News Flash

चाईव्हज : फलदायी शेती!

चाईव्हज शेतीमुळे भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही एक नवी संधी मिळाली आहे.

जर्मनीसह काही पाश्चात्त्य देशांत शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाईव्हजया भाजीचे उत्पादन घेतल्यास भारतातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळू शकतो. चाईव्हज या भाजीपाल्यात मोडणाऱ्या शेती उत्पादनाची लागवड ते निर्यात इथपर्यंतचा प्रवास हा पावलोपावली कसोटी पाहणारा असतो. प्रत्येक पावलावर सावधपणे ही शेती कसावी लागते.

उत्तम प्रकारे शेती करून संपन्न होण्याचे अनेक मार्ग हल्ली उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती कसण्याऐवजी अशा नव्या वाटांचा धांडोळा घेणेही गरजेचे बनले आहे. जाणकार, अभ्यासू शेतकरी अशा प्रकारच्या संधीच्या शोधात असतो. अनेकांना अशा संधी गवसल्या आहेत. केवळ गवसल्या आहेत असे नव्हे, तर त्यांनी या संधीचे सोनेही केले आहे. जर्मनीसह काही पाश्चात्त्य देशांत शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चाईव्हज’ या भाजीचे उत्पादन घेतल्यास भारतातील शेतकऱ्यांनाही त्याचा निश्चित लाभ घेता येईल. दक्षता घेतल्याशिवाय या शेतीतून मिळणारे फायदे शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत.

चाईव्हजची शेतीची संधी प्राप्त झाली असली तरी ती प्रत्यक्षात उतरविणे हेही एक कडवे आव्हानच आहे. याचे कारण असे की, चाईव्हज या भाजीपाल्यात मोडणाऱ्या शेती उत्पादनाची लागवड ते निर्यात इथपर्यंतचा प्रवास हा पावलोपावली तुमची कसोटी पाहणारा असतो. प्रत्येक पावलावर अतिशय सावधपणे चाईव्हजची शेती कसावी लागते. यातील एकाही टप्प्यावर दुर्लक्ष झाले तर या भाजी उत्पादनाला धक्का बसू शकतो, त्यातून त्याचा दर्जा खालावतो. मग अशा प्रकारचे निकृष्ट ठरणारे उत्पादन नाकारले जाते.

चाईव्हज शेतीमुळे भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही एक नवी संधी मिळाली आहे. जमिनीचा बेड बनवून त्यावर लागण केल्यास पहिले पीक सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर हाती येते. आपल्याकडे असणाऱ्या कांद्याच्या मुळ्याप्रमाणे चाईव्हजचे पीक असते. कांद्याच्या मुळापेक्षा चाईव्हजची पाने ही कमी आकाराची असतात. पीक वाढेल तसे त्याचा ठरावीक अंतराने काप काढावा लागतो. एका पिकात सात ते आठ प्रकारच्या कापण्या होतात.

चाईव्हजचे उत्पादन घेताना पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे पिकाची लक्षपूर्वक काळजी घ्यावी लागते. हे पीक थंड वातावरणात घेणे गरजेचे असते. उष्ण वातावरण या पिकाला त्रासदायक ठरते. गारव्यात पिकाची उत्तम वाढ होताना त्याचे वजनही योग्य प्रमाणात भरते. पिकाला पाणी, खतेही वेळेवर द्यावी लागतात. हवामान व स्वच्छता याकडेही लक्ष द्यावे लागते. या पिकाला रोग लागणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. वातावरण बदलले की या पिकाला त्रास जाणवतो, त्याच्या गुणवत्तेत फरक पडतो. त्यामुळे थोडा जरी निष्काळजीपणा केला तरी तो चांगलाच भोवू शकतो. पिकाची योग्यरीत्या वाढ होण्यासाठी आणि दर्जेदार पीक हाती लागावे यासाठी सेंद्रिय खतांची फवारणी केली जाते.

या पिकाचा काप सकाळच्या थंड वातावरणात घेतला जातो. पिकाचा काप घेतल्यानंतर ते लगेचच शीतगृहामध्ये ठेवावे लागते. शीतगृहामध्ये चाईव्हजचे वर्गीकरण (ग्रेडिंग) करावे लागते. शंभर ग्रामच्या चाईव्हजचे शंभर गठ्ठे करून ते एका बॉक्समध्ये भरले जातात. या प्रक्रियेत ग्रीडिंगला अतिशय महत्त्व आहे, कारण चाईव्हजच्या पानावर कसलाही डाग चालत नाही. अशा प्रकारचे बॉक्स वातानुकूलित वाहनातून विमानतळावर पोहोचवावे लागतात.

जर्मनीमध्ये चाईव्हजचा वापर मुबलक प्रमाणात केला जातो. तेथे अतिशय थंड वातावरण असते. थंडीमध्ये अंगात ऊब निर्माण करणारी भाजी म्हणून चाईव्हजकडे पाहिले जाते.

सूप, सॅलड यामध्ये मुख्यत्वेकरून चाईव्हजचा वापर होतो. विदेशातील बाजारात चाईव्हजला दरही चांगला मिळतो. सुमारे ५० रुपये किलो या दरात ही भाजी विकली जाते. उत्पादन खर्च, प्रवास खर्च वगळता मिळणारे उत्पन्नही चांगले असते; पण यासाठी करावे लागणारे कष्टही तितकेच महत्त्वाचे असतात.

महाराष्ट्रातील लागवड..

फुलशेतीमध्ये कर्तबगारी दाखविलेल्या कोंडिग्रे येथील श्रीवर्धन बायोटेकने ‘चाईव्हज’ पिकाची लागवड करून चांगले उत्पादन घेतले आहे. सन २०१४ मध्ये पहिल्यांदा सात एकरामध्ये चाईव्हजचे उत्पादन घेतले. प्रति एकरी पाच टन याप्रमाणे सुमारे साठ टनांचे उत्पादन मिळाले. आता या शेतीची व्याप्ती १२ एकरापर्यंत वाढली आहे.

dayanandlipare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 12:08 am

Web Title: chives farming
Next Stories
1 अर्थकारण जपणारी कोथिंबीर
2 भरघोस उत्पन्न देणारी तूर
3 ‘असकारात्मक’ सूक्ष्म सिंचन
Just Now!
X