात. अनेकदा तो त्या बोलूनही दाखवतो. या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजेत, असे वाटत असेल तर प्रत्येकाने मतदानात भाग घेतला पाहिजे. एका मताने काय होणार, असा प्रश्न उपस्थित करून अनेक जण मतदान करायला जात नाहीत; ही भूमिका योग्य नाही. या देशातील प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. एक मत असो की लाखभर मते; त्याची किंमत अनमोल आहे. लोकशाही अधिक सुदृढ व परिपक्व करायची असेल तर प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे, असे माझे प्रामाणिक मत आहे. लोकशाही व्यवस्था असलेल्या देशातील प्रत्येक निवडणूक सामान्य मतदारांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. निवडणुकीवरच देशाची स्थिरता व अखंडता अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे माझे सर्वाना आवाहन आहे.