पुणे-सातारा-पुणे ही बस सकाळी सहा वाजता साताऱ्यावरून पुण्याकडे निघाली, ती पावणेआठच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात आली. बसचालक एम. जे. हेंद्रे यांनी ही बस स्थानकातील पान शॉपच्या दुकानाजवळ लावली व ते नियंत्रणकक्षाकडे निघाले. त्यावेळी त्यांना एक व्यक्ती त्यांची बस घेऊन जाताना दिसली. त्यांनी बसचा पाठलाग केला. मात्र, त्या व्यक्तीने सोलापूर रस्त्याकडे बाहेर पडणाऱ्या रस्त्याने स्थानकाबाहेर बस नेली. बसस्थानकाच्या कोपऱ्यात या बसने पहिल्यांदा एका महिलेला ठोकरले.

त्यानंतर डावीकडे वळून परत सातारा रस्त्यावर नेली. या ठिकाणी त्याने पुन्हा एका व्यक्तीला धडक दिली. त्याचबरोबर एका रिक्षाला व स्वारगेट चौकातील फळविक्रेत्यालाही धडक दिली. बस सातारा रस्त्याने नेऊन पुन्हा बस स्थानकात वळविली. स्थानकातून बस वेगाने पुन्हा त्याच रस्त्याने बाहेर काढत ‘नो एन्ट्री’ मधून सोलापूर रस्त्याकडे वळला. यावेळी त्याने समोर येईल त्या वाहनाला धडका मारल्या. दरम्यान, स्वारगेट स्थानकातून बस घेऊन जाताच एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून या घटनेची माहिती दिली.

ही बस पळवून नेणारी व्यक्ती संतोष माने असल्याचे नंतर समजले. माने याने ही बस भरधाव वेगात सेव्हन लव्हज चौकात नेली. या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक देऊन तो सरळ गोळीबार मैदानाच्या दिशेने गेला. तिथे एका दुचाकीला उडविले व एका तरुणाला धडक दिली. ही बस पूलगेटच्या दिशेने वेगाने घेऊन तो जात होता. ही बस नागरिकांना उडवत चाललेली दिसतातच गोळीबार मैदान येथील तीन तरुणांनी तिचा पाठलाग सुरू केला. गोळीबार येथे या बसने एका महिलेस उडविले. त्यापासून काही मीटर अंतरावर एका चारचाकी मोटारीला धडक दिली.

हे पाहून पूना कॉलेजचा विद्यार्थी शरीफ इब्राहिम कुटी यानेही गाडीचा पाठलाग सुरू केला. पूलगेट येथेही माने याने ही बस ‘नो एंट्री’ मध्ये घालून पूलगेट येथील पीएमटी स्टँडला भरधाव वेगात एक फेरी मारली. या दरम्यान आणखीन काही वाहनांना त्याने ठोकरले. त्यानंतर त्याने ईस्ट स्ट्रीटवर बस नेली. या ठिकाणी बिशप स्कूलला त्याने तीन चक्कर मारल्या. या ठिकाणी लष्कर पोलीस ठाण्याचे गस्तीवर असणारे पोलीस कर्मचारी दीपक काकडे व संदीप सुतार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीवरून या बसचा बिशप स्कूल जवळून पाठलाग सुरू केला. त्यांनी माने याला थांबण्यास सांगितले, पण तो बस न थांबवता पुन्हा ‘नो एंट्री’ मधून बस घेऊन जाऊ लागला. त्यावेळी खुन्या मारुती मंदिराजवळ पोलिसांनी त्याच्यावर कार्बाईनमधून समोरून गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी काचेवर लागली. त्यावेळी माने याने त्यांच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न केला. तो बस घेऊन भरधाव वेगाने जुना मोटार स्टॅन्डकडे निघाला. त्यावेळी पोलिसांनी बसच्या टायरवर आणखी दोन गोळ्या झाडल्या.त्यानंतर माने याने बस कासेवाडीहून शंकरशेट रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकात आणली. तेथून अप्सरा चित्रपटगृहाजवळून सुसाट वेगाने महर्षीनगरमध्ये गेला. तो महर्षीनगरमध्ये गेल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळताच काही ठिकाणी पोलिसांनी अडथळे