केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर सेंद्रिय व नसर्गिक शेतीचा जसा जोरदार पुरस्कार होऊ लागला त्याच पद्धतीने देशी गोवंशाच्या संवर्धनाचा आग्रह धरण्यात आला. संकरित गाईला शत्रू ठरविण्यात येत आहे. त्यांना बाद करण्यासाठी सरकारबरोबरच काही संस्था, संघटना पुढे सरसावल्या आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष व संघपरिवार हा दूध धंद्यात भावनिक व राजकीय भूमिका घेत असल्याची टीका संकरित गाईंचे समर्थक करू लागले असून शेतकरी संघटनाही त्यात आघाडीवर आहेत. विरोधक व समर्थकांच्या भूमिकांमुळे दूध धंद्यात गोवंशाचा वाद पेटला आहे. मात्र वाद लावून देशी गाईंचे संवर्धन होणार नाही. तो व्यवसाय पुढे नेण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.

शेतीक्षेत्रात सेंद्रिय व रासायनिक तर दूध धंद्यात देशी व संकरित गोवंशाचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याला धार्मिक व राजकीय परिमाण आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर सेंद्रिय व नसर्गिक शेतीचा जसा जोरदार पुरस्कार होऊ लागला त्याच पद्धतीने देशी गोवंशाच्या संवर्धनाचा आग्रह धरण्यात आला. संकरित गाईला शत्रू ठरविण्यात येत आहे. त्यांना बाद करण्यासाठी सरकारबरोबरच काही संस्था, संघटना पुढे सरसावल्या आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष व संघपरिवार हा दूध धंद्यात भावनिक व राजकीय भूमिका घेत असल्याची टीका संकरित गाईंचे समर्थक करू लागले असून शेतकरी संघटनाही त्यात आघाडीवर आहेत. विरोधक व समर्थकांच्या भूमिकांमुळे दूध धंद्यात गोवंशाचा वाद पेटला आहे. मात्र वाद लावून देशी गाईंचे संवर्धन होणार नाही. तो व्यवसाय पुढे नेण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. त्यासाठी मोठी आíथक तरतूद गरजेची आहे. शास्त्रीय पाया असेल तरच देशी गोवंशाचा प्रसार होईल. अन्यथा हा वाद केवळ राजकीय आणि धार्मिक बनेल. त्यातून फारसे काही निष्पन्न होईल असे नाही.

१९६० सालापूर्वी देशात दुधाची टंचाई होती. गावरान गाई कमी दूध देत असत. केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न करून ७०च्या दशकात दूध महापूर योजना आणून संकरित गाईंचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे दुधाची टंचाई गेली. शेतकऱ्यांना नवा जोडधंदा मिळाला. पुढे काही समस्या संकरीकरणामुळे निर्माण झाल्या. परदेशाच्या तुलनेत देशातील संकरित गाई कमी दूध देतात. तापमानातील चढ-उतार त्यांच्या आरोग्याला पेलवत नाही. संकर योग्य पद्धतीने न झाल्याने दर्जेदार गाईंची निर्मिती झाली नाही. संकरीकरण ६२ टक्क्यांच्या पुढे न्यायचे नाही असे ठरले होते. पण विदेशी शुद्धता अधिक वाढल्याने गाई गाभण न राहणे, वांझपणा वाढणे, दूध कमी देणे, विदर्भ व मराठवाडय़ासारख्या भागात त्यांचा टिकाव न लागणे अशा समस्या उद्भवल्या. दुधाचाही वाद वर्षांनुवष्रे सुरूच आहे. संकरित गाईचे दूध हे ए-वन वर्गातील असून त्यात प्रोटीन व अ‍ॅमिनो अ‍ॅसिड हे शरीरासाठी घातक असते. संकरित गाईमध्ये बीटाकेसा मर्फिन हे रासायनिक द्रव्य आढळते, ते स्मृतिभ्रंश वाढविते. तसेच मधुमेह, किडनीच्या समस्या तसेच काही आजार उद्भवतात असे काहींचे म्हणणे आहे. तर गावराण गाईचे दूध हे ए-टू दर्जाचे असल्याने ते आरोग्याला पोषक असते. ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड हे देशी गाईत असल्याने कर्करोगासारख्या आजारावर ते उपयुक्त असते असा दावा केला जातो. मात्र यासंबंधी शात्रीय पातळीवर त्याचे खुलासे केले जात नाही. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली नाही. दोन्ही गाईंचे समर्थक हे आपापल्या पद्धतीने बाजू मांडत असतात. संकरित गाईच्या निर्मितीचा कार्यक्रम अद्यापही बंद करण्यात आलेला नाही. पण आता सरकारने देशी गाई संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे.

