News Flash

‘विजय’ची विदेशातील शेती

नोकरी करत करत आपल्या शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे हा ध्यास त्यांनी घेतला.

विजय कावंदे यांच्या मालकीची वडिलोपार्जित केवळ १० एकर जमीन. पाच भावंडे. कोरडवाहू जमिनीत बेताचे उत्पन्न  मिळते त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी करण्याला पर्याय नाही हे लक्षात घेऊन विजयने बारावी डीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नोकरी मिळविली. तरी त्याची शेतीची असलेली नाळ कायम होती. नोकरी करत करत आपल्या शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे हा ध्यास त्यांनी घेतला. शेतीतील उत्पन्न वाढवत व विविध प्रयोग करत विदेशात भाजीपाला निर्यात केला अन् आता विदेशातील ४० एकर जमीन लीजवर घेऊन त्या ठिकाणी भाजीपाला उत्पादनाची तयारी सुरू केली.

लातूर तालुक्यातील वांजरखेडा या गावच्या केवळ १० एकर जमीन असलेल्या एखाद्या शेतकऱ्याने प्रारंभी आपल्या शेतीतील उत्पन्न वाढवत व विविध प्रयोग करत विदेशात भाजीपाला निर्यात केला अन् आता विदेशातील ४० एकर जमीन लीजवर घेऊन त्या ठिकाणी भाजीपाला उत्पादनाची तयारी सुरू केली असे जर कोणाला सांगितले तर यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र वांजरखेडा गावातील विजय कावंदे या ३४ वर्षीय तरुणाने ही स्वप्नवत वाटणारी बाब प्रत्यक्षात उतरविली आहे. त्याची यशोगाथा जाणून घेणे आपल्याला नक्कीच आवडेल.

विजय कावंदे यांच्या मालकीची वडिलोपार्जित केवळ १० एकर जमीन. पाच भावंडे. कोरडवाहू जमिनीत बेताचे उत्पन्न  मिळते त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी करण्याला पर्याय नाही हे लक्षात घेऊन विजयने बारावी डीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नोकरी मिळविली. विजयचे एक भाऊ वकील, दुसरे शिक्षक आहेत व धाकटा भाऊ बीटेकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून जर्मनीत एमएस करतो आहे.

विजयने जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशा स्वीकारला तरी त्याची शेतीची असलेली नाळ कायम होती. नोकरी करत करत आपल्या शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे हा ध्यास त्यांनी घेतला. प्रारंभी वर्षांकाठी २० हजार रुपयांच्या वर शेतीचे उत्पन्न जात नसे. आधुनिक तंत्रज्ञानामार्फत शेती सुरू केल्यानंतर शेतीत त्यांनी प्रयोग केले. पहिल्या टप्प्यात २० हजारांचे उत्पन्न ५० हजारांवर व त्यानंतर १ लाखापर्यंत गेले. शेतीत ठिबक सिंचन, तुषार सिंचनमार्फत कमी पाण्यात अधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे त्यांनी ठरवले. लातूर परिसरात ज्याचे उत्पन्न घेतले जात नाही व ज्या बाबी अन्यत्र चांगल्या प्रमाणात तयार होतात याचा अभ्यास सुरू केला. हिंगोलीत तयार होणारी हळद, फलटणमध्ये तयार होणारी भेंडी, औरंगाबाद परिसरात तयार होणारे अद्रक याचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणच्या अनुभवी शेतकऱ्यांच्या शेतावर मुक्काम करून त्याचे उत्पादन कसे घेतले जाते याचा अभ्यास केला व ते प्रयोग आपल्या शेतीत केले. अतिशय मन लावून व अभ्यासपूर्वक शेती केल्यामुळे तेथील अनुभवी शेतकऱ्यांपेक्षा देखील विजयने आपल्या शेतात अधिक उत्पन्न काढले.

