कल्पवृक्षमानले जाणारे नारळाचे झाड कोकणातल्या अन्य फळझाडांच्या तुलनेत अजूनही दुर्लक्षितच आहे. अलीकडच्या काळात नारळ लागवडीबाबत कोकणामध्ये जनजागृती आणि लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रत्नागिरीजवळ भाटय़े येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने नारळाच्या विविध जाती विकसित करून या मोहिमेला मोलाचा हातभार लावला आहे. उद्या ( सप्टेंबर) जागतिक नारळ दिनानिमित्त या पिकाचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख..

कोकण म्हटले की आंबा आणि काजू या दोन फळांची आठवण होते. तसेच, फणसाचीही चर्चा होते. मात्र, त्या तुलनेत बहुगुणी नारळ दुर्लक्षितच राहिला आहे. अलीकडच्या काळात मात्र याही फळाबाबत जागृती होऊ लागली असून दर वर्षी २ सप्टेंबर रोजी जगातील सर्व नारळ उत्पादक देशांमध्ये साजऱ्या होणाऱ्या नारळ दिनाच्या निमित्ताने या फळाचे नियमित स्मरण आणि लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे कार्यक्रम होऊ लागले आहेत.

आशिया आणि पॅसिफिक खंडातील देशांमध्ये असलेल्या नारळ बागायतदारांच्या समूहांनी एकत्र येऊन २ सप्टेंबर १९६९ रोजी ‘नारळ बागायतदार समाज’ या संस्थेची स्थापना केली. सुमारे २० लाख हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड असलेला भारत या संस्थेचा नैसर्गिक सदस्य आहे. आपल्या देशात दर वर्षी सुमारे दोन दशलक्ष नारळांचे उत्पादन होत असून हेक्टरी सरासरी उत्पादकता सुमारे १० हजार ३४७ फळे आहे. जगातील एकूण नारळ उत्पादनापैकी भारताचा वाटा ३१ टक्के आहे. त्यातून सुमारे २१ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र ही राज्ये नारळ उत्पादनामध्ये आघाडीवर आहेत. देशाच्या निरनिराळ्या भागांत उत्पादन होणाऱ्या नारळाचे एकूण ४३८ नमुने गोळा करून राष्ट्रीय पातळावर नारळ वाणसंग्रह केलेला आहे. महाराष्ट्रातल्या १३ वाणांचा त्यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रात सुमारे ४० हजार २०० हजार हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड आहे. कोकण विभागात पालघर जिल्ह्यत ५ हजार ८५६ हेक्टर, ठाणे ३ हजार ५२२ हेक्टर, रायगड २ हजार ८१६ हेक्टर, रत्नागिरी ५ हजार ८५६ हेक्टर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत १६ हजार ११८ हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड झालेली आहे.

समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश नारळ लागवडीसाठी विशेष अनुकूल असल्यामुळे स्वाभाविकपणे कोकणात नारळ लागवड आणि संशोधनावर जास्त भर देण्यात आला आहे. दापोलीच्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे रत्नागिरीजवळ भाटय़े येथे स्थापन करण्यात आलेल्या नारळ संशोधन केंद्राने त्यासाठी भरीव योगदान दिलं असून लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा), केरा संकरा (टीडी, डब्लू सी टी सी ओ डी), फिलिपिन्स ऑर्डिनरी (केरा चंद्रा), बाणवली, चंद्रसंकरा, फिजी, गोदावरी गंगा या जाती विकसित केल्या आहेत. संकरित फळांचे अधिक उत्पादन, उत्तम प्रतीचे खोबरे, तेल, भरपूर पाणी असलेली शहाळी ही या जातींची वैशिष्टय़े आहेत. त्याचबरोबर नारळाच्या अन्य जाती, मशागतीचे प्रयोग आणि पीक संरक्षण याबाबत केलेल्या संशोधनामुळे अखिल भारतीय ताड-माड प्रकल्पांच्या १६ संशोधन केंद्रांपैकी हे केंद्र विशेष नावाजलेले आहे. केंद्र व राज्य शासनाने अलीकडच्या काळात सेंद्रिय पद्धतीने शेतीला विशेष प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने उत्पादनक्षम नारळझाडासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला पन्नास किलो गांडूळ खत आळे पद्धतीने दिल्यास झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते, असे सांगून या केंद्राचे कृषिविद्यावेत्ता डॉ.वैभवकुमार शिंदे म्हणाले की, कोकण विभागात डीटी (ड्वार्फटॉल) या संकरित जातीच्या नारळ झाडापासून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठीही सेंद्रिय खताची दर तीन महिन्यांनी मात्रा उपयुक्त ठरू शकते. नारळाच्या झाडापासून दर वर्षी सुमारे साडेतीन ते पाच टनापर्यंत काडीकचरा उपलब्ध होऊ शकतो. त्याचाही वापर सेंद्रिय खतनिर्मितीसाठी होऊ शकतो. त्याचबरोबर कोकणातील वालुकायम पोयटा जमिनीत नारळाच्या झाडाला ऑक्टोबर ते जानेवारी या काळात ठिबक सिंचनाद्वारे प्रति दिन ३० लिटर आणि फेब्रुवारी ते मे या काळात प्रति दिन ४० लिटर पाणी दिले तर झाडाची वाढ आणि जोपासना चांगल्या प्रकारे होऊ शकते. मात्र नारळरोपांना खारे आणि गोडय़ा पाण्याचे मिश्रण करून दिल्यास खाऱ्या पाण्याचा अनिष्ट परिणाम होऊन रोपे मरण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे.

