30 October 2020

News Flash

‘सरस्वती’ची कीर्ती

‘जीवामृत’ हे खास तयार केलेले द्रावण खत म्हणून वापरले जाते.

नागपुरातून ५५ किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यातील हळदगावच्या सुरेश पाटील यांच्या सीताफळाची ख्याती दूरवर पोहोचली आहे. सामान्यजन कदाचित अनभिज्ञ असतील. कारण या फळाची किरकोळ तसेच दलालामार्फत विक्रीच होत नाही. शेतातून तोड झाल्यावर कागदात गुंडाळलेली किमान अर्धा ते एक किलो वजनाची सीताफळे बॉक्समध्ये बांधली जातात. मागणीनुसार विकली जातात. वार्षिक उलाढाल २० लाखांची होते.

विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ या निवासस्थानातून थेट समुद्रपूर तालुक्यातील हळदगावला ठरावीक अंतराने ‘ई-मेल’ येतो. ‘सीताफळ तयार ठेवा’. त्यानंतर दोनच दिवसात रिलायन्सचा मुंबईतील व्यवस्थापक विक्री केंद्र असलेल्या सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचतो. सीताफळाचे बॉक्स मग अंबानीच्या जेवणाच्या टेबलावर विसावतात. पाटील यांच्या सरस्वती सीताफळाची चव पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चाखली आहे. मागणी संपता संपत नाही.

नागपुरातून ५५ किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यातील हळदगावच्या सुरेश पाटील यांच्या सीताफळाची ख्याती दूरवर पोहोचली आहे. सामान्यजन कदाचित अनभिज्ञ असतील. कारण या फळाची किरकोळ तसेच दलालामार्फत विक्रीच होत नाही. शेतातून तोड झाल्यावर कागदात गुंडाळलेली किमान अर्धा ते एक किलो वजनाची सीताफळे बॉक्समध्ये बांधली जातात. मागणीनुसार विकली जातात. वार्षिक २० लाखांची उलाढाल. त्यात फळतोडणी व अन्य खर्च तीन लाख रुपये. उर्वरित नफाच. त्याचे वाटेकरी सुरेश पाटील व त्यांची पंकज व प्रवीण ही दोन मुले. या सीताफळाचे वेगळेपण काय? चवीला अत्यंत मधुर. बियांभोवतीचा गर लोण्यासारखा. कुणी आईसक्रीमसारखा म्हणतात. आकर्षक गोलाकार, बियांचे प्रमाण नगण्य, माधुर्य. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषमुक्त. कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा कीडनाशकाचा वापर न करता ही सीताफळे घेतल्या जात आहे. ‘जीवामृत’ हे खास तयार केलेले द्रावण खत म्हणून वापरले जाते.

गावराण गाईचे शेण, गोमूत्र, एक किलो गूळ व बेसन, धुऱ्यावरील माती हे घटक २०० लिटर पाण्यात प्लास्टिकच्या ड्रममध्ये तीन दिवस ठेवल्यानंतर उकळायचे. हाच द्राव झाडांना फलदायी ठरतो. दुसरे एक द्रावण सीताफळासह अन्य पिकास उपयुक्त आहे. कडूलिंब व सीताफळाचा पाला, एरंडी, निरगुडी, करंजी, बेल, काळी तुळस, रूई, झेंडू, धोत्रा, गोमूत्र, तिखट, हळद, अद्रक, लसूण यांचे मिश्रण ४० दिवस सडवायचे. तीन लिटरचा अर्क १०० लिटर पाण्यात मिसळून फवारायचा. कापूस, फळझाडे व अन्य पिकांची झाडे अगदी टवटवीत. सरस्वती सीताफळाचा उगम पाटील यांच्या संशोधनातून झाला. वीस वर्षांच्या पारंपरिक संशोधनातून तयार या वाणाला त्यांनी आईचे नाव दिले. १५ एकरात सीताफळाची रोपे लावली. या वाणाचे वैशिष्टय़ म्हणजे नियमित हंगामानंतर त्याला फळे येतात.

ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान फळांची तोड सुरू होते. एका बॉक्समध्ये पाच ते सहा फळे, असे पाच हजार बॉक्सेस दर हंगामात विक्रीस तयार असतात. दलालामार्फत विक्री न करता पाटील हे स्वत:च्या नागपुरातील घरून तसेच महामार्गावरील जामच्या अशोक हॉटेलमधून स्वत: विकतात. सीताफळ हे तसे दुर्लक्षित फळ. शेतकऱ्यांमध्येही आवडीचे नाही. पण पाटलांसाठी ते कामधेनू ठरले. अवर्षणग्रस्त भागासाठी योग्य असणाऱ्या या फळास अगदी कमी पाणी लागते. जनावरे खात नाही. फवारणीचा खर्च नाहीच. इतर पिकास नकोशी असणारी मुरमाड जमीन सीताफळास योग्य ठरते. असे हे ‘नकोशी’ झाड घरधन्यास मालामाल करणारे ठरत आहे.

