कोळसा व राष्ट्रकुल घोटाळ्याच्या लेखा अहवालातून नाव वगळण्यासाठी संयुक्त पुरोगामी सरकारमधील काही राजकारण्यांनी दबाव आणला, असा आरोप माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) विनोद राय यांनी केला आहे.  
काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा उद्योग करण्यात आल्याचा दावाही राय यांनी पुस्तकात केला आहे. त्यांचे ‘नॉट जस्ट अ‍ॅन अकाउंटण्ट’ हे पुस्तक वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू तसेच माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह तसेच कोळसा सचिव पी.सी. पारेख यांनी तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर पुस्तकांमधून टीकास्त्र सोडले होते. त्यात आता राय यांच्या पुस्तकाची भर पडणार आहे.
पंतप्रधान हा समानातील पहिला असतो. काही वेळा मोक्याच्या क्षणी त्याला निर्णय घ्यायचे असतात. सत्तेत राहण्यासाठी सगळ्याचाच त्याग करायचा हे योग्य नाही. किंवा आघाडय़ांच्या राजकारणात प्रशासनाचा बळी देणे ठीक नाही, या बाबी पुस्तकातून पुढे आणल्या आहेत. याबाबत प्रतिक्रिया देण्यास राय यांनी नकार दिला. मात्र पुस्तकातील सर्व बाबी खऱ्या असल्याचे त्यांच्या निकटच्या सूत्रांनी स्पष्ट केले. कुणाची तरी प्रतिमा मलिन करण्यासाठी हे पुस्तक नाही. तर कारभाराचा दर्जा सुधारावा, भविष्यात चांगली व्यवस्था व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. आताच हे आरोप करण्याचे कारण काय याबाबत विचारले असता, त्या वेळी घटनात्मक पद होते. आता ते पदावर नसल्याने बोलण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका जनहित याचिकेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कॅग हे केवळ हिशेब तपासनीस नाही असे निरीक्षण नोंदवले होते. त्यातूनच प्रेरणा घेत या पुस्तकाचे शीर्षक ठेवण्यात आले आहे. संसदेच्या लेखा समितीच्या बैठकीतही काँग्रेसच्या सदस्यांनी काही अडचणीचे प्रश्न विचारून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही राय यांनी केला आहे.
टीकेवरून आरोप-प्रत्यारोप
राय यांच्यावर काँग्रेसने टीका केली आहे. जर कोणी दबाव आणला होता तर त्यांची नावे त्याच वेळी का जाहीर केली नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारीक अन्वर यांनीही राय यांचा सनसनाटी निर्माण करण्याचा हेतू असल्याचे सांगत टीका केली, तर राय यांना भाजपमध्ये जायचे असे आरोप केले जात असावेत अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी केली. भाजपला मात्र या आरोपांनी काँग्रेसच्या विरोधात मुद्दा मिळाला आहे. यातून काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका भाजप प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री यांनी केली आहे.