16 December 2017

News Flash

मत्स्यबीज प्रकल्पाची प्रगत वाट

नोकरीमागे धडपड न करता याच व्यवसायात कारकीर्द करण्याचे श्यामलने ठरविले.

उदय जोशी | Updated: April 21, 2017 3:41 PM

साडेपाच ते सहा एकरवर विस्तारलेल्या मत्स्यबीज प्रकल्पाला श्यामल भोई या तरुणाने आधुनिकतेची जोड दिली आहे. शेजारच्या छायाचित्रात श्यामल भोई.

 

जळगाव जिल्ह्य़ातील मासेमारी करणाऱ्यांना तसेच मत्स्य विकास संस्थांना वेगवेगळ्या तलावात मत्स्यबीज सोडावयाचे झाल्यास कोलकाता व आंध्र प्रदेशातून बीज आणावे लागत असे. प्रवासात काही कारणांमुळे अनेकदा बीज नष्ट होत असे. त्यामुळे मत्स्य बीजाचे निम्म्याहून अधिक नुकसान मत्स्य व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना सहन करावे लागत असे. या गंभीर समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने श्यामल भोई या तरुणाने जळगाव जिल्ह्यतील सर्व तलावांना पुरेल एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मत्स्यबीज उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवून अत्यंत अभ्यासपूर्ण व तंत्रज्ञानयुक्त असा प्रकल्प पुरनाड येथील माळरानावर पडीक असलेल्या साडेपाच ते सहा एकर जागेवर उभारला. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड या गावाला श्यामल याच्या प्रकल्पाने नवीन ओळख मिळाली आहे.

उच्च शिक्षण घेतल्यावर मोठय़ा पगाराची नोकरी शोधून उर्वरित आयुष्य आरामात काढण्याचे बहुतांश युवकांचे स्वप्न असते. अशा प्रकारे ‘नोकरदार’ म्हणून वावरण्यापेक्षा आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यवसायासाठी करून ‘मालक’ म्हणून मिरविण्याचेही काही जणांचे स्वप्न असते. अर्थातच अशांची संख्या अगदीच किरकोळ असते. साडेपाच ते सहा एकरवर विस्तारलेल्या मत्स्यबीज प्रकल्पाचा मालक श्यामल भोई (जावरे) युवक हा त्यापैकीच एक.

जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड या गावाला श्यामल याच्या प्रकल्पाने नवीन ओळख मिळाली आहे. केवळ जळगावच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा एकमेव प्रकल्प आहे. श्यामलच्या पदव्या आणि त्याने पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमांची यादी बरीच मोठी आहे. २००८ मध्ये डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी, २०१२ मध्ये पुणे विद्यापीठातून व्यवसाय आणि प्रशासन विभागातील (एमबीए) विपणनची पदव्युत्तर पदवी, त्यानंतर मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज् एज्युकेशन’ संस्थेतून अंडी उबवणी व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. पुढे अंधेरीतील (मुंबई) याच संस्थेतून संबंधित विषयाचे अधिक प्रगत शिक्षण घेतले. एवढय़ावर समाधान न मानता हैद्राबाद येथे राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळातून प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केला.

नोकरीमागे धडपड न करता याच व्यवसायात कारकीर्द करण्याचे श्यामलने ठरविले. जळगाव जिल्ह्य़ातील मासेमारी करणाऱ्यांना तसेच मत्स्य विकास संस्थांना वेगवेगळ्या तलावात मत्स्यबीज सोडावयाचे झाल्यास कोलकाता व आंध्र प्रदेशातून बीज आणावे लागत असे. प्रवासात काही कारणांमुळे अनेकदा बीज नष्ट होत असे. त्यामुळे मत्स्य बीजाचे निम्म्याहून अधिक नुकसान मत्स्य व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना सहन करावे लागत असे. या गंभीर समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने श्यामलने जळगाव जिल्ह्यतील सर्व तलावांना पुरेल एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मत्स्यबीज उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवून अत्यंत अभ्यासपूर्ण व तंत्रज्ञानयुक्त असा प्रकल्प पुरनाड येथील माळरानावर पडीक असलेल्या साडेपाच ते सहा एकर जागेवर उभारला.

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेल्या या प्रकल्पातून पहिल्या पंधरवडय़ात सुमारे २५ लाख मत्स्यबीज उत्पादन त्याने घेतले. आता दररोज एक लाख मत्स्यबीज उत्पन्न सुरू असल्याचे श्यामलने सांगितले.

माशांच्या प्रजाती

खान्देशातील मासे विक्री व्यवसाय करणाऱ्या संस्था व व्यावसायिक हे मिरगळ, रोहु (स्थानिक भाषेत लालपरी), कटलर (कथला) मत्स्यबीजाचा वापर करून व्यवसाय करतात. हे बीज आधी कोलकाता किंवा आंध्र प्रदेशातून मागवावे लागत असे. श्यामलने या तिन्ही प्रजातींचे मत्स्यबीज उत्पादन सुरू करून ते मत्स्यबीजच येथे उपलब्ध करून दिले आहे.

बांधणी

मत्स्यबीज तयार झाल्यानंतर पॉलिथिन बॅगमध्ये ऑक्सिजनसह बंदिस्त केले जाते. हजारो बीज एकाच बॅगमध्ये बंदिस्त करून मासेमारी व्यावसायिक व संस्थांना पुरविले जाते. एकंदरीत या आगळ्यावेगळ्या प्रकल्पामुळे बेरोजगार तरुणांपुढे एक वेगळा आदर्श श्यामलने उभा केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्य़ातील हा एकमेव प्रकल्प आहे.

