लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच बीडच्या राजकीय घडामोडींकडे राज्याचे लक्ष होते. महायुतीचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात उमेदवार कोण, हा प्रश्न अनेक दिवस अनुत्तरित होता. राष्ट्रवादीने मुंडे यांचे राजकीय शिष्य असलेल्या राज्यमंत्री सुरेश धस यांना, तर आम आदमी पार्टीने अभिनेते नंदू माधव यांना िरगणात उतरवले. उमेदवार ठरले आणि नेहमीप्रमाणेच बीड मतदारसंघात जातीपातीचे मतदार मोजण्याचे काम सुरू झाले!
 गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्तेची संपूर्ण ‘ताकद’ लावूनदेखील मुंडे दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले. पण विधानसभेच्या मैदानात सहापकी पाच मतदारसंघ राष्ट्रवादीने खेचून घेतल्याने मुंडे एकाकी पडले. कन्या पंकजा पालवे यांच्याशिवाय मुंडेंची खिंड लढविणारा नेता सध्या जिल्ह्य़ात नाही.
मागील वेळी राष्ट्रवादीने जातीची ‘तुतारी’ वाजवल्यामुळे नवख्या रमेश आडसकरांनीदेखील सव्वाचार लाख मते घेतली. या वेळी आष्टीचे तीन वेळचे आमदार व सध्या महसूल राज्यमंत्री असलेल्या सुरेश धस यांना मदानात उतरवून राष्ट्रवादीने मुंडेंना आव्हान दिले आहे. धस हे एकेकाळचे मुंडेंचे शिष्य. राष्ट्रवादीत नेत्यांची गर्दी वाढल्यामुळे आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर, माजलगावचे राधाकृष्ण पाटील यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुंडेंनी बहुचर्चित ‘जादूची कांडी’ फिरविण्यास सुरुवात केल्यामुळे वरून मजबूत दिसणाऱ्या राष्ट्रवादीतून एक-एक मोहरा गळू लागला आहे. राष्ट्रवादीतील ‘दादा’ टीमचे आमदार अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, रमेश आडसकर यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतल्याने लढतीची रंगत वाढली आहे.
साडेसतरा लाख मतदारांमध्ये सर्वाधिक मराठा, वंजारा, त्यानंतर दलित, मुस्लीम, धनगर, बंजारा, माळी या समाजाची निर्णायक मते आहेत. वंजारा समाजाच्या ४ लाख, तर ओबीसींच्या ४ लाख मतदारांवर असणारी नरेंद्र मोदींची मोहिनी मुंडेंची जमेची बाजू आहे.  राष्ट्रवादीचे मराठा समाजाच्या साडेपाच लाख व पारंपरिक दलित, मुस्लीम समाजाच्या एकगठ्ठा मतांवर लक्ष आहे. मराठा, मुस्लीम व दलित मतांचे ‘ध्रुवीकरण’ करण्यात कोण यशस्वी होतो, त्यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

“राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हा बँक, खासदार फंड, रेल्वे या मुद्दय़ांवरून मुंडेंवर शरसंधान सुरू केले, तर मुंडे लोकसभेत पहिल्या बाकावर उपनेते म्हणून बसतात याचे मतदारांना अप्रूप. मोदी पंतप्रधान झाले तर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, ही भावना आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेते मुंडेंचे नेतृत्व संपवण्यासाठी सत्तेचा वापर करत असल्यामुळे सहानुभूती मुंडेंच्या बाजूने आहे.”
वसंत मुंडे

विकासाच्या खुणा गावागावांत – मुंडे
आपण केलेल्या विकासाच्या खुणा गावागावांत आहेत. ६० वर्षांत पहिल्यांदा परळी-नगर रेल्वेमार्ग कामाला गती मिळाली. अंमळनेपर्यंत रुळ अंथरण्याचे काम झाले आहे. प्रशासनाने भूसंपादन वेळेत केले असते तर रेल्वेच्या कामाला आणखी गती मिळाली असती. ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ही मागणी केंद्र सरकारकडे लावून धरली. दुष्काळ, गारपीटग्रस्तांसाठी जास्तीची मदत मिळावी, या साठी सरकारशी कायम संघर्ष चालू आहे.

२७ मुद्दय़ांचा वचननामा विसरले -धस
मागील निवडणुकीत मुंडे यांनी २७ मुद्दय़ांचा वचननामा जाहीर केला होता. मात्र, यातील एकही योजना, काम पूर्ण केले नाही. सर्वसामान्य माणसांच्या योजना, ऊसतोडणी मजुरांचा विमा, घरकुल या साठी केंद्राकडून निधी आणता आला असता. पण मुंडे यांच्याकडून मतदारांचा अपेक्षाभंग झाला. आता आपण केंद्राच्या आरोग्य, तांत्रिक, शिक्षण व सर्वसामान्य माणसाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आणण्यास प्रयत्न करणार आहोत.

स्वच्छ प्रशासन -नंदू माधव
जिल्ह्य़ात सुनील केंद्रेकर यांच्या माध्यमातून स्वच्छ प्रशासन होते. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे विनासायास होत, पण राजकीय पुढाऱ्यांनी हे प्रशासन घालवले. स्वच्छ प्रशासन असले की सामान्य माणसाला न्याय मिळतो, यासाठी आपण निवडणुकीच्या मदानात उतरलो आहोत.