शेळ्यांच्या कृत्रिम रेतनाची पद्धती मागील वीस वर्षांपासून प्रायोगिक पातळीवर अस्तित्वात आहे. मात्र, त्याकडे आतापर्यंत दुर्लक्षच केले जात होते. मागील दीड वर्षांपासून शेळ्यांचे कृत्रिम रेतन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. गोहत्येवर बंदी घालण्यात आल्यानंतर मांसाची गरज भागविण्यासाठी कृत्रिम रेतन वाढल्याचे चित्र आहे.

भारतातील शेतकऱ्यांना आवश्यक साहाय्यभूत उद्योगांपैकी शेळीपालन हा सर्वात जास्त नफा असलेला तसेच जास्त जबाबदारी नसलेला उद्योग आहे. सहज, अधिक जबाबदारी नसलेला आणि सर्वात जास्त नफा देणारा शेळीपालन उद्योग हा सध्या व्यावसायिक स्वरूपात आणणे सहज शक्य असूनही हा प्राणी दुर्लक्षित राहिला आहे. गरिबाची गाय म्हणविणाऱ्यांनी ती शेळी गरिबांसारखीच नजरेआड ठेवली आहे. शेळी ही वास्तविक गरिबांसाठी बँक आहे.  मागील दीड वर्षांपासून शेतकऱ्यांचा शेळ्यांच्या कृत्रिन रेतनाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे शेळीपालन करताना दर्जेदार शेळ्या कृत्रिम रेतन पद्धतीतून मिळविता येत असल्याचे आर्थिक संपन्नता मिळू लागली आहे. वीस वर्षांपूर्वी शेळ्यांमधील कृत्रिम रेतन प्रायोगिक पातळीवर होते. त्याचा प्रसारही संथच होता. मात्र, गोहत्या बंदीनंतर वाढती मांसाची गरज भागविण्यासाठी कृत्रिम रेतनाचा गांभीर्याने विचार होऊ लागला आहे.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Increase in prices of fruits and vegetables due to decrease in arrivals
खिशावर आर्थिक ताण; पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ

ज्या शेळ्या तुम्हास तिप्पट नफा मिळवून देणार आहेत, त्यासाठी नेहमी चिकित्सक दृष्टीने विचार करीत राहिले पाहिजे. शेळ्यांचा पौष्टिक आहार, रोगप्रतिबंधक व्यवस्थापन ठेवल्यास त्यांना सहसा रोग होत नाहीत. शेळ्यांचे चांगल्या प्रतीने व्यवस्थापन केल्यास ८ ते १० महिन्यांत शेळ्या गाभण राहू शकतात. त्यांना पौष्टिक आहार दिल्यास दर १३-१४ महिन्यांत दोन वेते होतात. हे सगळे फायदे बंदिस्त शेळीपालनातून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने मिळविता येतात. बंदिस्त पद्धतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे शेळीला अधिक कोकरे झाली पाहिजेत, पिलांची वाढ अधिक वेगाने झाली पाहिजे, शेळ्यांची पचनशक्ती अधिक असली पाहिजे. या सर्व गोष्टी असणाऱ्या भारतीय वंशावळीच्या किंवा आफ्रिकेतील बोअर जातीच्या बोकडाचा संकरासाठी वापर केला पाहिजे. आता असे चांगले गुणधर्म असणाऱ्या जातिवंत बोकडाचे वीर्यसंकलन करून कृत्रिम रेतनाची सोय उपलब्ध आहे.

भारतामध्ये १९५० सालापासून मोठय़ा जनावरांमध्ये गर्भधारणेसाठी कृत्रिम रेतनाचे तंत्र वापरले जात आहे. फ्रान्समध्ये शेळ्यांसाठी कृत्रिम रेतन पद्धत मोठय़ा प्रमाणावर वापरली जाते. तेथे कृत्रिम रेतन केलेल्या शेळ्यांची संख्या १९८३ मध्ये दहा हजार होती. यामध्ये वाढ होऊन १९८७ मध्ये ती ३५ हजार इतकी झाली. त्याचबरोबर कृत्रिम रेतन केलेल्या दुधाळ शेळ्यांची १९७७ मध्ये असलेली एक लाख ५० हजार ही संख्या वाढून १९८७ मध्ये पाच लाख इतकी झाली.

शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतनाचे फायदे

१. कृत्रिम रेतन हे तंत्र वापरून सुधारित जातीच्या बोकडाच्या वीर्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर करता येतो. विशेषत: ज्या पशुपालकांना आपल्या जनावरांमध्ये संकरीकरणाद्वारे सुधारणा घडवून आणण्यासाठी सुधारित जातीचे नर पाळण्याची कुवत नसते, त्यांच्यासाठी कृत्रिम रेतन तंत्र हे एक वरदान आहे. एखादा बोकड नैसर्गिक संकरासाठी वापरल्यास त्याच्यापासून वर्षांला ४० ते ५० करडांची पैदास होत असेल, तर त्याच नरापासून वर्षांला तीन हजार वीर्यमात्रा उपलब्ध होतात. त्या वीर्यमात्रा वापरून कृत्रिम रेतनाद्वारे फलिताचे प्रमाण जरी ३०-३५ टक्के मिळाले तरी त्यापासून अंदाजे एक हजार सुधारित संकरित करडांची पैदास होऊ शकते.

२. जेव्हा शेळ्यांचा माजाचा हंगाम नसतो त्या वेळेस नैसर्गिक संकरासाठी नर अनुत्सुक असतो आणि त्याच्या वीर्याची प्रतदेखील खालावलेली असते व त्यामुळे फलिताचे प्रमाणदेखील खालावते. अशा वेळेस गोठविलेले वीर्य व कृत्रिम रेतन उपयुक्त ठरते.

३. नैसर्गिक संकरासाठी एकाच नराचा अनेक माद्यांशी संपर्क येतो. यामधून नराकडून मादीला व मादीकडून नराला प्रजनन संस्थेच्या सांसर्गिक रोगांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. कृत्रिम रेतनाद्वारे हे टाळता येते.

४. एकाच बोकडाचा सारखा संकर झाल्यामुळे खेडेगावामधील शेळ्यांचा दर्जा खालावत जात आहे व निपजणारी करडे उत्पादन क्षमतेच्या दृष्टीने फारच निकृष्ट असल्याचेही जाणवते. याचे आणखी एक कारण म्हणजे कोणी पाळलेला बोकड असलाच तर तो निकृष्ट दर्जाचा असतो. कारण एखादा चांगला व जोमाने वाढणारा बोकड असला तर तो लवकर कत्तलीसाठी योग्य होतो व आर्थिक कारणास्तव अशा बोकडांची कत्तल होते. त्यामुळे पैदाशीसाठी उपलब्ध असलेला बोकड चांगल्या दर्जाचा नसतो. म्हणूनच कृत्रिम रेतनाद्वारे इनब्रीडिंग टाळण्यासाठी वीर्य उपलब्ध करणाऱ्या केंद्रांनी पुरेशा संख्येमध्ये एकमेकांशी नातेसंबंध नसलेले नर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या गावपातळीवर वळूंचे गोठविलेले वीर्य वापरून मोठय़ा प्रमाणावर गाईमध्ये कृत्रिम रेतन केले जात आहे. वळू व बोकडाच्या गोठविलेल्या वीर्यमात्रांची तुलना करता बोकडाच्या वीर्यमात्रांची किंमत वळूच्या वीर्यमात्रेपेक्षा थोडी जास्त पडते. याचे कारण म्हणजे वळूच्या एका वीर्य संकलनातून प्रति मात्रा १५ ते २० दशलक्ष शुक्रजंतू असलेल्या १०० ते १५० वीर्यमात्रा तयार होतात; परंतु शेळ्यांमधील कृत्रिम रेतनाकरिता एका वीर्यमात्रेमध्ये शुक्रजंतूंचे प्रमाण कमीत-कमी १८० दशलक्ष असणे आवश्यक आहे. त्यामुळे बोकडाच्या एका वीर्य संकलनातून २५ ते ३० एवढय़ाच वीर्यमात्रा तयार होतात. तसेच बोकडाचे वीर्य गोठविणे थोडे क्लिष्ट आहे. शेळ्यांमधील जनुकीय सुधारणा आणि शेळ्यांची उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शेळ्यांमधील कृत्रिम रेतन कार्य विस्तारित करण्याचा हेतू आहे. भारतामध्ये ओरिसा, तमिळनाडू, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांनी त्यांच्याकडील पशुवैद्यांना शेळ्यांमधील कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण दिलेले आहे. कृत्रिम रेतनाद्वारे शेळी सुधारण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होऊ शकेल. त्याचप्रमाणे दारिद्रय़रेषेखालील भूमिहीन गरीब स्त्रियांना व शेतमजुरांना लाभ मिळू शकणार आहे.

pankaj_hase@rediffmail.com

(लेखक पशुवैद्यकिय महाविद्यालय अकोला येथे  सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)