News Flash

मधुमक्षिकापालनातून शेती विकास

शेतातील डाळिंबाच्या झाडांना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बहर आला.

हवामान बदल, कीटकनाशकांचा वाढता वापर, वृक्षतोड यांमुळे मधमाश्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या परागीकरण होत नाही. मधमाश्या आणि लहान-लहान किडय़ांचेही प्रमाण कमी होत आहे. त्यातच मधमाश्यांमुळे परागीकरण कशा प्रकारे घडून येते याची योग्य ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळेही शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळेच  मधमाश्यांद्वारे परागीकरणाचे प्रयोग शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत.

पुणे जिल्ह्य़ात इंदापूर तालुक्यातील अगोटी या लहानशा गावात धनंजय टकले यांची तीन एकर शेती आहे. या तीन एकरांत त्यांची एक हजार डाळिंबांच्या  झाडांची लागवड केली आहे. मात्र, चांगला मोहोर येऊनही या झाडांना फळे येत नसल्यामुळे टकले चिंताग्रस्त होते. त्यानंतर त्यांनी मधमाश्यांच्या माध्यामातून परागीकरण घडवून आणल्यामुळे त्यांची डाळिंबांची बाग आता फळांनी बहरलेली आहे. केवळ पाच महिन्यांत हा बदल घडवून आणण्यात टकले यांना यश मिळाले आहे ते केवळ मधमाश्यांमुळे.

टकले यांनी प्रथमच शेतात डाळिंबलागवड केली. मजूर, लागवड, औषध फवारणी यांसह त्यांनी सहा लाख रुपये खर्च केला. शेतातील डाळिंबाच्या झाडांना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बहर आला. पण फळे येण्याऐवजी आलेली ही फुले हळूहळू गळून पडू लागली. त्यामुळे त्यांनी गावातील इतर शेतकऱ्यांशीही याबाबत चर्चा केली. तेव्हा त्यांना कळले की परागीकरण न घडल्यामुळे फळबागांतील फुले गळून पडतात. पीक फुलोऱ्यात आल्यानंतर स्त्रीकेसर व पुंकेसर यांचा संयोग घडून येण्यासाठी त्रयस्थाची गरज असते. वाऱ्याच्या रूपाने त्रयस्थाची भूमिका पार पाडत परागीकरण घडते. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर मध गोळा करण्यासाठी जेव्ह मधमाश्या जातात तेव्हा त्यांच्या पायांना परागकण चिकटून जातात व त्यातून स्त्रीकेसर व पुंकेसरचा संयोग घडतो. हे परागीकरण न झाल्यामुळे फळनिर्मिती होत नाही.

सहकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार टकले यांनी परागीकरणासाठी २० ते ३० हजार मधमाश्या असलेल्या पेटय़ा भाडय़ाने घेऊन शेतात ठेवण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी भाडय़ाने आणलेल्या मधमाश्यांच्या पेटय़ा शेतात विविध ठिकाणी ठेवल्या.

मधमाश्यांच्या पेटय़ा भाडय़ाने घेण्यासाठी मी लातूर जिल्ह्य़ातील मधमाश्यांचे संगोपन करणारे दिनकर पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून मधमाश्यांच्या तीन पेटय़ा भाडय़ाने घेतल्या. या पेटय़ा शेतात ठेवल्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला शेतातील ९० टक्के झाडांना फळे येण्यास सुरुवात झाली. पुढील पंधरा दिवसांत शेतातील सर्व डाळिंबाच्या झाडांना फळे येतील आणि २० टनांपर्यंत उत्पादन मिळेल असा विश्वास वाटतो. या मधमाश्यांशिवाय माझे कष्ट वाया गेले असते, असेही टकले या वेळी म्हणाले.

हवामान बदल, कीटकनाशकांचा वाढता वापर, वृक्षतोड यांमुळे मधमाश्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या परागीकरण होत नाही. मधमाश्या आणि लहान-लहान किडय़ांचेही प्रमाण कमी होत आहे. त्यातच मधमाश्यांमुळे परागीकरण कशा प्रकारे घडून येते याची योग्य ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळेही शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळेच टकले यांच्या शेतातील मधमाश्यांचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही निश्चित प्रेरणादायी ठरेल असाच आहे.

कांदा, कापूस, तेलपिके, फळे, भाज्या, फळभाज्या यांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होण्यासाठी परागीकरण होण्याची आवश्यकता असते. म्हणजेच ही पिके मधमाश्यांवरच अवलंबून आहेत. मध गोळा करताना मधमाश्यांमुळे परागीकरण घडून येते आणि या पिकांचे भरघोस उत्पादन होते. यासाठी मधमाश्या अधिक उपयुक्त ठरतात. मधमाश्यांमुळे शेती उत्पादनात ३० टक्क्यांची वाढ होते हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. कापूस उत्पादनात १७ ते १९ टक्के, सूर्यफूल उत्पादनात ४८ टक्के आणि लिचीज या फळाच्या उत्पादनात १५० ते १७० टक्के वाढ होते. शेतातील पिकांना फुले येण्याच्या दरम्यान शेतात मधमाश्यांच्या पेटय़ा ठेवल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचे पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्यक संचालक लक्ष्मी राव यांनी सांगितले.

