मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्यापाठोपाठ आणखी दोन आयपीएस अधिकारी भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. महासंचालक आणि अतिरिक्त आयुक्त दर्जाचे हे दोन अधिकारी असून पोलीस सेवेत आलेले नैराश्य आणि भविष्यात बढतीची संधी नसल्यामुळे अस्वस्थ झालेल्या या अधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरविले आहे. सध्या त्यांची प्राथमिक बोलणी सुरू असून लवकरच ते निर्णय घेतील, असे या सूत्रांनी सांगितले.
डॉ. सिंग यांनी मुंबईचे पोलीस आयुक्तपद सोडून भाजपची वाट धरल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. डॉ. सिंग यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता. परंतु डॉ. सिंग यांनी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ काहीही स्पष्टीकरण त्यावेळी दिलेले नव्हते. मात्र पोलीस दलात यापुढे महत्त्वाच्या पदी बढती मिळणे शक्य नसल्याने राजकारणातील नवा डाव सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची चर्चा आहे.
सुरुवातीला डॉ. सिंग यांनी आपण भाजप वा आम आदमी पार्टीमध्ये जाणार असल्याचे सांगितले होते. या दोन्ही पक्षांकडून विचारणा झाल्याचा त्यांनी दावा केला होता. परंतु ‘आप’ने आम्ही विचारणा केली नसल्याचे जाहीर केल्यामुळे डॉ. सिंग हे भाजपमध्येच जाणार हे स्पष्ट झाले होते. एक माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांचे नातेवाईक असून त्यांच्यामार्फतच त्यांनी भाजपचा दरवाजा ठोठावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पाठोपाठ डॉ. सिंग यांच्याच तुकडीतील महासंचालक दर्जाचे आणखी एक वरिष्ठ अधिकारीही त्याच वाटेने असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अधिकाऱ्याने आपली बढती स्वीकारली असून आता ते लवकरच पोलीस सेवेचा त्याग करतील, अशी अपेक्षा आहे.
त्याचबरोबर सध्या राज्य पोलीस दलात उपमहानिरीक्षक/ अतिरिक्त आयुक्त असलेला एक अधिकारीही अतिशय इच्छुक आहे. ही सर्व मंडळी उत्तर प्रदेश वा राजस्थानातून भाजपच्या तिकिटवर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या सर्वाना ‘भाजप’कडून हिरवा कंदिल मिळाला आहे किंवा नाही, हे कळू शकलेले नाही.