मनुष्यबळ व मत्स्यबीज विक्री, प्रक्रिया

या प्रकल्पासाठी किमान पाच ते सहा जणांची आवश्यकता असते. सध्या तरी श्यामलसह अन्य तीन कर्मचारी प्रकल्पाचे कामकाज पाहत आहेत. भविष्यात मागणी वाढल्यास कर्मचाऱ्यांची गरज भासू शकते, असे श्यामलचे म्हणणे आहे. मत्स्यबीजाचे उत्पादन घेतल्यानंतर त्याची सरकारी नियमांप्रमाणे तीन पद्धतीने विक्री केली जाते. १) जीरा- १५०० रुपये लाख बीज, २) अर्ध बोटुकली- ३५० रुपये हजारी, ३) बोटुकली- ७०० रुपये हजारी. यापेक्षा मोठय़ा आकारातील बीज पाहिजे असल्यास एक रुपया प्रति बीजप्रमाणे भाव मिळू शकतो असे श्यामलने सांगितले. तसेच पावसाळयात सायप्रिनस (स्थानिक भाषेत कोंबडा) तसेच शोभिवंत माशांच्या बीजांचे उत्पादन घेण्याचा श्यामलचा विचार आहे. पावसाळयातील चार महिन्यांचा कालावधी मत्स्य बीजोत्पादनासाठी उत्कृष्ट समजला जातो. परंतु त्यासाठी इतर दिवसांमध्ये दररोज देखभाल करावीच लागते. तयार करण्यात आलेल्या तलावांमधील पाण्याचे नियोजन व स्वच्छता महत्त्वपूर्ण असते. यासाठी दोन पर्याय वापरले जातात. पहिला पर्याय म्हणजे सहा ते सात महिन्यांनी तलावातील पाणी अर्धे रिकामे करून पुन्हा भरणे. दुसरा पर्याय म्हणजे यंत्राच्या साहाय्याने तलावातील पाण्याचे नियोजन करणे. याचा फायदा म्हणजे यात मत्स्यबीजांची साठवण क्षमता अधिक वाढते.

विपनणासाठी आधुनिकतेवर भर

विपणनाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन श्यामलने आपल्या व्यवसायाची माहिती ‘इंडिया अ‍ॅप’ वर टाकली. त्यामुळे नाशिकसह हरिद्वार, वाराणसी, खंडवा येथून व्यावसायिकांनी चौकशी करून संपूर्ण माहिती जाणून घेतली. मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना १०० टक्के जिवंत मत्स्यबीज मुक्ताईनगर तालुक्यातून उपलब्ध झाल्याने परिसरातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांची चिंता दूर झाली. येणारा पावसाळा अधिक फायदेशीर ठरेल, अशी श्यामलला आशा आहे. राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेले वडील महेंद्र भोई यांचे श्यामलला या प्रकल्पासाठी पाठबळ मिळाले. मुक्ताईनगर तालुक्यात ना उद्योग, ना व्यवसाय, ना कोणतीही औद्य्ोगिक वसाहत. त्यामुळे बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना नोकरीमागे न धावता सुशिक्षितांनी एखाद्या व्यवसायाची निवड केल्यास ते फायदेशीर ठरू शकते हे श्यामलने दाखवून दिले आहे.

असा आहे प्रकल्प..

  • सुमारे एक कोटी २० लाखाचा खर्च असलेल्या प्रकल्पासाठी काही स्वत:चे आणि उर्वरित काही भांडवल कर्ज स्वरूपात जमा केले. खासगी स्वरूपातील खान्देशातील असा हा पहिलाच प्रकल्प.
  • जमिनीच्या पातळीवर ३० हजार लिटर क्षमतेची किमान २.६ मीटर उंच टाकी तयार केली. ५० घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेला तलाव तयार केला. एका प्रजनन काळात जर ७० किलो नर आणि ७० किलो मादी मासे तलावात सोडले, तर जवळपास १० दशलक्ष अंडी मिळू शकतात. श्यामलने त्यात वेगळे काही करता येईल काय म्हणून संपूर्ण प्रक्रियेसाठी येथे आठ तलाव तयार केले.
  • पहिल्या तलावात अहमदाबाद येथून आणलेले इलेक्ट्रिक मोटरवर चालणारे दोन ‘पॅडल व्हील एडीयटर्स’ सोडले आहेत. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून माशांना पाण्याच्या प्रवाहात पोहण्याचा व्यायाम मिळतो. येथील मासे आठ मीटर व्यासाच्या स्पॅनिंग तलावात सोडले जातात. येथे नर व मादी सोडून अंडी फलित होतात. तयार झालेली अंडी स्पॅनिंग तलावातून पाइपद्वारे पुढील तलावात सोडले जातात. या ठिकाणी ७२ तासानंतर अंडय़ांमधून मत्स्य बीज तयार होते.
  • तयार मत्स्यबीज पाइपलाइनद्वारे पुढील तलावात सोडले जाते. या ठिकाणी मत्स्यबीजाची स्वच्छता केली जाते. हे बीज खाद्य ग्रहण करण्यायोग्य झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या तलावात सोडले जाते.

udaykumarbsl@gmail.com

First Published on April 15, 2017 12:26 am

Web Title: advance way of fish seed project