विविध वाणांची त्याला भूक होती त्यामुळे प्रत्येक वेळी नवे प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. त्यातून आपल्याला शिकता येते हा शिक्षक असल्यामुळे त्यांचा शिकण्याचा स्वभाव बनला. टरबूज, खरबूज, पपई यांचेही त्यांनी विक्रमी उत्पादन घेतले. प्रत्येक वाणाची पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व माहिती वहीत नोंदवून ठेवून त्यासाठी लागणारी खते, औषधे, उत्पादनाचा झालेला खर्च, मिळालेले उत्पन्न याचा ताळेबंदच त्यांच्याकडे आहे. २००२ साली त्यांनी शेतीत प्रयोग केले व २० हजारांचे उत्पन्न गतवर्षी ३५ लाखांपर्यंत पोहोचले. प्रारंभी महाराष्ट्र प्रांतातील शेतीचा अभ्यास करत त्यानंतर हैद्राबाद, केरळ, छत्तीसगड, दिल्ली अशा प्रकारच्या बाजारपेठांचाही अभ्यास केला गेला. आपला माल कोणत्या बाजारपेठेत केव्हा नेला तर चांगले पसे मिळतील याचा अभ्यास झाला, मात्र बाजारपेठेत ज्यांचे शिक्षण अत्यल्प आहे अशी मंडळी शेतकऱ्यांची अडवणूक करतात त्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच विदेशातील बाजारपेठही त्यांना खुणावू लागली. ‘पिकते ते विकण्यापेक्षा जे विकते ते पिकवायचे’ अशी खूणखाठ त्यांनी बांधली. प्रारंभी मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये ते जेव्हा टरबूज घेऊन गेले तेव्हा तेथील व्यापारी नव्या आलेल्या शेतकऱ्याची कशी फसवणूक करतात याचा अनुभव त्यांनी घेतला व त्यावर मात करत त्यांनी बाजारपेठेत आपला माल विकला. वाशी मार्केटमध्ये भाजीपाला बॉक्समध्ये पॅक केला जातो आहे हे त्यांनी पाहिले व त्यांची उत्सुकता वाढली व तेथे फ्रान्स व इटली येथे हिरवी मिरची पाठवली जाते व त्याला २० रुपये दर मिळतो आहे हे त्यांनी पाहिले. संबंधित व्यापाऱ्याला आम्ही हा माल तयार केला तर तुम्ही घ्याल का? असे विचारले. त्यांनी २० रुपयाने तुम्ही आणाल तेवढा माल आम्ही घेऊ असे सांगितले व विजयने आपल्या गावाकडे हा प्रयोग करण्याचे ठरवले.

गावातील काही शेतकऱ्यांना ही बाब सांगितली. स्वत:च्या चार एकरमध्ये व अन्य शेतकऱ्यांच्या १० एकरमध्ये हिरवी मिरचीची लागवड केली व त्यासाठी लागणारी सर्व रोपे त्यांनी स्वत: तयार केली व एकरी १०० टन मिरचीचे उत्पादन सर्वाना झाले व प्रत्येक शेतकऱ्याला दोन ते अडीच लाख रुपये मिळाले. त्यातून गावकऱ्यांचा उत्साह वाढला. जर्मनी येथील निर्यातदार वांजरखेडय़ाच्या शेतीला भेट द्यायला आले. भाजीपाल्याचे उत्पादन घेताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या व भेंडीचे उत्पादन घेतले. ४३ रुपये किलो दराने भेंडी विकली गेली. १६८ प्रकारच्या चाचण्यांमधून भेंडीची निवड झाली व त्यातून सर्वाचा आत्मविश्वास वाढला. प्रत्येक शेतकऱ्याला एकरी तीन ते साडेतीन लाख रुपये मिळाले. त्यानंतर परिसरातील शेतकरी विजयच्या पाठीमागे लागले व १५० शेतकरी यासाठी तयार झाले. पुन्हा भेंडीचे उत्पादन घेतले.

अनेक शेतकऱ्यांना खासगी दुकानदारांकडून उधारीवर औषधे, खते दिली मात्र दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव पडले व २८ रुपये किलो भेंडीला भाव मिळाला. त्यातून लोकांच्या मनात विजयने आपली फसवणूक केली अशी भावना निर्माण झाली. उधारीवर घेतलेल्या खते व औषधांचे पसे विजयने आपल्या शेतीतील उत्पन्नातून फेडले व त्यानंतर आपण कच न खाता या क्षेत्रात काम केले पाहिजे असे ठरवून ११ वर्षांपासून करत असलेली शिक्षकाची नोकरी त्यांनी सोडून दिली व पूर्णपणे शेती करण्याचे ठरवले.

मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये एक गाळा भाडय़ाने घेतला. भाजीपाला निर्यातीचा परवाना काढला. ‘फार्म किंग इंटरनॅशनल’ या नावाने कंपनी सुरू केली व १५ जानेवारी २०१५ पासून भेंडी, मिरची अशा विविध वाणांची निर्यात सुरू केली. जर्मनी, युरोप या देशांत माल गेला. तेथील काही मंडळी पुन्हा येऊन लातूर परिसरातील भाजीपाल्याचे उत्पन्न पाहून गेले व त्यांनी विजयला १० हजार युरो म्हणजे साडेसात लाख रुपये देऊ केले. त्या उत्साहामुळे पहिल्या वर्षी १ कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यानंतर जर्मनी, स्वित्झरलॅण्ड, एॅम्सरडॅम, लंडन अशा विविध ठिकाणी त्यांनी आपला माल विकणे सुरू केले.

वांजरखेडय़ात आता विजयने भेंडी लावण्याचे यंत्र विकसित केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणा हे गाव ऊसतोड कामगारांचे. या गावकऱ्यांना शेती करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले व या गावातील ७० टन भाजीपाला निर्यात केला. भेंडी, मिरची, दुधी भोपळा, शेवगा, पपई, तिंडा, गवार, तोंडली, पडवळ, आंबा, डाळींब, चवळी अशा विविध वाणांची निर्यात केली. लातूरचा शेतकरी भाजीपाल्याच्या चाचण्या मुंबईतील प्रयोगशाळेत, विदेशात पाठवण्यासाठी परवाना पुण्यात अन् हैद्राबाद विमानतळावरून युरोप व जर्मनी आदी देशात माल पाठवण्याचे अवघड काम विजय कावंदेने चालवले आहे.

गतवर्षी तीव्र उन्हाळा असतानाही २५० टन भाजीपाल्याची निर्यात केली. सध्या २०० एकरावरील भाजीपाला निर्यात होत असून लातूर जिल्हय़ाची क्षमता दहापट वाढू शकते असा दावा विजयचा आहे. महाराष्ट्रात सप्टेंबर ते मार्चपर्यंत दोन भाजीपाल्याचे हंगाम घेऊ शकणारा केवळ लातूरचा परिसर आहे. उर्वरीत महाराष्ट्रात एक वेळच भाजीपाल्याचे निर्यातक्षम उत्पन्न घेता येऊ शकते. यावर्षी विजयने पुढचे पाऊल टाकण्याचे ठरवले असून मार्च २०१७ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत भारतात उत्पन्न घेता येत नाही यासाठी त्यांनी इटली देशातील सिसीलिया बेटावरील मिलान या शहरात ४० एकर जमीन एक वर्षांसाठी लीजवर घेतली आहे. विजयचा धाकटा भाऊ जर्मनीत एमएस करतो आहे तो या भाजीपाल्याच्या उत्पादनाकडे लक्ष देणार आहे. दररोज एक किलो भाजीपाला निर्यातीसाठी विमानावर शंभर रुपये खर्च करावा लागतो. हा खर्च निम्मा जरी वाचला तरी आपल्याला उत्पादन अधिक मिळेल हे गणित विजयने घातले आहे. विदेशात जाऊन शेती करणारा मराठवाडय़ातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कदाचित हा एकमेव तरुण असावा.

युरोपमधील एक शहर व आपल्या परिसरातील एक गाव भाजीपाल्यासाठी जोडले तर एका गावात किमान २० शेतकरी जरी तयार झाले तरी त्या शहराला लागणारा भाजीपाला पुरवता येईल हे आपले स्वप्न असल्याचे विजय सांगतो. भविष्यात हे शक्य होऊ शकते. आपल्याकडील शेतकरी कष्ट करणारे आहेत व येथील वातावरणही शेतीसाठी अनुकूल असल्याचे विजयचे म्हणणे आहे. समस्यांकडे पाहून रडत बसण्यापेक्षा स्वत:च्या कर्तृत्वाने त्यावर मात करत यश संपादन करता येऊ शकते हे विजयने आपल्या विजयभरारीतून दाखवून दिले आहे.

प्रदीप नणंदकर pradeepnanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:46 am

Web Title: 40 acres of overseas land taken on lease for vegetable farming
Next Stories
1 पेरणी : मूग
2 पणन व्यवस्था विस्कळीत
3 सतरा जणींनी  शेतशिवार जपला
Just Now!
X