ज्या काळात पाण्याचा अत्यंत तुटवडा व मागणी अधिक त्या एप्रिल-मे महिन्यात सीताफळास पाणी लागत नाही. म्हणून त्यास प्राधान्य दिले, असे पाटील सांगतात. या फळासोबत शेवग्याचे आंतरपिक घेतल्या जाते. शेवग्याचे झाड वातावरणातील नत्र शोषते. सोबतच ‘हालती सावली’ देते. प्रखर सूर्यप्रकाशापासून सीताफळाच्या झाडाचा बचाव होते. आच्छादन पध्दतीत काडीकचरा जाळल्या जात नाही. तो शेतातच कुजविला जातो. त्याखाली गांडूळ जपतात. आच्छादनाचा उपयोग गांडुळांना घरासारखा होतो. त्यामुळे जमीन भुसभूशीत होते. गांडुळाने खाल्लेल्या मातीत नत्र, पलाश, स्फूरद मोठय़ा प्रमाणात असते. पाण्याची पातळी वाढते. शेताला झाडांची वनभिंत केल्याने कधीकधी घोंगावणारे वादळ थेट झाडाला बाधत नाही. अशी आवश्यक ती वातावरण निर्मिती अल्प खर्चात साधन्यात आली. सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते डॉ. सुभाष पाळेकर हे पाटील यांचे आदर्श आहे. त्यामुळे त्यांची सर्वच शेती विषमुक्त म्हणजेच सेंद्रिय पध्दतीने होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सरस्वती सीताफळाचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर’ ठरले. नागपूरच्या विविध कृषी प्रदर्शनात गडकरी यांनी या सीताफळाची भरभरून प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर त्याचे गिफ्ट बॉक्स पंतप्रधान व अन्य मंत्र्यांना पाठवले. त्यांच्याच माध्यमातून ही सीताफळे अंबानींकडे पोहोचली. चव चाखून झाल्यावर फळे खरच विषमुक्त आहे अथवा नाही, हे तपासण्यासाठी त्यांचा वरिष्ठ अधिकारी हळदगावच्या शेतावर पोहोचल्याचे पाटील गंमतीने सांगतात. अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही ही फळे भावली. त्यांनी त्यांच्या कृषी खात्याची चमूच लागवड पाहण्यास पाठवून दिली. आमच्याकडे अशी फळे, तशी फळे असे अभिमानाने सांगणारे छत्तीसगढचे कृषीमंत्री अग्रवाल हे गडकरींच्या हातून सरस्वती सीताफळ खाताच गप्प बसले. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, भाषणातून ते वारंवार या फळाचा व समृद्ध शेतीचा प्रसार करीत असतात. आता गिफ्ट स्वरूपात सरस्वती सीताफळाचेच बॉक्सेस देणे सुरू झाले आहे. वैदर्भीय फळांचा प्रसार करण्याचा हेतू त्यामागे आहे, असे डॉ. भोयर नमूद करतात.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन

सरस्वती वाण स्वत: पुरतेच मर्यादित ठेवले काय, या प्रष्टद्धr(२२४)्नाावर सुरेश पाटील म्हणतात, अजिबात नाही. मी दरवर्षी ५०-६० शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीसाठी प्रोत्साहन देतो. त्यांना मार्गदर्शन करतो. कारण अत्यंत कमी खर्च व कमी पाण्याचे हे उत्पादन आहे. त्या हेतूनेच मी स्वत:ची रोपवाटिका तयार केली आहे. पपई, पेरू, चिकूची रोपे उपलब्ध आहे. सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे असा माझा उद्देश आहे, अशी भावना पाटील व्यक्त करतात. पाटलांचे सरस्वती सीताफळ आता सर्वत्र पोहोचत आहे. दलाल विरहीत विक्री व्यवस्था त्यांनी यशस्वी करून दाखविली. या वाणाला असणारी मागणी हेच त्यामागचे रहस्य आहे. पाटलांचे हळदगावचे शेतशिवार ‘परिश्रमाचे फळ’ सिध्द करते. दुर्लक्षित फळास राजाश्रय मिळवून देण्याचे श्रेय आहेच.

prashant.deshmukh@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2017 1:03 am

Web Title: custard apple farming 2
Next Stories
1 पारंपरिक पिकांना राजाश्रयाची गरज
2 कोकणला जलयुक्त साथ
3 माळरानावर झेंडूला बहर
Just Now!
X