संकरित गाईच्या पदाशीचा कार्यक्रम १९७० सालापासून सुरू झाला. देशी गाईवर विदेशी जर्सी व होस्टेन यांचा संकर करण्यात आला. शेतकऱ्यांना त्याचे धडे देण्यात आले. पशू संशोधकांनी संशोधन केले. बायफसारख्या संस्थेने पुढाकार घेऊन जास्त दूध देणाऱ्या गाईंची पदास सहकारी साखर कारखाने व विविध संस्थांच्या माध्यमातून केली. संशोधक, जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग, सरकार व कार्यकत्रे हे त्यात आघाडीवर होते. शेतकऱ्यांच्या दारिद्रय़निर्मूलनात संकरित गाईचे मोठे योगदान ठरले. गेल्या ५० वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे.

सध्या देशात रामदेवाबांचा पतंजली उद्योग समूह हा शुद्ध देशी गाईनिर्मितीसाठी भ्रूणप्रत्यारोपणचे तंत्र वापरणार आहे. त्याकरिता त्यांनी गिर गाईचे ५० वळू २५० कोटींना ब्राझिलमधून आणले आहे. प्रयोगशाळांमध्ये त्याचे फलन केले जाते. या प्रयोगशाळा उभारणीकरिता पुन्हा ५ ते १० कोटींपेक्षा जास्त खर्च येईल. त्याकरिता शास्त्रज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळाचा तुटवडा आहे. जे. के. ट्रस्टने थारपारकर जातीच्या गोवंशाचे भ्रूणप्रत्यारोपण सुरू केले आहे. भ्रूणप्रत्यारोपण करून ज्या गाईंची पदास झाली त्याचे परिणाम ५ वर्षांनी दिसतील. तसेच कमीतकमी १० ते १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागेल. त्याला किती यश मिळते व अपयश किती येते हे काळच ठरवील. आता बायफने उरळीकांचन येथे सिमेन सेप्रेशन (वीर्य विलगीकरण) तंत्र आणले आहे. त्या पद्धतीचा अवलंब केला तर देशी गोवंश तयार करायला कमी कालावधी लागेल. किंवा सध्या काही देशांनी बॅकक्रॉस पद्धत आणली आहे. त्या पद्धतीने ३ ते ४ पिढय़ा तयार झाल्यानंतर स्वतंत्र गीर किंवा अन्य देशी वंशाची पदास होऊ शकते. या तिन्ही पद्धतींमध्ये कोणते जनुक कार्यान्वित होईल, कोणता देशी वंश निर्माण होईल किंवा आणखी काही वेगळे घडेल हे प्रयोगानंतरच पुढे येईल. त्यामुळे देशी गाईंची पदास हा प्रचलित विज्ञानाच्या पद्धतीत दीर्घकालीन असा टप्पा असून त्याचे निष्कर्ष कसे निघतात याबद्दल तज्ज्ञ अनभिज्ञ आहेत. पंजाबमध्ये बॅकक्रॉस पद्धतीचे प्रयोग झाले. त्याला मात्र अपयश आले. देशी संकराचे संशोधन होत असताना जनुक-अभ्यास म्हणावा तसा झालेला नाही. भ्रूणप्रत्यारोपण  करून २० ते २५ टक्के यश आले तर शेतकरी तोटय़ाचा धंदा करणार नाही. त्यामुळे देशी गाईंच्या पदाशीसाठी सरकारला प्रशिक्षित मनुष्यबळ, संशोधकांची मोठी फौज, प्रयोगशाळांची साखळी, पायाभूत सुविधा, पुरेसा निधी दिला तरच त्याला गती मिळेल. केंद्राच्या अर्थसंकल्पात अत्यल्प तरतूद असून त्याने काहीही काम होणार नाही.

