राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात ६० ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. हवामानातील बदलांच्या अचूक नोंदीचा वापर कृषीविषयक घटकांसाठी करता यावा यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यभरात राबविला जाणार आहे.

हवामानातील बदलांचा कृषी उत्पादनावर परिणाम होत असतो. त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांच्या अचूक नोंदी शेतीसाठी महत्त्वाच्या ठरतात. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यभरात मंडल अधिकारी स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी विभागाने घेतला आहे.

या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात ६० स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. सदरचा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापन करण्यात आली होती. या समितीने जिल्ह्यातील हवामान केंद्रांसाठी योग्य जागेची निवड करून ती उपलब्ध करून देण्याचे काम आता पूर्ण केले आहे. त्यामुळे लवकरच या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उभारणीचे काम जिल्ह्यात सर्वत्र सुरू होणार आहे.

हवामानाशी निगडित विविध घटकांची नोंद या ठिकाणी केली जाणार आहे. यात पर्जन्यमान, तापमान, आद्र्रता, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग आणि दिशा यांसारख्या घटकांचा समावेश असणार आहे. पाच चौरस मीटर परिसरात या हवामान केंद्रांची उभारणी केली जाणार असून यामुळे जिल्ह्यातील हवामानाचा अचूक अंदाज बांधणे व शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने सूचना देणे शक्य होणार आहे. याशिवाय हवामानाचे पूर्वानुमान, आपत्ती व्यवस्थापन, कीडरोगांची पूर्वसूचना यांसारख्या बाबींसाठी या केंद्रांची मदत होणार आहे. हवामान आधारित पीक विमा योजनेसाठी या केंद्रातील नोंदीची मदत घेतली जाणार आहे.

राज्य सरकारने ‘स्कायमॅट’ संस्थेला ‘ऑटोमॅटिक वेदर स्टेशन’ उभारणीचे काम सोपवले आहे. या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्याला भेट दिली. व हवामान केंद्र उभारणी करण्याच्या जागांचा आढावा घेतला आहे. त्यामुळे लवकरच हे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व ६० जागा निश्चित केल्या असून शासकीय जागांमध्येच सर्व ठिकाणी हे प्रकल्प उभारले जाणार आहे. येत्या १० दिवसांत जिल्ह्यात ‘ऑटोमॅटिक वेदर स्टेशन’ उभारणीचे काम सुरू होईल. या हवामान केंद्रातील नोंदींचा कृषीविषयक कामांसाठी वापर केला जाईल.

–   के. व्ही. तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक रायगड.

harshad.kashalkar@expressindia.com