राष्ट्रीय नारळ विकास मंडळातर्फे देशात नारळ लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी या मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना कोकणातल्या शेतकऱ्यांनी नारळ लागवडीकडे वळावे यासाठी विशेष प्रयत्न केले. श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघ या जिल्हा पातळीवरील नारळ बागायतदारांची संस्थाही स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी यांनी सांगितले की, कोकणात अनेक शेतकरी नारळाची झाडे पूर्वीपासून लावत आले आहेत. पण ही लागवड विरळ प्रमाणात असून शास्त्रीय पद्धतीने झालेली नाही. तसेच हे शेतकरी संघटितही नव्हते. म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आली. जिल्ह्यतील नारळ बागायतदारांची तालुका पातळीवरील संघटना आणि त्यांची जिल्हा पातळीवर प्रातिनिधिक संस्था अशी रचना आहे. ९ तालुक्यांपैकी गुहागर तालुक्यात नारळ बागायतदार उत्तम प्रकारे संघटित झाले असून रत्नागिरी आणि दापोली या अन्य दोन तालुक्यांमध्येही चांगल्या प्रकारे संघटन उभे राहिले आहे. मात्र नारळ विकास मंडळाने अलीकडच्या काळात अशा प्रकारे नारळ बागायतदारांच्या सोसायटय़ा स्थापन करण्याबाबतचे निकष बदलले आहेत. नारळाची १० झाडे असलेली व्यक्ती बागायतदार होऊ शकते. प्रत्येक तालुक्यात २० बागायतदारांची एक सोसायटी आणि २० सोसायटय़ांचे फेडरेशन अशा प्रकारे रचना अपेक्षित आहे. तसेच या सोसायटय़ांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी, वार्षिक हिशेब तपासणी इत्यादी बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संघटनबांधणीची प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची झाली आहे.

नारळापासून खोबरे, तेल आणि शहाळ्याचे पाणी तर मिळतेच, शिवाय खोबरे आणि तेलाच्या मूल्यवर्धनाद्वारे काही उपपदार्थ केले जातात. नारळाच्या झाडाच्या झावळय़ा आणि करवंटीपासूनसुद्धा कलात्मक व उपयुक्त वस्तू बनवल्या जातात. दक्षिणेकडच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र त्याबाबतीत बराच मागे आहे. पण अशा उपक्रमांना संघटितपणे चालना दिली तर कोकणी माणसासाठी नारळाचं झाड खऱ्या अर्थाने समृद्धीचा कल्पवृक्ष ठरू शकेल.

आंतरपीक म्हणून मसाल्याच्या रोपांना प्राधान्य

नारळ बागेत आंतरपीक म्हणून घेवडा, टोमॅटो, ढोबळी मिरची, नवलकोल, वांगी इत्यादी विविध प्रकारचा भाजीपाला घेणेही शक्य असते. त्याचबरोबर पावसाळी हंगामात शिराळी, काकडी, पडवळ, कारली इत्यादी वेलवर्गीय फळ भाज्याही होऊ शकतात. भाटय़े येथील संशोधन केंद्रामध्ये नारळाच्या बागेत विविध प्रकारच्या दर्जेदार मसाला पिकांची लागवड आणि उत्पादन यशस्वीपणे घेतले जात आहे. तसेच नारळाच्या विविध जाती आणि या मसाला पिकांची रोपे व कलमे माफक दरात उपलब्ध करून दिली जातात. या मसाला पिकांमध्ये जायफळ, दालचिनी, काळीमिरी, लवंग आणि ऑल स्पाइस या पाच प्रकारांचा समावेश असून मिश्र पीक म्हणून ती घेतली जातात. राज्य शासनाने नारळबागेत मसाला पिकांच्या लागवडीचा समावेश रोजगार हमी योजनेअंतर्गत फळझाड लागवड योजनेमध्ये केला आहे. त्यामुळे ते जास्त किफायतशीर झाले आहे. तसेच अशा प्रकारे भाजीपाला व मसाला पिकांच्या उत्पन्नामुळे नारळाची बाग प्रति एकरी १ लाख रुपये मिळवून देणारी ‘लाखी बाग’ म्हणून विकसित करणे शक्य झाले आहे.

pemsatish.kamat@gmail.com