18 November 2017

News Flash

‘कामधेनू’अंबाडी!

ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राने अंबाडीची गुणवत्ता ओळखून त्यांचे उत्पादन सुरू केले.

प्रशांत देशमुख | Updated: July 15, 2017 1:23 AM

 

पान, फुले, बिया, झाडाचे खोड अशा एकाच वनस्पतींच्या सर्वागाचा उपयोग होत असेल तर अशी बहुप्रसवा वनस्पती नक्कीच फायद्याची ठरणार. तशी ती ठरत असल्याचे असंख्य दाखले पुढे येत आहेत. महालक्ष्मीच्या महाप्रसादात आवश्यक ठरणारी अंबाडीची भाजी ही अशीच बहुगुणी वनस्पती ठरली आहे. पिढय़ांपिढय़ा अंबाडीची भाकरीची चव सांगणाऱ्या ग्रामीण भागाला ही वनस्पती कामधेनू ठरत असल्याचे दोन-तीन जिल्हय़ांतून दिसून आले आहे. एकटय़ा वर्धा जिल्हय़ात शंभरावर एकरात आज अंबाडीची लागवड होत आहे. आजवर मुख्य पिकासोबत दोन-तीन रांगेत किंवा शेताच्या कोपऱ्यात लावली जाणारी अंबाडी मुख्य पीक ठरत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे अंबाडीच्या फुलांपासून सरबत, जाम, जेली, मुरब्बा, बियांपासून बेसन, चटणी, मुखवास, पानापासून लोणचे, चाट मसाला, तर वाळलेल्या झाडापासून ताग व त्याद्वारे कागद बनविला जात असून वर्धा जिल्ह्य़ातील ‘चिअर्स अप’ ही कंपनी केवळ अंबाडीच्या विविध उत्पादनांपासून वर्षांकाठी १५ लाख रुपयांचा व्यवसाय करीत आहे.

ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राने अंबाडीची गुणवत्ता ओळखून त्यांचे उत्पादन सुरू केले. शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले. दहा एकराची लागवड शंभर एकरावर पोहोचली. अंबाडीचे सर्व पीक विकत घेऊन त्यावर प्रक्रिया उदय़ोग सुरू केले. आता विदर्भभर ही उत्पादने प्रसिद्ध आहेत. यापूर्वी गुजरात, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशात लागवड होणारी अंबाडीची महती राज्यात पसरू लागली आहे. एका एकरातील अंबाडीच्या लागवडीपासून एक टन फुले निघतात. ही फुले वाळवून एक क्विंटल एवढी होतात. एक किलो वाळलेल्या फुलांपासून साडेतीनशे ग्लास सरबत तयार होते. अंबाडीचे पीक कोरडवाहू व बागायती दोन्ही प्रकारे घेतले जाते. सर्वतऱ्हेच्या हवामानात पिकते. किमान एका एकरात जून ते ऑक्टोबरदरम्यान पीक घेतल्यास खर्चात बचत होते. ६० रुपये किलो प्रमाणे पाकळय़ा तोडण्याची मजुरी दिली जाते. १६० प्रती किलो असा भाव मिळतो. भरपूर ‘क’ जीवनसत्व असणाऱ्या अंबाडीच्या भाजीत १८ ते २०टक्के तेलाचे प्रमाण असते. त्यापासून खाद्यतेल, जनावरांसाठी पेंड तयार होते. उरलेला चोथा कंपोस्ट खताच्या कामी येतो. भेंडी किंवा कापसाच्या पिकात सापळा पीक म्हणून लागवड केल्यास किटनाशकाच्या खर्चात बचत साधली जाते. झाडाच्या खोडापासून तंतूमय घटक निघतात. त्यापासून दोऱ्या वळल्या जातात. एका एकरातील लागवडीपासून हजार किलो फुलांच्या पाकळय़ा, १०० किलो बिया व १०० किलो ताग मिळतो. पाकळय़ा वेचणाऱ्या उद्योगातून शेकडो महिला मुलींना काम मिळत आहे. एक कुटुंब रोज चारशे रुपये मजुरी कमवीत असल्याची आकडेवारी आहे.

विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सोहम पंडय़ा म्हणाले की, खर्चावर आधारित भाव मिळावा हे रास्तच आहे. पण तसे होत नसेल तर खर्चात कपात करण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी शोधला पाहिजे. अंबाडीसारखी पिके त्यासाठी उपयुक्त ठरतात. आमच्या केंद्रातून केवळ सरबताची वार्षिक ७० हजार रुपयांची विक्री होते. लोकांना नवनवी चव, खाद्यपदार्थ आवडतात. त्याची निर्मिती आपल्याच पारंपरिक पिकातून शक्य आहे. आम्ही अंबाडीच्या वाळलेल्या तुराटय़ापासून शोभेच्या वस्तू सुध्दा तयार करून विकतो. याच केंद्राच्या या यशस्वी प्रयोगाचा प्रसार व्हावा म्हणून केंद्र शासनाचे गडचिरोली व नंदुरबार या आदिवासी जिल्हय़ांत अंबाडीवरील प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दिले. वर्धा जिल्हय़ातील सुरगाव, पवनार, आमगाव, धानोली, सेलू, सेवाग्राम आश्रम, या गावात अंबाडीची शेती प्रामुख्याने होत आहे.

अंबाडी लागवड करणारे पवनारचे प्रवीण तडस म्हणाले, जोखीम नसणारे हे पीक आहे. भाव मिळण्यासाठी परिसरातच प्रक्रिया उद्योग असल्यास शेतकऱ्यांचा फायदाच होतो.

अंबाडीची फुले फुलायला लागल्यावर दूरवरून शेत ओळखू येते. हीच फुले शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. फुले तोडल्यावर पाने व त्यानंतर वाळलेल्या झाडांची रास रचण्याची कामे त्याला पैसे मिळवून देतात. उसंत मात्र मिळू देत नाही.

prashant.deshmukh@expressindia.com

First Published on July 15, 2017 1:23 am

Web Title: ambadi bhaji