01 June 2020

News Flash

अर्थपूर्ण गाजरशेती

गाजरात ‘अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे याचा अधिक वापर केल्यामुळे दृष्टिदोष दूर होतो.

गाजराच्या शेतीत भांडगावचे राजाभाऊ अंधारे.

 

गाजर हे कंदवर्गीय पीक आहे. खरीप व रब्बी अशा दोन्हीही हंगामांत गाजराचे उत्पादन देशभर घेतले जाते. जून, जुल महिन्यांत खरीप हंगामासाठी, तर ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत रब्बी हंगामासाठी गाजराचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामातील गाजराचा गोडवा हा अधिक असतो.

गाजरात ‘अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे याचा अधिक वापर केल्यामुळे दृष्टिदोष दूर होतो. प्राथमिक वर्गापासूनच गाजराचे महत्त्व शिकवले जाते. रातांधळेपणा दूर होण्यासाठी गाजराचे अधिक सेवन करावे, असा सल्ला दिला जात असतो. गाजराचे सूप, गाजराचा रस, गाजराचे सॅलड, लोणचे, जाम खाण्यासाठी वापरतात. गाजराच्या चकत्या करून त्या सुकवूनही साठवल्या जातात. गाजराच्या उत्पादनासाठी जमीन भुसभुशीत लागते. नांगरून व पाळी घालून ती भुसभुशीत केल्यानंतर त्यात वाफे करून १५ बाय १५ किंवा २० बाय २० सेंटिमीटर अंतरावर गाजराचे बी पेरले जाते. पेरणीपूर्वी चोवीस तास बी भिजवून ते बहुतेक ठिकाणी वाळूत मिसळून पेरले जाते. हेक्टरी ६ ते ८ किलो बियाणे लागते.

गाजराच्या संकरित वाणात पुसा मेघाली, पुसा केशर, चँटनी, नाँटेस या जाती प्रामुख्याने घेतल्या जातात. हेक्टरी २५ किलो नत्र, २५ किलो स्फुरद व ७० किलो पालाश या खताची मात्रा दिली जाते. अर्थात, मातीपरीक्षणानंतर खताच्या मात्रेचे प्रमाण ठरवले जाते. गाजराच्या उत्पादनासाठी थंड हवामान लागते. १५ ते २० सेल्सिअस तापमान असेल, तर गाजराचा रंग आकर्षक होतो. पेरणीनंतर ७० ते ९० दिवसांत गाजर काढणीसाठी येतात. काढणी करताना कुदळीने किंवा कुळवाचा वापर काढणीसाठी केला जातो. काढणीनंतर गाजर स्वच्छ धुऊन बाजारात नेल्यास त्याला चांगला भाव मिळतो.

फारशा रोगाची अडचण आली नाही व काढणीच्या वेळी पावसात सापडले नाही तर गाजराचे उत्पादन एकरी ८ ते १० टनापर्यंत मिळते. सर्वसाधारणपणे ८ ते १० रुपये किलो भाव मिळतो. त्यामुळे एकरी ८० ते ९० हजारांचे उत्पादन तीन ते साडेतीन महिन्यांत शेतकऱ्यांना मिळते.

उस्मानाबाद जिल्हय़ातील परंडा तालुक्यातील भांडगाव हे गाजराचे गाव म्हणून ओळखले जाते. बार्शी, भूम, परंडा व परिसरातील बाजारपेठेत भांडगावच्या गाजरांना अतिशय चांगला भाव मिळतो. उत्तम दर्जाचे देशी गाजर या गावात पिकवण्याची परंपरा सुमारे ७० वर्षांपासून आहे. भांडगावचे शेतकरी राजाभाऊ अंधारे यांचे शिक्षण बीएपर्यंत झाले. सुमारे १४ एकर जमीन. विहीर, िवधनविहीर असल्यामुळे बागायती शेती काही प्रमाणात करतात. या गावात सुमारे २ हजार एकर जमिनीचे क्षेत्र आहे. सर्वसाधारणपणे ३००पेक्षा अधिक एकरावर दरवर्षी गाजराचे उत्पादन घेतले जाते. या गावात संकरित गाजरांपेक्षा गाजराचे गावरान वाण घेण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. या वाणासाठी एकरी १५ ते २० किलो बी लागते व उत्पादन ८ ते १० टनापर्यंत हमखास मिळते. या गावच्या परिसरात चोपण जमीन आहे. वाफे करून प्रत्येक शेतकरी दरवर्षी गाजराचे उत्पादन घेतो. १० गुंठय़ापासून पाच एकरापर्यंत गाजराचे उत्पादन घेणारे शेतकरी या गावात आहेत. बहुतांश शेतकऱ्यांची पद्धत ही गाजराचे बी टाकल्यानंतर ते खुरपण करत नाहीत, फवारणी करत नाहीत. आवश्यकतेनुसार एखाददुसरे पाणी देतात. गरजेनुसार पाणी दिल्यास उत्पादनात वाढ होते, मात्र जास्त पाणी दिले तर गाजराचा गोडवा कमी होतो, त्यामुळे बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन माल तयार केला जातो.

या गावच्या गाजराच्या तुलनेत अन्य गावात गुणवत्तावान गाजर उत्पादित होत नाही, असा या गावकऱ्यांचा वर्षांनुवर्षांचा अनुभव आहे. गावकऱ्यांनी शेजारच्या गावात स्वत: गाजर लावण्याचा प्रयत्न केला. उत्पादन झाले, मात्र भांडगावसारखी गुणवत्ता मिळाली नाही. आपल्या गावची गाजरे ही राज्यभर प्रसिद्ध असल्यामुळे ती परंपरा जोपासण्यात गावकऱ्यांना अभिमान वाटतो. काढणीच्या वेळी शेतकऱ्यांना थोडासा त्रास आहे. मजुरीचे दर वाढले आहेत, मात्र यातून उत्पन्नही चांगले मिळते. त्यामुळे ही परंपरा आम्ही जोपासतो, असे अंधारे यांनी सांगितले.

शेतीच्या नियोजनात गाजराचे उत्पादन घेण्याची निश्चिती करून दरवर्षी किमान काही क्षेत्रावर गाजराचे उत्पादन घेत राहिले तर शेतकऱ्याला चांगले पसे मिळतात. बाजारपेठेत देशी गाजरांना चांगली मागणी आहे. मात्र हल्ली लोक उत्पादन घेत नाहीत. त्यामुळे संकरित गाजर अधिक प्रमाणावर विकले जात असल्याचे अंधारे यांचे म्हणणे आहे.

pradeepnanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2016 1:01 am

Web Title: carrot farming
Next Stories
1 बाजारपेठेचाही अभ्यास हवा!
2 विक्री व्यवस्था हीच डोकेदुखी
3 हरितगृह शेती गोत्यात का आली?
Just Now!
X