बीड जिल्ह्य़ातील गोमळवाडा  (ता. शिरुर) हे गाव कायम दुष्काळी पट्टय़ातील परिणामी शेतीही पारंपरिक पद्धतीनेच. या गावातील मोहन काकडे यांनी विज्ञान विषयातील पदवी प्राप्त केल्यानंतर शहरात जाऊन नोकरी शोधण्याऐवजी वडिलोपार्जति शेतीतच त्याने मन रमवले. शेडनेटच्या साहाय्याने केवळ दहा गुंठय़ात चार महिन्यांत साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन कडू कारल्यातून आर्थिक गोडी निर्माण करण्याची किमया काकडे यांनी साधली.

चवीला कडू असले तरी आरोग्याला उत्तम असलेले कारले मधुमेहींसाठी औषधी असल्याने शहरातील बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने शेडनेटच्या साहाय्याने केवळ दहा गुंठय़ात चार महिन्यांत साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन कडू कारल्यातून आर्थिक गोडी निर्माण करण्याची किमया उच्चशिक्षित मोहन काकडे या तरुण शेतकऱ्याने साधली. शिक्षण घेतल्यानंतर बहुतांशी तरुण नोकरीच्या मागे धावतात. अपेक्षित नोकरी मिळाली नाही की निराश होऊन शहरामध्ये मिळेल ते काम करण्यात धन्यता मानतात. अशा परिस्थितीत गावात राहून आपल्या शिक्षणाचा शेतीच्या उत्पादनात वापर करून काकडे यांनी शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान, पाण्याचे योग्य नियोजन करून कारल्याचे विक्रमी उत्पादन घेऊन नोकरीपेक्षाही चारपट नफा घेऊन स्वयंभू होण्याचा यशस्वी प्रयत्न केला. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानने या कृषी क्षेत्रातील कामाची दखल कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करत काकडे यांना अधिक काम करण्याचे बळ दिले आहे.

बीड जिल्ह्य़ातील गोमळवाडा (ता. शिरुर) हे गाव कायम दुष्काळी पट्टय़ातील परिणामी शेतीही पारंपरिक पद्धतीनेच. मात्र गावाच्या बाजूने सिंदफना मध्यम प्रकल्पाच्या बंधाऱ्यामुळे पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे मागील काही वर्षांपासून शिवारात कांदा आणि मिरची घेणारे गाव म्हणून ओळखले जात आहे. शेतकऱ्यांची शिकलेली बहुतांशी मुले शेती सोडून शहरामध्ये मिळेल ते काम करण्यातच धन्यता मानतात. उच्च शिक्षणाचा आपल्या गावात, आपल्या शेतीला फायदा करावा असा विचार फार कमी प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे वडिलोपार्जति शेती असूनही उच्च शिक्षित झालेल्या तरुणांचा शेतीकडे फारसा कल दिसत नाही, याला गोमळवाडाही अपवाद नाही. अशा वातावरणात मोहन काकडे वय ३२ वर्षे. विज्ञान विषयातील पदवी (बीएससी) प्राप्त केल्यानंतर शहरात जाऊन नोकरी शोधण्याऐवजी वडिलोपार्जति शेतीतच त्याने मन रमवले. गावात कापूस, कांदा, मिरची या पिकांवर शेतकऱ्यांचा भर असला तरी मिरचीची तोड आणि कांद्याला मिळणारा भाव यातून फारसे उत्पन्न पदरात पडत नाही. काकडीच्या लागवडीतील अनेक धोके असल्यामुळे मोहनने कारले फळशेती करण्याचा निर्णय घेतला. बाजारात इतर फळभाज्यांपेक्षा कारल्याला मागणी जास्त आणि उत्पन्न कमी असल्यामुळे भाव चांगला मिळतो. हे लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने कारल्याचे पीक घेण्याची तयारी केली. एकूण दहा एकरपकी भाजीपाल्यासाठी असलेल्या तीन एकरमधील दहा-दहा गुंठय़ांमध्ये दोन शेडनेट उभे केले. एका शेडनेटमध्ये कारल्याची लागवड केल्याने कारल्यावर पडणारी कीड टळली आणि उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन मात्र वाढले. शेतात पन्नास लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधून ठिबक सिंचनच्या माध्यमातून दोन वर्षांपासून त्यांनी कारल्याचे भरघोस उत्पन्न घेण्याचा यशस्वी प्रयोग केला. यावर्षी मार्च महिन्यात ईस्टवेस्ट पाली या वाणाची लागवड करून शास्त्रशुद्ध पद्धत वापरली. चार बाय सहाच्या अंतराने लागवड. शेडनेटला तारेचे फाऊंडेशन व दोरीच्या साहाय्याने वेल वाढण्याची सोय केली. आठवडाभरातच रोपे वाढू लागली. पंधरा दिवसातून एकदा ठिबकमधून खत दिल्यानंतर १५ ते ४५ दिवसांपर्यंत १९:१९ आणि ४५ ते ५५ दिवसांपर्यंत १२:६१ खताचे डोस ठिबकमधून दिले. परिणामी, वेलींची चांगली वाढ होऊन ४६व्या दिवशीच कारले लागले आणि ५५ दिवसांपर्यंत तोडण्यास आले. अशा शास्त्रशुद्ध पद्धतीमुळे एक दिवसाआड कारले तोडण्यासाठी येतात, असा दावा त्यांचा आहे. तर बाजारातही ४० ते ८० रुपये किलोप्रमाणे तर उन्हाळ्यात जास्तीचा भाव मिळतो.

तब्बल चार महिने तोड सुरू राहते. तर शेडनेटमुळे रोगराई होत नाही आणि उत्पन्न वाढते. ऑगस्ट महिन्यात बारा टनापर्यंत उत्पन्न होऊन साडेचार ते पाच लाख रुपयांचा नफा यातून मिळाला आहे. नगर, बीड, लातूरच्या बाजारात कारल्यांना मोठी मागणी आहे. कारल्याबरोबर आंतरीक पद्धतीने फुलकोबीही यात दीड टनापर्यंत उत्पादित झाल्याने दहा गुंठय़ामध्ये अतिरिक्त उत्पन्न मिळाले. पाण्याचे योग्य नियोजन, नवीन प्रयोगाचा ध्यास, कष्ट करण्याची तयारी यामुळे मोहन काकडे या उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने अत्यंत कमी खर्चात शास्त्रशुद्ध पद्धतीने कारल्यातून चांगले उत्पन्न मिळवत सरकारी नोकरदारापेक्षा चौपट पसा मिळवला आहे. काकडे यांच्या या शेतीतील प्रयोगाची दखल घेऊन पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानने यावर्षीचा कृषी रत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

vasantmunde@yahoo.co.in