13 November 2019

News Flash

पचायला हलकी, आरोग्यदायी ज्वारी

ज्वारीची भाकरी पचायला हलकी आणि आरोग्याला अतिशय गुणकारी आहे.

ज्वारीची भाकरी पचायला हलकी आणि आरोग्याला अतिशय गुणकारी आहे. ज्वारी हा गरिबांचा आहार असला तरी श्रीमंत मंडळी हटकून ज्वारीची भाकरी बाहेर कुठे जेवायला गेल्यावर मागून खातात. खरे तर आपल्या जेवणात आठवडय़ातून चार-पाच वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा समावेश असायला हवा. संशोधन केंद्रे यात आणखी आरोग्यवर्धक गुणधर्म यावेत, पीक उत्पादन भरपूर यावे, त्याचबरोबर यातून जनावरांना चाराही भरपूर मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. सर्वाधिक पोषणमूल्य असलेल्या ज्वारी या शाश्वत पिकाची नवी जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. पारंपरिक ज्वारीपेक्षा दीडपट उत्पादन देणारी एसपीव्ही-२३०७ ही ठोकळ दाण्याची जात नुकतीच विकसित करण्यात आली आहे.

पोषणमूल्य सुरक्षा म्हणून, भारत आणि आफ्रिकेमध्ये उत्पादन घेतले जात असले, तरी ज्वारीमध्ये प्रथिने (काबरेहायड्रेड) सर्वाधिक असून, खनिजाचे (मिनरल) प्रमाणही भरपूर आहे. गहू, तांदळामुळे बद्धकोष्ठतेचे प्रमाण अलीकडे वाढलेले दिसते. ज्वारीत (फायबर) तंतुमय पदार्थ सर्वाधिक असल्याने ज्वारी पचनासाठी उत्तम आहे. ज्वारीमध्ये असलेल्या निअ‍ॅसीनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. शिवाय यात फायटो केमिकल्स असल्याने हृदयरोगही टाळता येतो. ज्वारीत असलेल्या पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. लाल पेशी वाढण्यास मदत होते.

एसपीव्ही-२३०७ ही जात वैशिष्टय़पूर्ण आहे. ठोकळ दाणे असलेले हे सरळ वाण असून  ज्वारीचे उत्पादन हेक्टरी ३८ क्विंटल असून, पारंपरिक ज्वारीपेक्षा हे दीडपट आहे. या जातीपासून कडब्याचे उत्पादन १२५ ते १४० क्विंटल आहे. उत्पादन, चारा भरपूर व भाकरीची प्रत उत्तम आहे. ही जात संपूर्ण देशासाठी प्रसारित करण्यासाठी कृषी विद्यापीठाने आयसीएआरकडे शिफारस केली आहे. अलीकडे दूध उत्पादन वाढवण्याकडे ग्रामीण शेतकरी भर देत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेती हा जुगार ठरला असल्याने निदान पूरक व्यवसायावर घर चालवण्याचा उद्देश लक्षात घेऊन शेतकरी दारात गायी-म्हशी पाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाऱ्याचा प्रश्नदेखील सुटावा, हा दृष्टिकोन ठेवून पीक उत्पादन घेतले जात आहे. कृषी विद्यापीठेदेखील शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन मानवी शरीराला ज्वारीची आणि त्याची वैरण जनावरांना उपयुक्त ठरावी, यासाठी नवी वाणांवर सतत संशोधन करत आहेत. यात अकोल्याचे कृषी विद्यापीठ आघाडीवर आहे. अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत ११ ज्वारीच्या जाती विकसित केल्या आहेत. आता जी एसपीव्ही-२३०७ ही जात विकसित केली आहे, ती राष्ट्रीय स्तरावर उपयुक्त असलेल्या या जातीच्या प्रसारणासाठी कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) शिफारस केली आहे. मागच्या वर्षी ‘कल्याणी’ ही जात प्रसारित केली गेली. ११५ दिवसांत परिपक्व होणाऱ्या या ज्वारीचे हेक्टरी ४० क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेक्टरी १४० क्विंटल प्रथिनेयुक्त वैरणही मिळते. त्याचबरोबर याच कृषी विद्यापीठाने विकसित केलेली सीएसएच-३५ ज्वारीची जात अलीकडेच भारतीय कृषी संशोधन परिषदेने (नवी दिल्ली) राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केली. आणखी एक जात जी ‘हुरडय़ा’ची लज्जत वाढविणारी’, ती ‘पीकेव्ही काíतकी’ ही जातदेखील या कृषी विद्यापीठाने महाराष्ट्राला दिली आहे. ८२ दिवसांत हुरडा देणाऱ्या ‘कार्तिकी’चे उत्पादन हेक्टरी ४५ ते ४८ क्विंटल आहे. आणखी एक जात जी, रब्बी हंगामासाठी उपयुक्त आहे, ती एसपीएच-१८०१ जातही विकसित करण्यात आली. या ज्वारीचे उत्पादन ३५ ते ३८ क्विंटल आहे. तर वैरणाचे उत्पादनही १०० क्विंटल एवढे आहे.

गहू, मका आणि तांदूळ यांची वाढती मागणी आणि त्यांचा जाणवत असलेला तुटवडा लक्षात घेऊन आता शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योजक या ज्वारीच्या पिकाकडे आता वळू लागले आहेत. बिअरसारखी मद्य्ो तयार होत असतानाच ज्वारीपासून बिस्कीट, लाडू, पापड, धिरडे असे अनेक उपपदार्थ बनविले जात आहेत. या पदार्थाचीही मागणी वाढत आहे. आगामी काळातही ज्वारीकडे अनेकांचा मोर्चा वळणार आहे.

मच्छिंद्र ऐनापुरे ainapurem1674@gmail.com

(लेखक कृषी अभ्यासक आहेत.)

First Published on November 18, 2017 12:29 am

Web Title: amazing health benefits of jowar