कीटकनाशकांच्या मोठय़ा प्रमाणावरील वापरामुळे मधमाश्यांची संख्या कमी होत आहे. त्याचा परिणामही शेती उत्पादनावर होत आहे. त्यामुळेच परागिकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन मधमाश्यांच्या कृत्रिम पेटय़ा भाडेतत्त्वावर देण्याचा नवा व्यवसाय विकसित होत आहे. या पेटय़ा शेतकऱ्यांना एक ते तीन हजार रुपये प्रतिमहिना भाडय़ाने दिल्या जातात. मधमाश्यांचा विचार केवळ मध आणि मेण यासाठीच केला जातो. मात्र, मधामाश्यांचा शेती उत्पादनाशीही  संबंध असतो हे बऱ्याचदा ठाऊक नसते.

लातूर जिल्ह्य़ातील दिनकर पाटील मागील १५ वर्षांपासून  मधुमक्षिकापालनाचा व्यवसाय करत आहेत. पाटील सुरुवातीला कांदा आणि भाज्यांचे बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांना मधमाश्यांच्या पेटय़ा पुरवीत. मात्र, मागील काही वर्षांत त्यांच्या मधमाश्यांच्या पेटय़ांना शेतकऱ्यांकडूनही मोठय़ा प्रमाणात मागणी केली जाऊ लागली आहे. ज्वारी, तेलबिया, मोहरी, डाळिंब आणि इतर फळबागांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मधमाश्यांच्या पेटय़ा पुरविण्याकडे सध्या पाटील यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीमुळे मधमाश्यांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मधमाश्यांच्या पेटय़ांची मागणी आणि पुरवठा यांतील अंतर मोठे आहे. माझ्याकडे दर वर्षी पाच हजार पेटय़ांची मागणी करण्यात येते. मात्र त्यांपैकी एक पंचमांशही पेटय़ा देता येत नाहीत, असे पाटील म्हणाले. गतवर्षी केवळ इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून ५०० पेटय़ांची मागणी झाली होती. त्यांपैकी मी केवळ ५० पेटय़ा देऊ शकलो, असेही पाटील म्हणाले. पाटील दर वर्षी ७०० पेटय़ा भाडय़ाने देतात.

खादी व ग्रामोद्योग आयोगाद्वारे मधुमक्षिकापालनास प्रोत्साहन देण्यात येते. हे प्रोत्साहन आतापर्यंत केवळ मधाच्या निर्मितीपर्यंतच मर्यादित होते. मात्र, आता मधुमक्षिकापालनास मागणी वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रात येण्याची इच्छा असणाऱ्यांनाही नवा मार्ग मिळाला आहे. पिकाला बहर येण्याच्या कालावधीत शेतात मधमाश्यांच्या पेटय़ा ठेवल्या जातात. झाडांना फळे लागताच या पेटय़ांचा मुक्काम दुसऱ्या शेतीक्षेत्रात हलविला जातो. उन्हाळा आणि पावसाळा वगळता मधमाश्यांच्या पेटय़ांना मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे पाटील सांगतात.

प्रशिक्षित मधुमक्षिकापालकांची कमी असलेली संख्या ही चिंतेची बाबत आहे. मधमाश्यांचा नैसर्गिक आधिवास नष्ट होत असल्यामुळे शेती क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मधुमक्षिकापालनाशिवाय दुसरी हरितक्रांती होणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या संरक्षणाकडे संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे असल्याचे लक्ष्मी राव यांनी सांगितले.

  • पाटील हे ‘अ‍ॅपीस मेलीफेरा’ ही युरोपियन मधमाशी पाळतात. ही मधमाशी चार चौरस किमी क्षेत्रात प्रवास करून मधनिर्मिती आणि परागीकरणाचे काम करते.
  • पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील विपीन महाजन हेदेखील मधुमक्षिकापालन करतात. ते ‘अ‍ॅपीस ट्रायगोना’ ही मधमाशी पाळतात. या मधमाश्या परागीकरणासाठी अतिशय उपयुक्त आहेत. या मधमाश्यांचे स्थलांतर केले जात नाही. या मधमाश्या प्रतिएकर एक पेटी या प्रमाणात ठेवल्या जातात.
  • ट्रायगोना मधमाश्यांना जास्त देखभालीची गरज नसते. मेलीफेराच्या पेटय़ा तीन वर्षांपर्यंत राहू शकतात. तर ट्रायगोना या जातीला दर वर्षी पुन:पेशी निर्माण कराव्या लागतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 12:29 am

Web Title: bee farming honey bee farming
Next Stories
1 काजू ‘परदेशी’ जोखडातून मुक्त
2 गरज शेतकरी उत्पादक संघटनांची
3 आधुनिक की जैविक शेती लाभदायक?
Just Now!
X