लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या चौथ्या टप्प्यात शनिवारी गोव्यात ७५ टक्के, त्रिपुरात ८१.८ टक्के, आसाममध्ये ७५ टक्के आणि सिक्किममध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ७६ टक्के मतदान झाले.
ईशान्येकडील तीन राज्यांत ७१ ते ८२ टक्के मतदान झाले असून गोव्यातील दोन जागांसाठी ७५ टक्के मतदानाची नोंद झाली. त्रिपुरामध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास ८२ टक्के मतदानाची नोंद झाली. आसाममधील तीन जागांसाठी ७२ टक्के तर सिक्किममधील लोकसभेची एक आणि विधानसभेच्या ३२ जागांसाठी ७१ टक्के मतदान झाले.
त्रिपुरामध्ये एका जागेसाठी १२ उमेदवार रिंगणात होते आणि डाव्या आघाडीची माकप, काँग्रेस, भाजप आणि तृणमूलशी लढत होती. मतदानाच्या वेळी ११ मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला त्यामुळे ती तातडीने बदलण्यात आली. आसाममध्ये काँग्रेसची सत्ता असून सिल्चरमध्ये सर्वाधिक म्हणजे ७४ टक्के मतदान झाले. सिक्किममध्ये लोकसभेच्या एका जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात असून विधानसभेच्या ३२ जागांसाठी १२१ उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री पवन चामलिंग हे सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून तो एक विक्रमच होणार आहे.