12 December 2017

News Flash

काळभाताचा सुगंध दरवळतोय..

अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांत ‘काळभाता’चा सुगंध पुन्हा दरवळू लागला आहे.

प्रकाश टाकळकर | Updated: April 22, 2017 3:36 AM

अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांत ‘काळभाता’चा सुगंध पुन्हा दरवळू लागला आहे.

काळभाताचा सुगंध दरवळतोय..

अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांत ‘काळभाता’चा सुगंध पुन्हा दरवळू लागला आहे. पावसाळ्यात हरिश्चंद्राच्या डोंगररांगांत लगतच्या आदिवासी गावातून हिंडताना काळपट विटकरी रंगाच्या ओंब्यांचे भातखाचर आपले लक्ष वेधून घेतात. त्या खाचरातून येणारा सुगंध दूरवरही जाणवतो. काळाच्या ओघात हळुहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असणारे काळभात हे येथील पारंपरिक भाताचे वाण पुन्हा या भूमीत रुजू लागले आहे. आदिवासी शेतकऱ्यांमध्ये येत असणारी जागृती, काळभात लागवडीकडे त्यांचा वाढता ओढा, स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न यामुळे पुन्हा काळभाताचा सुगंध दरवळेल अशी चिन्हे दिसत आहेत.

पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या पश्चिम घाटात अकोले तालुक्याच्या पश्चिम भागाचा समावेश होतो. जैव विविधतेने समृद्ध असणाऱ्या या प्रदेशात कृषी जैव विविधताही विपुल प्रमाणात आहे. मात्र बदलत्या हवामानाच्या पाश्र्वभूमीवर नसíगक जैव विविधतेप्रमाणे कृषी जैव विविधताही धोक्यात आलेली आहे. तालुक्याचा हा पश्चिम भाग भातपिकासाठी प्रसिद्ध आहे. आंबेमोहोर, जिरवेल, काळभात या गावरान किंवा पारंपरिक सुवासिक भाताच्या जाती पण सुधारित आणि संकरित भात वाणांच्या प्रसारामुळे या जातीही आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रुचकर चव आणि सुगंध ही काळभाताची वैशिष्टय़े. पूर्वी तालुक्यातील अनेक गावांमध्ये थोडय़ा फार प्रमाणात का होईना, काळभाताची लागवड केली जायची, मात्र पूर्वी कमी उत्पादकता तसेच शुद्ध बियाणे मिळण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे या वाणाची लागवड हळुहळू कमी होत गेली. काळाच्या ओघात लुप्त होणाऱ्या अनेक पारंपरिक पिकांमध्येही काळभाताचा समावेश होईल अशी भीती वाटत होती. पण सुमारे सात वर्षांपूर्वी ‘लोकपंचायत’ या स्वयंसेवी संघटनेने काळभात संवर्धनाच्या कामास सुरुवात केली. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडत असला तरी अतिपावसाच्या प्रदेशात काळभात टिकत नाही. त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्व भागात जेथे एक ते दोन हजार मिलिमीटर पाऊस पडतो अशा ठिकाणी काळभात चांगला पडतो. त्यानुसार हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांतील सोमलवाडी परिसरात १५ गावात काळभात संवर्धनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पूर्वी या परिसरातील अवघे १५ ते २० शेतकरी काळभात पिकवायचे, पण आता त्यांच्यामध्ये दहा पटीने वाढ झाली असून सध्या दीडशेपेक्षा अधिक शेतकरी काळभाताची लागवड करतात. काळाच्या ओघात काळभाताचे शुद्ध बियाणे मिळणे अवघड होते. मात्र पारंपरिक शास्त्रीय ज्ञानाच्या आधारे शुद्ध बी तयार करण्याचे नियोजन करून लोकपंचायत संस्थेने बीजकोश तयार केला. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात घनसाळ या स्थानिक भातावर पथदर्श प्रकल्प राज्य शासनाने राबविला होता. त्याच धर्तीवर कृषी विभागाने एक वर्षी काळभातावर असा प्रकल्प हाती घेतला. सोमलवाडी परिसरातील निवडक दहा गावांमध्ये हा प्रकल्प वर्षभर राबविला गेला, त्याचाही फायदा झाला. या सर्वामुळे काळभाताचे लागवड क्षेत्र हळुहळू वाढू लागले आहे. लोकपंचायत संस्थेने काळभात उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी गावपातळीवरच भात खरेदीचे नियोजन केले व त्याची विक्री व्यवस्था उभारली, त्यातूनही काळभात संवर्धनाला चालना मिळाली.

महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रमात पीक वाण संवर्धन प्रकल्पात काळभात या पारंपरिक भाताच्या जातीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन, संवर्धन करण्यासाठी सुरुवात झाली आहे. काळभाताच्या मूल्य संवर्धन करण्याच्या कामाला त्यामुळे गती आली. काळभाताच्या हातसडी तांदळाला बाजारपेठेत चांगली मागणी होती. पारंपरिक पद्धतीने घरगुती उफाळात मुसळाने भात कांडताना तांदळाचे जास्त तुकडे व्हायचे. कणे तयार व्हायचे. त्यामुळे हातसडी तांदूळ तयार करण्यासाठी कमी उर्जेवर चालणारी यंत्रे विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. पाबळ येथील विज्ञान आश्रमाच्या मदतीने अनेक प्रयत्नानंतर साळीचे फक्त साल काढणारे डिहिस्कग मशिन तयार झाले. त्याचा वापर करून काळभातापासून सध्या ब्राऊन राईसची निर्मिती होत आहे, यामुळे बाजारपेठेत एका वैशिष्टय़पूर्ण उत्पादनाची भर पडली आहे.

शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या पारंपरिक वाणांना संरक्षण देणारा पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा २००१ हा कायदा आहे. पारंपरिक पद्धतीने वर्षांनुवष्रे जे शेतकरी गट वैशिष्टय़पूर्ण वाणाची लागवड करतात, अशा गटांना त्या कायद्यांतर्गत त्या वाणावर कायदेशीर हक्क मिळतो. लोकपंचायतने या संदर्भातील प्रक्रिया हाती घेतली असून काळभात उत्पादक गटांना प्रोत्साहन देऊन या संदर्भातील प्रस्ताव राहुरी कृषी विद्यापीठामार्फत दिल्ली येथे पाठविला आहे. सरकारमान्य प्रक्षेत्रावर या वाणाची लागवड होईल. गुणधर्माची तपासणी होईल व त्यानंतरच शेतकरी गटांना हक्क द्यायचे की नाही हे ठरविले जाईल. पश्चिम घाटातील गावरान भातपिकांच्या संवर्धन कामाला यानिमित्ताने सुरुवात झाली आहे.

* काळभात हे प्रदेशनिष्ठ भाताचे वाण आहे. अकोले तालुक्याव्यतिरिक्त अन्य कोठे याचे फारसे अस्तित्व जाणवत नाही. कृषी विद्यापीठ अथवा कृषी खात्याकडेही या काळभातासंदर्भात काही संशोधन अथवा दस्तऐवज आढळत नाही.

* काळभाताचा सुगंध किंवा सुवास हे त्याचे प्रमुख वैशिष्टय़. मात्र हा सुवास आता कमी होत असल्याचे या परिसरातील शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे. शेतकऱ्यांचे बियाणांसाठी कृषी खाते, बियाणे कंपन्या यांचेवरचे अवलंबित्व जसजसे वाढत गेले तसतसे आपल्या परिसरातील स्थानिक वाण टिकविण्याचे कौशल्य हळुहळू कमी होत गेल्याचे लोकपंचायतीचे विजय सामेरे सांगतात.

* भाताच्या सुमारे पंचवीस हजार जंगली वाणांपासून वाईल्ड व्हरायटी शेती उत्क्रांतीच्या गेल्या पंधरा हजार वर्षांत देशातील शेतकऱ्यांनी केवळ भात पिकाचेच तीन लाख स्थानिक जातीचे वाण तयार केले. त्या प्रदेशातील हवामान, माती, शेतकऱ्यांचे कौशल्य यातून हे वाण विकसित होत गेले.

* सध्याही देशात किमान भाताच्या पन्नास हजार अशा प्रकारच्या जाती अस्तित्वात असाव्यात असा अंदाज आहे. पण आता पारंपरिक वाणाऐवजी शेतकरी बाहेरून आणलेल्या संकरित सुधारित वाणांचा उपयोग करतात. त्यामुळे ठिकठिकाणचे स्थानिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सुधारित किंवा संकरित वाण तयार करताना त्या त्या प्रदेशातील स्थानिक वाणांच्या गुणधर्मात सुधारणा करून असे वाण विकसित केले तर निश्चितपणे परंपरागत पिकांच्या जाती टिकू शकतील पण तसे होत नाही. त्या प्रदेशाशी पूर्णपणे विसंगत अशा सुधारित जाती तयार केल्या जातात असेही सामेरे यांचे निरीक्षण आहे.

प्रकाश टाकळकर prakashtakalkar11@gmail.com

First Published on April 22, 2017 3:34 am

Web Title: black rice plant in sahyadri mountain ranges