चिनमध्ये इन्हीटो फर्टिलायझेशन (आयएनएफ) हे तंत्र आणले. गाईच्या गर्भाशयातील अपरिपक्व त्रिबिजे काढून त्याचे प्रयोगशाळेतील इन्क्युबेटरमध्ये फलनीकरण केले जाते. तो भ्रूण गाईमध्ये प्रत्यारोपित केला जातो. या तंत्राने काही प्रमाणात देशी गोवंश पदासीला कालावधी कमी लागेल. शास्त्रशुद्ध पद्धतीने एक मिशन हाती घेतले तर शुद्ध देशी वंश तयार होऊ शकेल. अन्यथा बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी असे ठरेल. आज अनुत्पादक असलेल्या गावठी गाईंची संख्या मोठी आहे. त्यांना देशी संबोधून त्यांचे संवर्धन झाले तर हा उद्योग किफायतशीर होणार नाही. मुळात व्यवहार आणि धार्मिक व राजकीय भावना यामध्ये अंतर करावे लागेल. देशी गोवंशनिर्मितीचा उद्देश हा निश्चितच चांगला आहे, पण तो व्यावसायिकतेच्या पायावर टिकायला हवा. अन्यथा आज संकरित गाईमुळे दुधाचा प्रश्न सुटला पण या गाई विदर्भ व मराठवाडय़ाच्या तापमानात तग धरत नाही. तेच सह्य़ाद्रीच्या अति पाऊस असलेल्या भागात घडते. त्यामुळे तेथे हा उद्योग फोफावला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानाला त्या साथ करतात. म्हणून तेथे दूधधंदा वाढला. त्यामुळेच आज दरडोई दुधाचा वापर हा ३५० मिलिलिटर होतो. पण तो विदर्भ व मराठवाडय़ात अवघा १५० मिलि होतो. आदिवासी पट्टय़ात ते प्रमाण अत्यंत कमी आहे. मुंबई, पुण्यात ते वाढलेले असले तरी झोपडपट्टय़ांमध्ये ते कितीतरी कमी आहे. त्यामुळे कुपोषणासारख्या समस्या निर्माण होतात. प्रगत देशांमध्ये दुधाचा वापर हा १२०० मिलिपेक्षा जास्त असतो. हा वापर वाढला तर आजच आपल्याकडे दूधटंचाई जाणवेल. त्यामुळे देशी गोवंशाच्या पदाशीनंतर दुधाचा दरडोई वापर कसा वाढेल हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे या गाईंची दूध-उत्पादकताही जास्त हवी.

राज्यात गोशाळांमधून देशी गाईंचा सांभाळ केला जातो. मात्र त्यांना जे नुकसान होते ते दानशूर भरून देतात. धार्मिक संस्था व त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाठबळ त्यामागे आहे. देशी गाईंचे मूत्र व शेणाला मागणी येते. पण गाईंची संख्या वाढल्यानंतर त्याला मर्यादा आहे. सेंद्रिय शेतीकरिता त्याचा वापर होतो. संकरीकरणाचा कार्यक्रम सुरू ठेवून देशी गोवंश पुढे न्यावा लागेल. शेतकऱ्यांना कोणते पशुधन स्वीकारायचे याची सक्ती करता येणार नाही. अखेर शेतकरीच गोठय़ातील गाईंचा वंश कोणता असावा हे ठरवील.

’ गवळाऊ, साहिवाल, गीर, अमृतमहल, थारपारकर, कांकरेज, लालकंधार, डांगी, खिलार या शुद्ध देशी गाईंचा वंश अत्यंत कमी आहे. त्यामुळे या गाई वाढविण्यासाठी कमीतकमी ३० ते ४० वर्षांचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.

’ सध्या गावठी गाई मोठय़ा प्रमाणात असून त्यांचे रूपांतर हे चांगल्या देशी वंशात करावे लागेल. पण त्याचे अनुकूल व प्रतिकूल परिणाम कसे होतात हे कळायलाही काही वष्रे जातील. अब्जावधी रुपये त्यावर खर्च करावे लागतील. आज देशी गाईने जास्त दूध दिले तरच त्याला शेतकरी सांभाळतील.

’ आज गावराण गाय केवळ ३ ते ४ लिटर दूध देते. काही गाई तर अत्यंत कमी म्हणजे अर्धा ते एक लिटर दूध देतात. दूध दिले नाही तर शेतकरी केवळ शेणा-मुताकरिता त्या सांभाळणार नाही. संकरित गाईमुळे श्वेतक्रांती झाली, ती आता देशी गोवंशातून करण्याकरिता शास्त्राचाच आधार घ्यावा लागेल.

अशोक तुपे  ashok tupe@expressindia.com