अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. केंद्रीय अर्थसंकल्पाप्रमाणेच या अर्थसंकल्पातदेखील शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातील काही तरतूदी पुढीलप्रमाणे.
’ पीक विमा योजनेसाठी एक हजार ८५५ कोटींची, शेततळी, विहिरी आणि वीजपंपांची जोडणी यांसाठी दोन हजार कोटींची तरतूद. या निधीतून एक लाख शेततळी, ३७ हजार ५०० विहिरी, ९० हजार वीजपंप जोडण्या देणार
’ शेतकऱ्यांसाठी अल्प दराने पीक कर्ज.
* प्रस्तावित ‘पं. दीनदयाळ उपाध्याय कृषी मार्गदर्शक योजने’साठी ६० कोटींची तरतूद
* बुलढाणा व अहमदनगर जिल्ह्य़ात नवी कृषी महाविद्यालये व जळगाव जिल्ह्य़ात शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय सुरू करणार. जळगाव व अकोला येथे नवी पशुवैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित.
* अनुभवी, पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात ‘कृषी गुरुकुल योजना’ प्रस्तावित. जिल्ह्य़ाजिल्ह्य़ात ‘कृषी महोत्सव’ साजरे करणार.
* दोन हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्रे प्रस्तावित
* दुग्धविकास प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून विदर्भ-मराठवाडय़ात १०० कोटींचे प्रकल्प उभारणार
* १४ जिल्ह्य़ांत ‘सघन कुक्कुट विकास गट’ स्थापन करण्यासाठी ५१.१३ कोटींची तरतूद
* भाकड गायी व गोवंश संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ३४ ग्रामीण जिल्ह्य़ांत ‘गोवर्धन गोवंश रक्षा केंद्रे’ सुरू करणार